चर्मकारही करतोय ‘कॅशलेस’ व्यवसाय

प्रशांत घाडगे -  @ghadgepd 
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

एरंडवणा - बूट पॉलिश करायचंय...चप्पल सांधायचीय; पण त्यासाठी सुटे पैसे आणायचे कोठून, हा प्रश्‍न नोटाबंदीनंतर साऱ्यांनाच पडला. यामुळे चर्मकारांसारख्या छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. यातून मार्ग काढण्यासाठी भांडारकर रस्त्यावरील चर्मकार संजय ब्राह्मणे यांनी चक्क ‘पेटीएम’चा वापर सुरू केला आहे. त्यांच्या या ‘कॅशलेस’ व्यवसायाला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

नोटाबंदीनंतर किरकोळ व्यावसायिकांना सुट्या पैशांची अडचण भासू लागली होती; परंतु, या परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजी, पुस्तक विक्रेते, किराणा मार्केट या ठिकाणी मोबाईल वॉयलेटद्वारे (पेटीएम) व्यवहार होताना दिसत आहेत. नोटाबंदी होण्यापूर्वी मोजक्‍याच ठिकाणी ‘ऑनलाइन पेमेंट’ होताना दिसत होते. परंतु, सध्या अनेक विक्रेत्यांनी ‘ऑनलाइन पेमेंट’वर भर दिला आहे.

नोटाबंदीनंतर ब्राह्मणे यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांनीही ‘कॅशलेस’ होण्याचा निश्‍चय करून ‘पेटीएम’चा वापर सुरू केला आहे.
ब्राह्मणे म्हणाले, ‘‘गेल्या सात वर्षांपासून मी चर्मकाराचा व्यवसाय करत आहे. परंतु, नोटाबंदीनंतर माझ्या व्यवसायावर परिणाम झाला होता. ग्राहकांकडे सुटे पैसे नसल्याने ते माघारी जात होते; परंतु, एका ग्राहकाने मला ‘पेटीएम’चा वापर करण्याची कल्पना दिली. त्यांच्या मदतीने वापर करू लागलो. सध्या ग्राहकाकडून ‘पेटीएम’द्वारे २०० ते २५० रुपयांचे पेमेंट मिळत आहे.’’

ग्राहकांचाही फायदा
सध्या ऑनलाइन पेमेंट करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ‘पेटीएम’चा वापर मोबाईल रिचार्ज, वीजबिल भरणे, इन्शुरन्स, पेट्रोल, विमान, रेल्वेची तिकिटे काढण्यासाठी केला जातो. या मोबाईल वॉलेटद्वारे ग्राहकांनाही बिलात काही प्रमाणात सूट मिळते आहे.   

Web Title: skinner cashless business