अवघड बार्गेनिंग केलं ‘सुलभ’

बार्गेनिंग करण्यात सुलभाचा हात आख्ख्या पुण्यात कोणी धरणार नाही, असा दावा तिची नलूमावशी नेहमी करते, ते उगाच नाही.
Panchnama
PanchnamaSakal

बार्गेनिंग करण्यात सुलभाचा हात आख्ख्या पुण्यात कोणी धरणार नाही, असा दावा तिची नलूमावशी नेहमी करते, ते उगाच नाही. तीनशे रुपयांची वस्तू तीस-चाळीस रुपयांत ती खरेदी करते, यावरून तिचं कौशल्य लक्षात यावं. सुलभाला लग्नासाठी बघायला स्थळ आले होते, त्यावेळेसही ‘आवड कशाची आहे’, या भावी सासऱ्याच्या प्रश्नाला तिने ‘बार्गेनिंग’ असे उत्तर दिले होते. याची चुणूक तिने त्याचवेळी दाखवली होती. नवऱ्या मुलाच्या याच पॅटर्नमध्ये दुसरा कलर आहे का? असं विचारून तिने भावी सासूचं डोकं गरगरायला लावलं होतं. लग्नाच्या बैठकीत वरपक्ष एक लाख हुंडा व वीस तोळ्यांवर ठाम होता. पण सुलभाने बार्गेनिंग करून दहा हजार हुंडा व दोन तोळ्यांवर व्यवहार मिटवला होता. शिवाय लग्नाचा सगळा खर्चही वरपक्षाला करायला लावला होता.

या क्षेत्रातील अनुभव व कौशल्य पाहून तिने नुकतेच ‘सुलभ बार्गेनिंग क्लासेस’ही सुरू केले आहेत. विशेष म्हणजे पुणेकरांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी एका विद्यार्थिनीला सोबत घेऊन तुळशीबागेत बार्गेनिंग कसं करावं, याचं प्रात्यक्षिक सुलभा दाखवणार होती. शनिपार चौकात तिच्याकडून सिग्नल तुटल्याने एका पोलिसाने गाडी बाजूला घ्यायला सांगितली. ‘हेल्मेट न वापरणे व सिग्नल तोडल्याबद्दल बाराशे रुपये दंड भरावा लागेल’ असे सांगितले. त्यावर सुलभा हिंदीत सुटली कारण बार्गेनिंग करण्यासाठी हिंदीसारखी दुसरी चांगली भाषा नाही, यावर तिचा ठाम विश्वास होता.

‘भैय्या, कुछ कम करो ना! पास के चौक का पोलिस तो तीनशे लगाता है!’’ हे ऐकून पोलिसाची सटकलीच. ‘‘तुम्ही काय मंडईत भाजीपाला खरेदी करायला आलाय का? येथे ‘फिक्स रेट’ असतो.’’ हवालदारसाहेबांनी आवाज चढवत म्हटले.

‘देखो भैय्या, हम दरवेळी इधर से ही पावती फाडते है. हम यहा के नेहमी के गिऱ्हाईक हैं! पैसे कम करना हमारा हक बनता है!’’ सुलभाने बार्गेनिंग करत म्हटले. पण हवालदारसाहेब काही ऐकायला तयार नव्हते.

Panchnama
पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. १९) दिवसभरात ३७७ नवे कोरोना रुग्ण

‘इस चौक का दंड बहोत महॅंगा हैं! दुसरे चौक में इतना पैसा नही लेते. हम बचपन से पावती फाडते आये है!’’ सुलभाने आपले सगळे कौशल्य वापरले पण हवालदारसाहेब बाराशेच्या खाली यायला तयार नव्हते.

‘अच्छा ठीक है! फायनली देने का भाव बोलो. तुम्ही बाराशे म्हणताय आणि मी दोनशे म्हणतेय. चारशेमध्ये व्यवहार तोडून टाका म्हणजे मीही खूष आणि तुम्हीही खूष.’’ आता मात्र हवालदारसाहेब चिडले. त्यावर सुलभाही वरमली व म्हणाली, ‘‘दंडाची पावती कोणत्या रंगाची आहे? व्हईटमध्ये? आणि त्यावर लाल रंगाची नक्षी? शी बाई ! हे दोन्ही कलर अजिबात मॅचिंग होत नाही. मला पांढरा रंग अजिबात आवडत नाही. त्याऐवजी गुलाबी किंवा वांगी कलरचे पावतिपुस्तक आहे का तुमच्याकडे? आणि त्यावर नेव्ही ब्ल्यू कलरची नक्षी हवीय. अगदीच हे कलर नसले तरी मोरपंखी कलरही चालेल पण त्यावर नक्षी मात्र पोपटी कलरची हवीय बरं का? अहो पावती असली म्हणून काय झालं? मॅचिंग नको का?’’ सुलभाने आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यावर हवालदारसाहेबांनी दोन्ही हात जोडले.

‘ताई, येथं भेटलात वर भेटू नका, ही हात जोडून विनंती. तुम्ही निघा आता. एवढ्यावेळात मी दहा पावत्या फाडल्या असत्या.’’ हवालदारसाहेबांचं बोलणं ऐकून सुलभा विद्यार्थिनीसह तुळशीबागेत शिरली व तिला म्हणाली, ‘‘बार्गेनिंग करतानाच पहिला धडा म्हणजे संयम बाळगणे. हा धडा अत्यंत महत्त्वाचा असून, त्याच्या जोरावरच आपण यशस्वीरीत्या शंभर टक्के बार्गेनिंग केलं की नाही!’’ यावर तिच्या विद्यार्थिनीने आनंदाने मान डोलावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com