कौशल्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक ओळख, कारण...

कौशल्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक ओळख, कारण...

पुणे : औद्योगिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या गरजा ओळखून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातंर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी सध्या सुरू आहे. मात्र, ही आखणी होत असताना विद्यापीठातून विविध कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातंर्गत अभ्यासक्रम निश्चितीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘सकाळ’ला दिली. 

राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कौशल्यावर आधारित उच्च शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करून, त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ’ स्थापन करण्यात येत आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम २०२१’ २३ मार्च २०२१ रोजी राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. विद्यापीठाचा प्रथम परिनियमांचा आणि अध्यादेशांचा मसुदा तयार करण्यासाठी आणि विद्यापीठांतर्गत सुरू करावयाचे कौशल्य अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी राज्य सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने तज्ज्ञ समिती नेमली आहे. पुण्यातील सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत आठ सदस्यांचा समावेश आहे. तसेच समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार तज्ज्ञांना आमंत्रित करण्याचे अधिकार राहणार आहेत. समितीला अभ्यासक्रमाबाबतचा अहवाल दोन महिन्यांत सादर करावा लागणार आहे.

समितीत असणारे सदस्य :
- मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, डॉ. राजेंद्र वेळूकर, आयआयटी (मुंबई) प्राध्यापक कवी आर्या, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. साळुंखे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, हेल्थकेअर तज्ज्ञ समीर जोशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सह सचिव डॉ. सुवर्णा खरात. 

अशी होईल अभ्यासक्रम निश्चिती : 
- बारावीनंतरचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम 
- उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन, विभागवार कौशल्य विकसित होण्यावर भर 
- केवळ पदवी नव्हे तर ‘प्रोफेशनल’ पदवी देणारे हे विद्यापीठ असेल 
- आयटी, फूड प्रोसेसिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल, सायबर सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी, अशी विविध नवीन कौशल्ये देण्यावर भर 
- प्रत्येक क्षेत्रनिहाय (सेक्टर) स्वतंत्र अभ्यासक्रम 


कौशल्य विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी संबंधित कौशल्याने परिपूर्ण असावा, या दृष्टीने अभ्यासक्रम ठरविला जाईल. त्यासाठी देशातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, संस्था यांच्याशी सामंजस्य करार करण्याचा विचार आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवरील रोजगार क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. -डॉ. राजेंद्र जगदाळे, अध्यक्ष, कौशल्य विद्यापीठातंर्गत कौशल्य अभ्यासक्रम निश्चिती समिती

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com