बायको हे अजब कोडे समजून घ्या थोडे थोडे!

‘अगं उरकलं का नाही तुझं? गेल्या दोन तासांपासून मी तुझी वाट पाहतोय.’ प्रदीपनं चिडून विचारलं.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘अगं उरकलं का नाही तुझं? गेल्या दोन तासांपासून मी तुझी वाट पाहतोय.’ प्रदीपनं चिडून विचारलं.

‘अगं उरकलं का नाही तुझं? गेल्या दोन तासांपासून मी तुझी वाट पाहतोय.’ प्रदीपनं चिडून विचारलं.

‘अहो सगळं उरकलंय. फक्त मॅचिंग बांगड्या आणि पर्स शोधतेय. तेवढं झालं की निघू.’ सोनालीनं असं म्हणताच प्रदीपने पुन्हा मोबाईलमध्ये एका तासासाठी डोकं खुपसलं. सोनालीच्या मावसभावाचं लग्न होतं. त्यामुळे ते पिंपरीला चालले होते.

‘अहो चला की. मी केव्हाच तयार झालीय. तुम्ही अजून मोबाईलमध्येच डोकं खुपसून बसलाय का? माझ्या माहेरचं लग्न म्हटलं की तुमच्या कपाळावर आठ्या उमटलेल्या हव्यातच का?’’ सोनालीनं असं म्हणताच प्रदीपने निमूटपणे मोबाईल खिशात टाकला व दार बंद करून तो घराबाहेर पडला. चारचाकी गाडी स्टार्ट करून तो मुख्य रस्त्यावर आला. सोनाली त्याच्या शेजारी बसली होती.

‘अहो, समोर नीट बघा. गाडी सावकाश चालवा. अहो ऽऽऽ त्या दुचाकीला धडकाल. अर्जंट ब्रेक दाबा.’ सोनालीच्या सूचनांनी प्रदीप वैतागून गेला. तरीही संयम ठेवून, त्याने मौन बाळगले.

‘अहोऽऽऽ लक्ष कुठंय तुमचं. स्कुटीवर तरूणी दिसली की लागले तिच्या मागंमागं गाडी घ्यायला. सोबत तुमची बायको आहे, ते तरी लक्षात घ्या...डाव्या बाजूने गाडी घ्या. हॉर्न वाजवा की. अहोऽऽऽ चढावरून गाडी सावकाश घ्या. गर्दीत कोठं गाडी घुसवताय. जोरात चालवा की. तो सायकलवाला तुमच्या पुढं गेला. तुमच्या या वेगानं आपण उद्यापर्यंत तरी लग्नाला पोचू का?’ सोनालीचा पट्टा चालूच होता.

‘अगं, तू स्वयंपाक करतेस, त्यावेळी मी काही सूचना करतो का? मुकाट्याने जे ताटात येईल ते खातो ना. तुला गाडी चालवण्यातलं काही कळत नसेल तर गप्प बस ना.’ प्रदीपने म्हटले.

‘माझ्या माहेरच्या कोणत्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की तुमची ही अशी चिडचिड होतेच. मी तुम्हाला चांगलं ओळखून आहे.’ सोनालीच्या या वाराने प्रदीपनं पुन्हा मौन धारण केलं. थोडं पुढं गेल्यानंतर गाडी पंक्चर झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.

‘अशी कशी गाडी पंक्चर झाली? माझ्या माहेरचा कोणताही कार्यक्रम असला की तुमची गाडी पंक्चर कशी होते.? तुमचं हे नेहमीचंच आहे..’

प्रदीपने निमूटपणे स्टेपनी काढून तो बदलायला लागला.

‘अहो नीट जॅक लावा. तुम्हाला जमेल ना स्टेपनी बदलायला, की मी माझ्या चुलतभावाला बोलावून घेऊ. आमच्या खानदानात एवढा हुशार मॅकेनिक झाला नाही. पंक्चरचं चाक नीट काढा. अहो किती वेळ लावताय. तिकडं माझ्या मावसभावाचं लग्न लागलं असेल....’ सोनालीच्या सूचनांचा भडिमार चालू होता.

तिला पाहून दोन महिला थांबल्या.

‘ताई, काही मदत हवी का?’ त्यातील एकीने विचारले.

‘मॅडम, प्लीज मी स्टेपनी लावेपर्यंत हिच्याशी गप्पा मारता का.’ प्रदीपने विनंती केली. त्यानंतर दोघीही गाडीवरून खाली उतरल्या.

मग शाळा कोठली, कॉलेज कोठलं? इथपासून माहेरच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर महागाई कशी वाढतेय इथपासून रोज आपली धावपळ कशी सुरू असते, यावर चर्चेची गाडी आली. तेवढ्यात प्रदीपने स्टेपनी बसवल्याचे सांगितले. मात्र, सोनालीने तिकडे दुर्लक्ष करून, गप्पा मारण्यात ती रमली.

‘अगं लग्नाला उशीर होतोय ना?’ प्रदीपने आठवण करून दिली.

‘कधीच्याकाळी आम्ही बायका निवांतपणे गप्पा मारतोय तर तुमच्या पोटात का दुखतंय? लग्न काय कुठं पळून चाललंय का? झाला तासभर उशीर तर बिघडतंय का?’ असं म्हणून त्यांच्या गप्पांनी पुन्हा वेग पकडला. प्रदीप मात्र डोक्यावर हात मारून, गाडीत जाऊन वाट पहात बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com