भावना ॲप’ टक्केवारीत ‘गॅप’

‘ताई, भावोजी येण्याच्या आतमध्ये माझी दृष्ट काढ. मी मोबाईलसाठी ‘भावना ॲप’ बनवलंय, ते पाहून फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गही माझ्यासाठी पायघड्या अंथरेल.
Panchnama
PanchnamaSakal

‘ताई, भावोजी येण्याच्या आतमध्ये माझी दृष्ट काढ. मी मोबाईलसाठी ‘भावना ॲप’ बनवलंय, ते पाहून फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गही माझ्यासाठी पायघड्या अंथरेल. पण तरीही मी त्याच्यासमोर ‘झुकणार’ नाही, आधीच सांगून ठेवतो.’ अमोलने खुशीत शीळ घालत म्हटले.

‘अरे आधी सांग तरी काय बनवलं आहेस. नाहीतर ‘जादूचा एअर फोन लावून पक्ष्यांची भाषा ओळखा’ या प्रयोगासारखं व्हायचं. नुसती कावकाव आणि चिवचिवाट ऐकून आठ दिवस डोकं उठलं होतं. पक्ष्यांचं एक अक्षर कळलं तर शपथ !’ माधवीने म्हटले.

‘अगं त्यात थोडी त्रुटी होती. पक्ष्यांची भाषा कळण्यासाठी त्यांनीही कानात एअर फोन लावणं गरजेचं होतं. पण पक्षांनी प्रतिसाद न दिल्याने तो प्रयोग थांबवावा लागला. पण आता तसं होणार नाही. आपण ज्याला फोन लावतो, त्या व्यक्तीविषयीच्या भावना आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर ग्राफच्या माध्यमातून प्रकट होतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी फोन लावणाऱ्याच्या मनात प्रेम असेल तर तेवढ्या टक्केवारीचा गुलाबी ग्राफ दिसतो. त्याच्याशेजारीच आपुलकी, माया, जिव्हाळा, राग-तिटकारा, द्वेष, मत्सर यांचेही ग्राफ विविध रंगात दिसतात.’

अमोलने लगेचच प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याने माधवीला लगेच फोन लावला. रिंग वाजत असतानात त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ग्राफ आला. त्यात आपुलकी, माया व जिव्हाळा यांचे ग्राफ शंभर टक्के दाखवत होते तर राग, तिटकारा, द्वेष यांचे प्रमाण शून्य टक्के होते.

‘ताई, हे बघ माझ्या मनातील तुझ्याविषयीच्या भावनांची टक्केवारी.’’ माधवीने तो ग्राफ पाहिल्यावर तिच्या चेहरा आनंदाने उजळला.

Panchnama
इंदापूर : शेतातील विहिरीत मगर आढळून आल्याने उडाली खळबळ

‘अमोल, तुझ्यासाठी मी गरमागरम कांदा भजी करते.’’ असे म्हणत खुशीतच माधवी किचनमध्ये गेली. थोड्यावेळात धीरज कामावरून घरी आला. अमोलला पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या पण चेहरा हसतमुख ठेवत त्याने प्रेमाने चौकशी केली. ही संधी साधून अमोलने धीरजच्या मोबाईलमध्ये ‘भावना ॲप’ इन्स्टॉल केले.

‘तुमच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत, हे मला बघू द्या. तुम्ही माझ्या मोबाईलवर फोन लावा.’’ माधवीने म्हटले.

‘तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेम आणि प्रेमच आहे. कृत्रिम साधनांवर कशाला विश्‍वास ठेवतेस?’ धीरजने सावध प्रतिक्रिया दिली. पण माधवी काही ऐकायला तयार नव्हती. तिने फोन लावायला सांगितला. त्यामुळे नाइलाजाने धीरजने तो लावला. त्यावेळी राग, तिटकारा, द्वेष यांचे ग्राफ शंभर टक्के दाखवत होते तर प्रेम पाच टक्के दाखवत होते. हे पाहून माधवीच्या रागाचा पारा चढला. ‘‘मला वाटलंच, तुमच्या मनात माझ्याविषयी फक्त राग आणि तिटकाराच आहे. हे आता पुराव्याने सिद्ध झालंय.’’ असे म्हणून ती हुंदके देत रडू लागली. थोड्यावेळाने ती शांत झाली. ‘‘तुम्ही आताच्या आता पल्लवीला फोन लावा. तुमच्या मनात तिच्याविषयी काय भावना आहेत, हे मला कळल्याच पाहिजेत.’’ मात्र, माधवीच्या या मागणीवर धीरजने बरेच आढेवेढे घेतले. मात्र, माधवीने आकांडतांडव केल्यानंतर त्याने फोन लावला. धीरजच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पल्लवीविषयी प्रेम व जिव्हाळा यांच्या टक्केवारीचा ग्राफ शंभर टक्के ओलांडून पुढे जाऊ इच्छित होता. तर राग, तिटकारा, द्वेष यांची टक्केवारी शून्य होती. तो ग्राफ पाहताच माधवीच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

‘तुम्ही मला फसवताय, असा संशय मला नेहमीच होता. आज मात्र माझ्या हाती पुरावा आलाय.’’ असे म्हणून ती स्फुंदून रडू लागली. त्या दिवशी धीरजला उपाशी झोपावे लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच अमोल घरी आला. ‘‘ताई, ‘भावना ॲप’मध्ये तांत्रिक बिघाड आहे. स्वतःच्या बायकोला फोन लावला तर राग व तिटकारा यांचा ग्राफ शंभर टक्के दाखवतोय व परस्त्रीला फोन लावला तर प्रेमाची टक्केवारी शंभर टक्के दाखवतोय. मी कालपासून दहा घरात भांडणं लावून आल्यानंतर हा उलगडा झालाय. मी आजच ही त्रुटी दूर करतो व शंभर टक्के खरोखरीच्या भावना कळतील, अशी व्यवस्था करतो.’’ अमोलचं हे बोलणं ऐकून हॉकीस्टिक घेऊन, धीरज त्याचा पाठलाग करू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com