बायको जाता बाजारी महाराज घरी राज करी

कडक निर्बंध लागू झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मोहन घरीच आहे. सलूनची दुकाने बंद असल्यामुळे त्याची केस व दाढीही अनिर्बंधपणे वाढली आहे.
Panchnama
PanchnamaSakal

कडक निर्बंध लागू झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मोहन घरीच आहे. सलूनची दुकाने बंद असल्यामुळे त्याची केस व दाढीही अनिर्बंधपणे वाढली आहे. बनियन फाटल्यामुळे नेहरू शर्टवर तो दिवस काढत आहे. त्याच्या या अवताराकडे बघून, त्याची बायको माधवी ‘आता संन्यास घेऊन, हिमालयात जा’ असे टोमणे मारू लागली आहे. (SL Khutwad Writes)

‘तुझ्यापासून शांतता मिळणार असेल, तर तेही मी आनंदाने करीन,’ असं मोहन एक-दोनदा पुटपुटला. माधवीला डिवचण्यासाठी गळ्यात रूद्राक्षाच्या माळा व कपाळाला भस्मही तो मुद्दाम लावू लागला.

आज सकाळी माधवी भाजीपाला आणण्यासाठी शेजारच्या गल्लीत गेली होती. भगवा नेहरू शर्ट व गळ्यात रूद्राक्षाच्या माळा घालून मोहन मोबाईलवर गेम खेळण्यात दंग झाला होता. तेवढ्यात सी विंगमधील सातपुते वहिनी माधवीला भेटण्यासाठी घरी आल्या. मोहनला या अवतारात त्यांनी ओळखले नाही. ‘महाराज, मी फार अडचणीत आहे. मला त्यातून सोडवा.’ सुरुवातीला वहिनी काय बोलत आहेत, हेच मोहनला कळेना. मात्र लगेचच त्याची ट्यूब पेटली.

‘बालिके, काळजी करू नकोस. तुझं सगळं व्यवस्थित होईल. तुझा नवरा सुधीर थोडंफार मद्यपान करतो. अधून-मधून जुगार खेळतो; पण त्याचा मित्र मोहनवर विश्‍वास ठेव. तोच या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल.’’

महाराजांचे हे बोलणे ऐकून वहिनींना आश्‍चर्य वाटले.

‘बालिके, तुझी मोठी मुलगी तनुजा दहावी पास होईल. तिला सायन्सला घाल. कसलाही अभ्यास न करता ती बारावी पास होईल. मुलगा बंटीला क्रिकेट खेळू दे. तो उद्याचा सचिन तेंडुलकर आहे, हे लक्षात ठेव.’’ मोहनने असे म्हटल्यावर वहिनींनी त्याचे पाय धरले.

‘महाराज, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. तुम्ही माझ्या नवऱ्याचं, मुलांचं भविष्य बरोबर सांगितलंत.

‘बालिके, तुझा स्वभाव चांगला आहे. मनमिळाऊ आहे. तुला इकडचं तिकडं करायला आवडत नाही. पण तुझी नणंद महाडॅंबीस आहे. ती तुला छळते. सासूला काहीबाही सांगून त्रास देते; पण त्यातूनही तुझी सुटका होणार आहे.’’ मोहनने असे म्हटल्यावर वहिनींचा चेहरा आनंदाने फुलला.

‘महाराज, यावर उपाय सांगा. काही गंडा-दोरा असेल तर तो द्या. काय उपास-तापास करायचे असेल तर तेही सांगा.’’ वहिनींनी असे म्हटल्यावर मोहनची कळी खुलली.

‘बालिके, जरा सबुरीने घे. तुझ्या नवऱ्याचा मित्र मोहनला तू फार तोडून बोलते. तसं करत जाऊ नकोस.

तो अतिशय चांगला आणि सभ्य माणूस असल्याने त्याचा आदर करत जा. त्या दोघांना कधी पार्टी करायची असेल तर मोठ्या मनाने परवानगी देत जा.’’ मोहनने असं म्हटल्यावर वहिनींनी मान डोलावली. त्यानंतर मोहनने वहिनींचा हात हातात घेऊन भविष्य सांगायला सुरुवात केली.

‘बालिके, तुझ्या हातावरील रेषेवरून लवकरच तुझे भाग्य उजाळणार असं दिसतंय. हातावरील उंचावट्यावरून तुला दीर्घायुष्य लाभणार असं दिसतंय. या लांबलचक रेषेचा अर्थ तुला परदेशी जाण्याचा योगही आहे. सत्ता, संपत्ती.....’’ तेवढ्यात माधवीने खिडकीतून मोहनने वहिनींचा हात हातात घेतल्याचे पाहिले. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. घाई घाईने ती घरात आली व रूद्रावतार धारण करून मोहनवर कडाडली.

‘मी घरात नसताना एका परक्या बाईचा हात हातात घेताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही...’’

‘ताई, या महाराजांनी माझं भविष्य अगदी खरं खरं सांगितलं. ’’

‘मला तुम्ही दोघं काय मुर्ख समजता काय? मी थोडा वेळ घराबाहेर गेले तर तुमची ही थेरं चालू. खरं खरं सांगा. कधीपासून हे चालू आहे....’’ असे म्हणत माधवीने गोंधळ घालायला सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com