मना रे मना... जय हरी म्हणा

‘तुम्ही जेवून घ्या. तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय,’’ सोनलचे हे वाक्य ऐकून प्रदीपच्या पोटात गोळा आला. कसनुसं तोंड करीत तो ‘हंऽ होऽ होऽऽ म्हणजे मी...’ असं म्हणत ‘ततपप’ करू लागला.
Panchnama
PanchnamaSakal

‘तुम्ही जेवून घ्या. तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय,’ सोनलचे हे वाक्य ऐकून प्रदीपच्या पोटात गोळा आला. कसनुसं तोंड करीत तो ‘हंऽ होऽ होऽऽ म्हणजे मी...’ असं म्हणत ‘ततपप’ करू लागला. त्याच्या आवडीची भाजी भरलेलं वांगं असूनही, त्याला पोट भरल्यासारखं वाटू लागलं. एक घास खायला त्याला दहा मिनिटे लागू लागली. प्रत्येक घासागणिक ‘काय बरं हिला बोलायचं असेल’ य‍ा विचाराने तो अस्वस्थ झाला. काल आपली जुनी मैत्रीण शलाका भेटली होती. तिला घेऊन आपण लंचला बाहेर गेलो होतो, हे हिला कोणी तरी सांगितलं असावं.

शलाकावरुन मागे दोन वेळा भांडण झालं होतं. परत आपण तिला कधीही भेटणार नाही, अशी शपथ घेतली होती, याचीही त्याला आठवण झाली. या विषयावर सोनल काही बोलली तर आपण सरळ कान पकडून, उठाबशा काढून माफी मागायची, हेही त्याने ठरवले. परवाच्या ओल्या पार्टीचं हिच्या कानावर तर आलं नसेल? दत्तूनं तर चुगली केली नसेल? दारू पिऊन ‘जलेबीबाई...’ या गाण्यावर आपण बेफाम नाचल्याचा व्हिडिओ तर तिने पाहिला नसेल? तसं असेल तर सरळ आपण तिची माफी मागायची आणि गळ्यात तुळशीची माळ घालून ‘आता सगळं सोडलं’ असं जाहीर करायचं, हे त्याने ठरवलं. सोनलच्या भावाला जमीन खरेदीत आपण एक लाखाला गंडा घातल्याचे तर उघडकीस आले नसेल ना? म्हादू खवीसने तर चहाडी केली नसेल ना? तसं असेल तर आपण मुकाट्याने मेव्हण्याला एक लाख रुपये देऊन टाकायचे, हे त्याने ठरवले.

‘अहो, भाकरी आणू का?’ सोनलने तीन वेळा म्हटल्यावर प्रदीप भानावर आला. ‘सॉरी, रियली सॉरी. मला भाकरी नको. खरंच नको. सॉरी.’ प्रदीपने खाली मान घालून म्हटले. भाकरी नको म्हणतानाही प्रदीपने सॉरी म्हटल्याने सोनलला आश्चर्य वाटले. मग तिने भात वाढला आणि प्रदीप परत विचारात मग्न झाला. शेजारच्या मानसी वहिनींनी तर आपली तक्रार हिच्याकडे केली नसेल ना? अशी त्याला शंका आली. तीन-चार वेळा आपण त्यांना व्हॉट्सॲपवर 'J 1' झाले का? असे विचारले होते. पाच-सहा वेळा ‘नाईस डीपी’ असे म्हटले होते. एक-दोन वेळा ‘सो ब्यूटीफुल’ असे म्हटले होते. तर एकदा ‘या ड्रेसवर तुमचं सौंदर्य खुलून दिसतंय’ असा मेसेज पाठवला होता.

त्यांना हे आवडत नसेल तर माझ्या मनात ‘तसं’ काही नव्हतं बरं का! असे म्हणून या विषयावर कायमचा पडदा टाकायचा, असे त्याने ठरवले. मग कसंबसं जेवण उरकून फडकं घेऊन ‘गाडी पुसून येतो’ असं म्हणून तो पार्किंगमध्ये धावतच आला. ‘आज आपलं काही खरं नाही’ या विचाराने तो गाडी पुसत राहिला. तीन वाजले, चार वाजले, पाच वाजले तरी तो गाडी पुसतच होता. शेवटी सहा वाजता सोनल खाली आली व त्याला घरी आणले. ‘अहो, माझी भाची श्रद्धाचं येत्या रविवारी लग्न आहे. पण पन्नास जणांनाच लग्नाला येता येणार आहे. त्यामुळे बाबा म्हणत होते की दोघांपैकी एकानेच लग्नाला या. तेव्हा म्हटलं, जेवणानंतर या विषयावर तुमच्याशी बोलावं.’ सोनलचे हे बोलणे ऐकून प्रदीपने मोठा नि:श्वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com