निमय मोडून जाणे पुण्याचं गुणगान गाणे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
निमय मोडून जाणे पुण्याचं गुणगान गाणे!

निमय मोडून जाणे पुण्याचं गुणगान गाणे!

‘हमे विनाकारण क्यों रुकवाया? हम हमेशा ऐसी मान तिरकी करकेच मोबाईलपर गप्पा मारते मारते गाडी चलाते है. हमे उसका सराव होता है,’ कशीबशी समीरने दुचाकी थांबवली व कर्नाटकच्या पोलिसाला गाडीवरुनच सुनावले.

‘तुम पुणे के लगते हो,’ असं त्या हवालदारानं म्हटल्यावर समीरला आश्चर्य वाटलं. तोंडातील गुटखा थुकत त्याने तोंड मोकळे केले. ‘तुम्ही कसं ओळखलंत? तुम्हीसुद्धा पुण्याचे का?’ असं त्याने विचारलं. ‘गाडी चलाने की स्टाईल, हेल्मेट न पहनना, गाडी चलाते समय गुटखा खाना, पोलिसकर्मीयोंसे बातचित करने का तरीका इससे मै जान गया.’ पोलिस हवालदारानं म्हटलं.

कर्नाटकमधील एका शहरात पंधरा दिवसांपूर्वी समीरला नोकरी लागली. त्यामुळे पुण्यातील दुचाकीसह सगळा बाडबिस्तरा घेऊन तो इकडे आला आहे. मात्र, येथील परिस्थिती बघून तो पुरता गांगारुन गेला आहे. कर्नाटकमधील नागरीक व खुद्द पोलिसांनाही वाहतुकीची नियम माहिती नसावेत, याबद्दल त्याला आश्चर्य वाटलं. साधं हेल्मेटचं उदाहरण घ्या. हेल्मेट घालायचं की नाही, हा वाहनचालकांच्या मर्जीवर अवलंबून असतं. पण येथे मात्र सगळेच जण हेल्मेट घालत होते. आता चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्याशेजारी पोलिस उभा नसेल तर सिग्नल तोडला तर काय हरकत आहे? पण नाही. पोलिस असो वा नसो हिरवा दिवा लागेपर्यंत सगळेजण थांबून राहतात, या गोष्टींना तो वैतागून गेला होता. लायसन आणि गाडीची कागदपत्रे कोणी जवळ बाळगतं का? पण नाही येथं सगळं उलटंच. फॅन्सी नंबरफ्लेट नसेल तर तुमच्या गाडीकडं कोणी ढुंकूनतरी बघेल का? पण येथल्या पोलिसांना ते मान्यच नाही. आपली हवा आहे, हे दाखवण्यासाठी अधून-मधून कर्णकर्कश हॉर्न नको वाजवायला? नो एन्ट्रीतून गाडी नेली किंवा ‘नो पार्किंग’च्या फलकाखाली गाडी लावली तर दंडाची पावती कशी काय फाडली जाते, हे त्याला प्रश्न पडले होते आणि म्हणूनच वाहतुकीचे नियम तो पोलिसालाच नीट समजावून सांगत होता. नगरसेवक, आमदारांचे दाखले देत होता. पण तो पोलिस कशालाच बधेना.

हेही वाचा: पुणे : 'कोविड मुक्त गाव' स्पर्धेचं आयोजन; विजेत्याला मिळणार 50 लाखांचं बक्षीस

‘तीन हजार का जुर्माना भुगताना पडेगा.’ पोलिसाचं बोलणं ऐकून समीरला धक्का बसला. त्याने हळूच शंभरच्या दोन-तीन नोटा पोलिसाच्या हातात कोंबल्या. हे पाहून तो पोलिस उखडला. कायद्याचा बडगा उगारला, तेव्हा कोठे समीरने संपूर्ण दंड भरला. रुमवर आल्यावर तेथील स्थानिक सहकाऱ्याशी त्याने वाद घातला.

‘अरे लेन कटिंग केली तर दंड भरायला लागतो, हे मला येथं पहिल्यांदा कळलं. गाडीला लाइट नाही, आरसे नाहीत, लायसन नाही, हेल्मेट घातलं नाही म्हणून कोणी दंड भरतं का? बीआरटी मार्गातून दुचाकी नेली तर कोठे गुन्हा दाखल होतो का? काय तर म्हणे सिटी बससाठी तो रस्ता राखीव आहे. तुम्ही लोकांनी या अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे, आंदोलने केली पाहिजेत. आमच्या पुण्यात असलं काही चालत नाही. नाहीतर लगेच आम्ही आंदोलने करतो.’ समीरने म्हटले. ‘आणि काय रे रस्त्यावर एक साधा खड्डा नाही. खड्ड्याशिवाय रस्त्याला शोभा असते का? खड्डे नसल्यामुळे पहिले तीन-चार दिवस गाडी चालवायला मी बुजत होतो. पीएमटीच्या धूर नाका-तोंडात गेल्याशिवाय आम्हाला नीट श्वासोच्छवास घेता येत नाही.

कचऱ्याचा वास आला नाही तर आमचा जीव गुदमरतो. येथं हे काहीच नाही. कसलं भंगार जिणं जगता रे तुम्ही. या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढा उभारा.’’ समीरचं आवेशपूर्ण बोलणं ऐकून तेथील त्याचा स्थानिक सहकारी खाली मान घालून गप्प बसला. त्यानंतर काही दिवसांतच ‘वाहतुकीच्या शिस्तीसाठी पुण्यासारखं दुसरं शहर नाही. जगाच्या पाठीवर वाहनचालकांना एवढं स्वातंत्र्य कोठेही भेटणार नाही’, असं म्हणत समीरने आपला मुक्काम कायमस्वरुपी पुण्याला हलवला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Panchnama
loading image
go to top