पायमोजे ते साडी भलतीकडेच गेली गाडी...

‘अहो, तुमचे पायमोजे किती फाटलेत. मला ते धड इस्त्रीही करता येत नाहीत. चांगल्या क्वालिटीचे पायमोजे घ्या ना.’ स्मिताने असा आग्रह धरताच परेशला आश्चर्य वाटले.
Panchnama
PanchnamaSakal

‘अहो, तुमचे पायमोजे किती फाटलेत. मला ते धड इस्त्रीही करता येत नाहीत. चांगल्या क्वालिटीचे पायमोजे घ्या ना.’ स्मिताने असा आग्रह धरताच परेशला आश्चर्य वाटले. ‘पायमोज्यांना ही खरंच इस्त्री करते की काय?’ अशी शंका त्याला आली.

‘अगं ऑफिसमधील कामामुळे मला वेळच मिळत नाही. आता दिवाळीत नवीन पायमोजे घेतो.’ परेशने म्हटले. ‘तुमच्या अशा वागण्याने तुम्ही माझी इज्जत घालवता. माझ्या माहेरची माणसं तुम्हाला नाही, मला नावे ठेवतात. मागे वास्तूशांतीच्या पूजेला तुम्ही भोकं पडलेला बनियन घातला होता. त्यावेळी माझ्या माहेरची माणसं किती हसत होती, ते आठवा.’ स्मिताने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘आज आपण लक्ष्मीरोडला पायमोजे खरेदी करायला जायचं.’ स्मिताने आदेशच काढला.

‘अगं कायतरीच काय ! फक्त पायमोजे घेण्यासाठी कोणी लक्ष्मीरोडला जातं का? त्याऐवजी रस्त्यात पन्नास रुपयांना दोन जोड्या भेटतात. त्याच मी घेतो.’ परेशने असं म्हटल्यावर स्मिताने त्याला विरोध केला व त्याची समजूत घातली. मग दोघेही लक्ष्मीरस्त्यावरील एका मोठ्या दुकानात आले.

‘चॉकलेटी कलरचे पायमोजे दाखवा,’’ स्मिताने असं म्हटल्यावर सेल्समनने पायमोज्यांचा ढीग त्यांच्यासमोर घातला. ‘आम्ही कोथरूडवरून तुमच्या दुकानात फक्त पायमोजे नेण्यासाठी आलोय. आम्ही खरेदीसाठी तुमच्याशिवाय कुठंऽ ऽ कुठंऽ ऽ जात नाही, एवढं लक्षात ठेवून किंमती कमी लावा.’’ स्मिताने मालकासकट सेल्समनला ऐकवलं. ‘आता ही काय मागील दिवाळीतील टॉवेल खरेदीची टेप लावते काय? अशी भीती परेशला वाटली. पण त्याच्या सुदैवाने तसं काही झालं नाही. स्मिताने त्या ढिगाऱ्यात हात घालून ‘याच्यात व्हरायटी दाखवा.’ ‘तुमच्याकडे लोकरी पायमोजे नाहीत का?,’ ‘ब्राऊन कलर दाखवा’ ‘शी’ हे किती भडक रंगाचे पायमोजे आहेत, दुसरे दाखवा’ ‘याच्यापेक्षा कमी साईजचे दाखवा’ ‘असले फालतू आणि स्वस्त नको, चांगले ब्रॅंडेड दाखवा’, ‘या पॅटर्नमध्ये दाखवा’, प्लेनमधील व्हरायटी बाहेर काढा’, ‘यांच्या रंगाला मॅच होतील, असे पायमोजे दाखवा’, असं म्हणून त्या सेल्समनला तासभर कामाला लावलं.

‘अगं पायमोज्यांवर मी बूट घालणार आहे, हे तुझ्या लक्षात आहे ना? मग एवढा वेळ कशाला घालवतेस? तसंही पायमोज्यांकडे कोण बघतंय.? बरं एवढा वेळ आणि पैसे खर्च करुन पायमोजे खरेदी केले तर ऑफिसमधील प्रत्येकाला ‘मी ब्रॅंडेड पायमोजे घेतले, मी ब्रॅंडेड पायमोजे घेतले, असं दाखवत बूट काढून हिंडू का?’ परेशने स्मिताच्या कानाशी लागत म्हटले. त्यावर स्मिताने त्याला डोळ्यांनी दटावत पायमोजे बघण्याचे काम सुरुच ठेवले. दोन तास झाल्यानंतरही तिचा उत्साह कमी झाला नव्हता. शेवटी ‘‘छे बाबा! तुमच्या दुकानात मनासारखे पायमोजेही भेटत नाहीत. तुम्ही जम्मू-काश्मीरवरून पायमोजे मागवा. आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा येतो’, असे म्हणून ते दोघेही दुकानातून बाहेर पडले. ‘‘आता इतक्या लांब आलोच आहोत तर साड्या व ड्रेस फक्त बघू,’’ असे म्हणून स्मिता एका दुकानात शिरली. अर्ध्या तासानंतर ती बाहेर आल्यानंतर तिच्या हातात चार साड्या, तीन ड्रेस व दोन टॉप होते. ‘पुढच्या आठवड्यात आपण परत येथे येऊ, पण तरीही चांगले पायमोजे मिळाले नाहीत तर आपण कॅंपमधून घेऊ,’ असे म्हणून स्मितानं तिच्याजवळचं ओझं परेशच्या हातात दिलं. अन् पुढच्या आठवड्यात परत येथे यायला लागू नये म्हणून परेशने तातडीने पायमोजे ऑनलाइन मागवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com