झोपी गेलेला जागा झाला मास्तराचीच घेतली ‘शाळा’ | SL Khutwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
झोपी गेलेला जागा झाला मास्तराचीच घेतली ‘शाळा’

झोपी गेलेला जागा झाला मास्तराचीच घेतली ‘शाळा’

मध्यरात्री दोनच्या सुमारास मुख्याध्यापक नेवसे सरांचा मोबाईल खणखणल्यावर त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. एवढ्या रात्री कोणीतरी फोन करतंय, याचा अर्थ काहीतरी वाईट बातमी असणार, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे काही क्षण घाबरून ते टेबलवर ठेवलेल्या फोनकडं बघू लागले.

‘अहो, उचला की तो फोन. दुसऱ्यांच्या झोपा मोडण्यात तुम्हाला कशाचा आनंद मिळतो, कोणास ठाऊक?’’ त्यांच्या बायकोने करवदत म्हटलं.

‘अगं तुझी आई आजारी आहे ना. त्यांचं काही...’ सर घाबरतच हळूच पुटपुटले. फोनची रिंग वाजून ती बंद झाली. तसा त्यांनी निःश्‍वास सोडला. बहुतेक राँग नंबर असावा, या शक्यतेने त्यांना समाधान वाटले. मात्र, परत पाच मिनिटांनी फोनची रिंग वाजू लागली. बायकोनं परत कालवा करून, आख्खी सोसायटी डोक्यावर घेण्याआधी आपण फोन घेतलेला बरा, असा विचार त्यांनी केला व ते टेबलजवळ गेले.

‘हॅलो, कोण बोलतंय?’ घाबरतच त्यांनी विचारले.

‘सर, मी आठवीतील स्वप्नील बोलतोय. उद्या शाळा कधी उघडणार आहे.?’ पलीकडून आवाज आला.

‘बाळ, मध्यरात्री दोन वाजता फोन करून, हा प्रश्‍न विचारण्याची ही वेळ आहे का?’ सरांनी संयमाने विचारले.

‘सर, तसं नाही. सांगा ना प्लीज.’ स्वप्नीलने विनंती केली.

‘उद्या दहा वाजता शाळा उघडेल. झोप आता.’’ असे म्हणून सरांनी फोन कट केला. सलग दीड वर्षे शाळा बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेविषयी किती ओढ आहे, दिवस- रात्र ते शाळेचाच विचार करतात, या कल्पनेने सरही सुखावले. मात्र, परत पाच मिनिटांनी फोनची रिंग वाजली.

‘सर, दहाच्या आधी शाळा नाही का उघडणार?’ स्वप्नीलने निरागसपणे विचारले.

हेही वाचा: शेतीचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा; जालिंदर कामठे

‘अरे तुला शाळेत येण्याची कितीही घाई झाली असली तरी शाळेचे काही नियम असतात ना. ते पाळावेच लागतात. झोप आता शांतपणे. नाहीतर उद्या दिवसभर अंगठे धरायला लावेल.’’ सरांनी रागाने म्हटले व फोन बंद केला.

त्यानंतर परत पाच मिनिटांनी फोन वाजला. चरफडतच तो सरांनी घेतला.

‘सर, उद्याचा दिवस शाळा लवकर उघडा की.’ स्वप्नीलने पुन्हा विनंती केली.

‘अरे कशासाठी’? सर त्याच्यावर खेकसले.

‘सर, गेली दीड वर्षे शाळा बंद होती. त्यामुळे मला जेवणानंतर दुपारी झोपायची सवय लागलेली आहे. आता दोन-तीन दिवसांपासून आपली शाळा सुरू झाली आहे. पण इतक्या दिवसांची दुपारची झोपायची सवय कशी जाईल? त्यानुसार दुपारी मी डबा खाल्ल्यानंतर शाळेतील एका कोपऱ्यात झोपलो. शाळा सुटल्यानंतर मला कोणीही उठवलं नाही व मला आतमध्ये ठेवून शिपाईमामाने शाळा बंद केली. मला सात वाजता जाग आली. त्यानंतर शाळा उघडण्यासाठी मी मोठमोठ्याने अनेकदा आवाज दिला. पण या गरीब विद्यार्थ्याचं ऐकतो कोण? मग मी कोणाचा मोबाईल नंबर मिळतोय का हे शोधू लागलो. पाच-सहा तास माझं हे शोधकार्य सुरू होतं. शेवटी जान्हवी मॅडमच्या डायरीत तुमचा मोबाईल नंबर मला आढळला. त्यानंतर मी तुमच्या केबिनमधील लॅंडलाईनवरून फोन करतोय. त्यामुळं प्लीज उद्या शाळा लवकर उघड ना.’’ स्वप्नीलने काकुळतीने म्हटले. जान्हवी मॅडमचं नाव घेताच सर कावरेबावरे झाले.

‘बरं. बरं. बघतो काय करायचं ते.’ सरांनी म्हटले.

‘सर, मी शाळेत झोपल्यामुळं अडकलो होतो, असं माझ्या घरी कळवू नका. मला खूप मार पडेल. मी सरांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेलोय. त्यामुळं मुक्कामही तिकडेच करणार आहे, असा निरोप मी घरच्यांना दिलाय. तुम्ही फक्त वाढदिवसासाठी केक, मेणबत्ती व फुगे आणून ठेवा. मला आई-बाबांना दाखवण्यासाठी बर्थ डे बॉयसोबत एका ग्रुपफोटोची आवश्‍यकता आहे. प्लीज सर! माझ्यासाठी तेवढं करा.’’ स्वप्नीलने विनवणी केली. त्यावेळी परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या एकुलत्या एका मुलाची आठवण होऊन सर ओरडले, ‘तू आधी फोन ठेव.’

loading image
go to top