पिंपरी चिंचवडमध्ये आरटीईत साठ शाळा ‘नापास’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

निकष नसलेल्या अपात्र शाळा
रंगरंगोटी    ६४ 
मुलांचे स्वच्छतागृह    १९
मुलींचे स्वच्छतागृह    १४
स्वच्छतागृह    ४
अग्निशमन यंत्रणा    १६
रॅम्प    ११
संरक्षक भिंत    १० 
विद्युतीकरण    ९
सीसीटीव्ही कॅमेरे    ८
शाळा इमारत    ४
पिण्याचे पाणी    २ 
ग्रंथालय    २

पिंपरी - आरटीईचे निकष पूर्ण करण्यामध्ये महापालिकेच्या ६० शाळा ‘नापास’ ठरल्या आहेत. १०५ शाळांपैकी केवळ ४५ शाळाच या निकषांना पात्र ठरल्या आहेत. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे, रॅम्प नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शाळेसाठी स्वतंत्र इमारत, प्रत्येक शिक्षकामागे एक वर्गखोली, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाकगृह, शाळेभोवती सुरक्षाभिंत, खेळाचे मैदान, अडथळेविरहित प्रवेशमार्ग (रॅम्प), मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय आणि ग्रंथालय असे शिक्षण हक्क कायद्यान्वये किमान दहा निकष शाळांना लागू आहेत. मात्र, पालिकेच्या १०५ शाळांपैकी ६० शाळा या निकषांच्या कसोटीवर ‘नापास’ झाल्याचे शिक्षण समितीने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. ६४ शाळा रंगहीन आहेत. प्रत्येक शाळेत दिव्यांगांसाठी रॅम्प असणे आवश्‍यक असताना अद्याप ११ शाळांनी रॅम्पची सुविधा केलेली नसल्याने अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

खाते वाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार : जयंत पाटील 

स्वच्छतागृहांअभावी कुचंबणा
महापालिकेच्या १९ शाळांमध्ये मुलांसाठी तर १४ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. विशेष म्हणजे चार शाळांमध्ये स्वच्छतागृहच अजिबात नसल्याची माहिती शिक्षकांनीच दिली आहे. चार शाळांना इमारत, वर्गखोल्यांची गरज आहे. काहींना फरशा बसविलेल्या नाहीत. एखादी दुर्घटना घडल्यावर अग्निशमन यंत्रणेची गरज असते. परंतु महापालिकेच्या १६ शाळांमध्ये ही यंत्रणाच नसल्याने अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. १० शाळांना संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. दोन शाळांमध्ये पिण्याची पाण्याची सोय तसेच ग्रंथालये नाहीत. 

पाहणी दौऱ्यांचे काय?
गेल्या अडीच वर्षांत महापौरांपासून अनेकांनी शाळांची पाहणी केली. परंतु विद्यार्थ्यांच्या समस्या कायम आहेत. या अडचणींबाबत विविध शाळांनी शिक्षण समितीकडे पत्र पाठवूनही उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये आरटीईचे निकष पाळणे गरजेचे आहेत. सध्या पाहणी दौरा सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेमधील समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- मनीषा पवार, सभापती, शिक्षण समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixty school fail in rte in pimpri chinchwad