मोटारीत बसलं ‘भूत’; कसं काय जुळेल सूत? | SL Khutwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
मोटारीत बसलं ‘भूत’; कसं काय जुळेल सूत?

मोटारीत बसलं ‘भूत’; कसं काय जुळेल सूत?

जंगलात भटकंतीला आलेली स्वाती अंधाऱ्या रात्री रस्ता चुकल्याने तिच्या पायाखालची वाळूच सरकली. कडाक्याच्या थंडीतच घुबडाचे घुत्कारणे व टिटवीच्या ओरडण्याने तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. आता आपल्या ग्रुपला कोठं शोधायचं, हा मोठा प्रश्‍न तिच्यासमोर होता पण अंधारात एका जागी बसूनही काही उपयोग नव्हता. एखादा प्राणी हल्ला करण्याचीही तिला भीती वाटत होती. त्यामुळे कच्च्या रस्त्यावरून चालत राहणे, एवढेच तिच्या हाती होतं. या रस्त्याने एखादी व्यक्ती वा गाडी आपल्याला भेटावी, अशी प्रार्थना ती करू लागली. बराचवेळ चालल्यानंतर तिला समोरून एका गाडीचा प्रकाशझोत दिसला. तिच्या जीवात जीव आला. पण आपल्याला बघून, ती व्यक्ती गाडी थांबवेल का? अशी शंका तिच्या मनात आली. म्हणून ती रस्त्याच्या मध्ये उभी राहून, ‘प्लीज हेल्प’ अशी जोरजोरात ओरडू लागली. तिच्याजवळ आल्यानंतर चाळिशीतील व्यक्तीने गाडी थांबवली.

‘प्लीज, मला मदत करा. मी रस्ता चुकलेय.’’ स्वातीने विनवणी केली. त्या व्यक्तीने तिला गाडीत घेतले. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर ती व्यक्ती बोलू लागली.

‘गुलाबी थंडी किती मस्त पडली आहे ना? आणि बाहेरचं हवामानही किती आल्हाददायक आहे. या रोमांटिक वातावरणाचा फायदा घ्यावा, असं तुला वाटत नाही का?’’ त्याने तिचा हात दाबत म्हटले. त्याचे हे वागणं बघून स्वातीला मोठा धक्का बसला. त्याच्या मनात काय चाललंय, याची तिला जाणीव झाली. आपण या गाडीत बसून मोठी चूक केली, असंही तिला क्षणभर वाटलं पण तिने संयम पाळला.

‘ठंडी हवाओंने गोरी का घुंगट उठा लिया,’’ हे प्रेमनगरमधील राजेश खन्नाच्या तोंडी असलेलं गाणं स्वातीकडे कटाक्ष टाकत तो गुणगुणू लागल्यावर तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.

हेही वाचा: Crime News : 25 लाखाच्या लॉटरीपायी गमावले 46 लाख रुपये !

‘या एकट्या जंगलात, अंधाऱ्या रात्री तुला परक्या पुरुषासोबत गाडीत बसताना तुला भीती नाही वाटली?’’ त्याने तिला विचारले.

त्यावर त्याचा हात हातात घेत प्रेमळ सुरात स्वाती म्हणाली, ‘‘खरं सांगू? अजिबात भीती वाटली नाही. उलट तुमच्यासारख्या परक्या पुरुषासोबत प्रवास करणं, याला नशीब लागतं.’’ स्वातीने असं म्हटल्यावर त्या व्यक्तीचा उत्साह वाढला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले.

‘का बरं भीती नाही वाटली?.’’ त्याने पुन्हा तिच्या हातावर हात ठेवत म्हटले.

‘मला परपुरुषांची भीती कधीच वाटत नाही कारण गेल्या तीनशे वर्षांत या जंगलात माझा कोणीही गैरफायदा घेतला नाही. ’’ स्वातीने ठामपणे म्हटले.

‘तीनऽऽऽशे वर्षांत?’’ त्या व्यक्तीची बोबडी वळली.

‘कलिंगडाचे राजे सफरचंदमहाराज यांची मी पट्टराणी लिंबूदेवी आहे. तीनशे वर्षांपूवी मी महाराजांबरोबर शिकारीला आले होते. तेव्हा महाराजांची गोळी चुकून मला लागली. त्यात माझा मृत्यू झाला. तेव्हापासून मी या जंगलात भूत बनून भटकत आहे. आजतागायत दर अमावस्येला मी नरबळी देते.’ असं म्हणून स्वातीने पॉझ घेतला. समोर लागलेल्या वणव्याकडं बोट दाखवत ती म्हणाली, ‘‘ते पाहिलंस. माझ्या सहकाऱ्यांनी सगळी तयारी केली आहे. अमावस्येला जिवंत माणूस आणणं, ही गेल्या तीनशे वर्षापासून माझीच जबाबदारी आहे. आता ते माझीच वाट पाहत आहेत.’’ असे म्हणून डोळे मोठे करत व केस मोकळे सोडत स्वाती विकट हसली. हे सगळं बघून त्या व्यक्तीला घाम फुटला. त्याने गाडी जाग्यावर थांबवून, बाहेर पडत वाट फुटेल तिकडे ‘भूत भूत’ म्हणून जोरात पळू लागला. त्याच्या पळणाऱ्या आकृतीकडे बघत स्वातीने गाडीचे स्टेअरिंग हातात घेतले व ‘भित्रा कोठला’ असे म्हणून निर्भयपणे गाडी चालवू लागली.

loading image
go to top