ए शंकरपाळ्या....

Panchnama
Panchnama

खानदेशातील दोन लहान मुलांचे भांडण समाजमाध्यमावर कमालीचे व्हायरल झाल्याने गेल्या दोन- तीन दिवसांपासून शंकरपाळ्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. दिवाळीनंतर दुसऱ्यांदा प्रसिद्धीचा हा योग आल्याने शंकरपाळे एकदम खुश होते. मात्र, लाडू, करंज्या आणि चकल्यांना ही गोष्ट फारशी रुचली नाही. विशेषतः चकल्यांनी आपल्या काट्यांनी शंकरपाळ्यांना बोचकारून काढले. मग लाडूनेही शंकरपाळ्यांना धमकी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ए शंकरपाळ्या, एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागून बी द्यायचो नाय.’’ त्यावर अनारशांनी आपल्या सौम्य प्रकृतीनुसार सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गेली कित्येक वर्षे आपण गुण्या- गोविंदाने एकाच डब्यात नांदत आहोत. उगाचंच कशाला भांडताय.’’ मात्र, अनारशाचे हे बोलणे लाडूलादेखील आवडले नाही. तो म्हणाला, ‘‘दर दिवाळीत आम्ही फराळांची शोभा वाढवायची. घरच्या आणि पाहुण्यांच्या ताटात आम्हाला केवढा मोठा मान असतो. त्यावेळी हे शंकरपाळे कुठंतरी एका कोपऱ्यात पडून असते. त्याला कोणी विचारतही नाही. मग लहान मुलांसह अनेकजण गरम चहाच्या कपात, त्याला बुडवतात. त्याची तेवढीच औकात असते आणि आता आमच्यासमोर भाव खातोय.’’ त्यावर दुःखी अंतःकरणाने शंकरपाळे म्हणाले, 

‘लाडू, तुला फोडून काढण्यासाठी अनेकजण हातोडीचा वापर करतात. त्यावेळी माझ्या मनाला किती दुःख व्हायचे. अनेकदा तुला मी समजावून सांगायचो, की स्वभावात एवढा कडकपणा योग्य नाही. थोडा नरमपणा घे. लोकं हातोडीने तुझे तुकडे करतात. लहान मुले क्रिकेटचा बॉल म्हणून तुझा वापर करतात तर काही महिला नवऱ्यावर सूड घेण्यासाठी तुझा वापर करतात. हे टाळण्यासाठी स्वतःमध्ये नरमपणा आण, असा सल्ला मी तुला प्रेमापोटीच दिला आहे ना. मग माझ्याविषयी असा आकस का बाळगतो.’’ त्यावर लाडू रागाने लालबुंद झाला. मात्र, आधीच्याच लाल रंगामुळे हा लालबुंदपणा दिसला नाही.

‘ए शंकरपाळ्या, मला अक्कल शिकवू नकोस. माझ्या कडकपणाविषयी बोलतोस आणि तू नाही का कडकपणाने वागत. तुझ्यामुळे अनेकांचे दात तुटले आहेत. डेंटिस्‍ट लोकांचा व्यवसाय तूच वाढवतोस, हे विसरू नकोस.’ त्यावर चकल्यांनी आपल्याभोवतीचा वेढा आणखी आवळला व करंज्यांना ढोसलले. ‘‘अगं, तू बोल की काही तरी. सतत आपलं ‘पोटात गोड सारण आणि ओठावर गोड बोलणं’ असतं. कधीतरी भूमिका घ्यायला शिक की.’’

‘तुझ्यासारखं तिखट वागणं आणि बोलणं मला बाई नाही जमणार. मी आपली मऊपणाने राहून, गोडच बोलणार. आताही तुम्ही सगळ्यांनी भांडण थांबवा. शंकरपाळ्याच्या प्रसिद्धीने माझ्या पोटात काही दुखत नाही कारण माझ्या पोटात गोड सारण भरलं आहे तसं तुम्ही पोटात आणि ओठात गोडवा ठेवा.’’ करंजीने असं म्हटलं. शंकरपाळ्यांनीही ‘धन्यवाद ताई’ असे म्हणत तिचे भार मानले.

तेवढ्यात त्या घरची गृहिणी आली व डब्यातील फराळ एका ताटात काढून ठेवला व पाहुण्यांना म्हणाली, ‘अहो, मी एवढ्या कष्टाने फराळ करते पण ‘हे’ आणि मुले त्याला अजिबात तोंड लावत नाहीत. मग फेकून देण्यापेक्षा असा कोणाला तरी द्यावा लागतो. तुम्ही खा ना. अजिबात संकोच करू नका. फराळ संपण्याची मी अजून दोन दिवस वाट पाहणार आहे. नाही संपला तर शेजारच्या मंदिरात बसणाऱ्या भिकाऱ्यांना देणार आहे. अहो, तेवढंच पुण्य. पण तुम्ही लाजू नका. घ्या लाडू घ्या. करंज्या घ्या.’’

त्या महिलेचे हे बोलणे एकून ताटातील करंज्या, चकली आणि लाडूने लाजेने माना खाली घातल्या. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com