कौशल्यातून स्वयंरोजगाराचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मराठा, कुणबी समाजातील अभियांत्रिकी पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी उच्चप्रतीचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) आणि सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क यांनी पुढाकार घेतला आहे.

मराठा, कुणबी समाजातील दोन हजार तरुणांना प्रशिक्षण
पुणे - मराठा, कुणबी समाजातील अभियांत्रिकी पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी उच्चप्रतीचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) आणि सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क यांनी पुढाकार घेतला आहे.

कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरवातीला दोन हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. पुण्यात मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय, हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालय, सातारा येथील विज्ञान महाविद्यालय आणि खारघर येथे ही प्रशिक्षणे दिली जाणार आहेत. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजातील पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, 'आम्ही टाटा टेक्‍नॉलॉजी, रयत शिक्षण संस्था आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्याबरोबरीने सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्‍युबेशनची स्थापना केली आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा आणि उच्च प्रतीच्या सॉफ्टवेअरची सोय केली असून, अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अत्युच्च दर्जाचे कौशल्य मिळेल. त्याचा फायदा चांगल्या प्रतीच्या नोकऱ्या मिळण्यासाठी वा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी होईल.''

मोफत प्रशिक्षण
'औद्योगिक क्षेत्रातील चांगल्या आस्थापनांच्या आम्ही संपर्कात असून, प्रशिक्षणानंतर अधिकाधिक उमेदवारांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देणार असल्याने त्याचाही फायदा उमेदवारांना होणार आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. तसेच आठ ते अकरा हजार विद्यावेतनही त्यांना मिळेल. मात्र, प्रशिक्षणादरम्यान राहण्याची आणि भोजनाची सोय विद्यार्थ्यांना स्वत: करावी लागेल,'' असे जगदाळे यांनी सांगितले.

याचे मिळणार प्रशिक्षण
रोबोटिक्‍स बेस्ड मॅन्युफॅक्‍चरिंग, प्रॉडक्‍ट डिझाईनिंग, प्रॉडक्‍ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट तसेच ऍडव्हान्स्ड ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग याबरोबरच पार्ट मॉडेलिंग अँड ड्रॉइंग तसेच इसेन्शिअल ऑफ प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट, कॅड इंजिनिअरिंग व फंडामेंटल ऑफ ऑटोमोबाइल आदी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एमटेक, एमई, बीटेक, बीई पदवीधारक, बीएस्सी, बीकॉम, बीए पदवीधर तसेच आयटीआय, पदविका धारक विद्यार्थी त्यासाठी पात्र असतील. याबद्दल अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://scitechpark.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Skill development program Training for Maratha Kunabi Society Youth