नवरा-बायकोचं भांडण अन् घराची ‘साफसफाई’

‘तुला माझ्याबरोबर यायचंय की नाही, हे एकदा फायनल सांग.’ संदीपने रागात विचारलं.
Panchnama
PanchnamaSakal

‘तुला माझ्याबरोबर यायचंय की नाही, हे एकदा फायनल सांग.’ संदीपने रागात विचारलं.

‘मला जमणार नाही.’ सुरेखाने असं म्हटल्यावर संदीपने तिच्या दोन कानाखाली लावल्या. मग सुरेखाने आरडाओरड केली. दोघांच्या भांडणामुळे रस्त्याने जाणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी झाली. मुख्य रस्त्यावर हे एकटंच घर दिमाखात उभे होते. आसपास घरांची वा दुकानांची गर्दी नव्हती. त्यामुळे भांडण बघणारेही एकमेकांना अनोळखी व दूरच्या गावचे होते.

‘आरं का मारतुयास बायकोला? जरा सबुरीने घे की.’ गर्दीतील एका ज्येष्ठ नागरिकाने संदीपला दटावले.

‘मारू नको तर काय पूजा करू? मी शिक्षक असून, माझी बदली एका दूरच्या खेड्यात झाली आहे. कालपासून मी तिला सांगतोय. आपल्याला त्या गावात रुजू व्हायचंय. पण ती ऐकायलाच तयार नाही. मी तुमच्याबरोबर त्या खेड्यात राहायला येणार नाही, असंच तिचं चालूय. मग मी काय करावं?’ हताश होत संदीपने विचारले.

‘मला खेड्यात राहायची सवय नाही. मी अजिबात येणार नाही.’ संगीताने पुन्हा असं म्हटल्यावर संदीप तिच्या अंगावर धावून गेला. त्याला दोघा-तिघांनी अडवला.

‘घरातील सामान नेण्यासाठी मी आज टेंपो घेऊन आलोय तर ही म्हणतेय, घराची चावी हरवलीय. माणसानं न येण्यासाठी किती बहाणे करावेत, याला काय मर्यादा?’ चिडून संदीपने विचारले.

‘मग मी काय खोटं बोलतेय का? मी मैत्रिणीला भेटायला गेले होते. त्यावेळी घराची चावी हरवली. त्याला मी काय करु?’ संगीताने असं विचारल्यावर संदीपचा राग अनावर झाला.

‘किती खोटं बोलशील? तुला माझ्याबरोबर यायचं नाही म्हणून काहीही कारणं सांगतेस काय?’ संदीपने म्हटले. त्यानंतर गर्दीतील दोघं -तिघं पुढे आली.

‘जिथं नवऱ्याची बदली होईल, तिथं बायकोनं गेलंच पाहिजे. संसाराच्या रथाची नवरा-बायको ही दोन चाकं आहेत. एकानं रुसून बसलं तर दुसऱ्यानं काय करायचं?’ अशी समजूत त्यांनी काढली. संगीताला बरंच समजावल्यानंतर ती अखेर संदीपबरोबर जायला तयार झाली. पण तिच्याकडून खरंच चावी हरवलीय, याची खात्री पटल्यानंतर गर्दीतील दोघांनी दगडांच्या मदतीने कुलूप तोडले. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, कुलर, सोफासेट असे बरेच जड सामान घरात होते. दोघांचे परत भांडण होऊ नये म्हणून गर्दीतील चार-पाच जणांनी पुढाकार घेऊन, ते टेंपोमध्ये चढवले. संदीपने कपाटातील महत्त्वाच्या वस्तू व दागिने ताब्यात घेतले. लोकांनी मदत केल्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत टेंपो भरला. संदीपने सगळ्यांचे आभार मानले. संगीताने वडिलधाऱ्यांना वाकून नमस्कार केला. ते पाहून ज्येष्ठांच्या डोळ्यात पाणी आलं. ‘आपलीच लेक नांदायला चाललीय,’ अशी भावना त्यांच्या मनात आली.

‘पोरी, काळजी घे. सारखं भांडत जाऊ नकोस’. नवऱ्याबरोबर सुखाचा संसार कर.’ असा भरघोस आशीर्वाद तिला दिला. त्यानंतर टेंपो तिथून लगेच गेला. ‘एक संसार मोडता मोडता आपण वाचवला,’ याचं समाधान प्रत्येकाच्या डोळ्यात होतं. अर्ध्या तासानंतर दुचाकीवरून तिथं एक जोडपं आलं. घराची अवस्था पाहून दोघेही सैरभैर झाले. ‘अगं आपल्या घरावर दिवसाढवळ्या दरोडा पडला दरोडा. आपण बरबाद झालो,’ असे म्हणत दोघेही मटकन खाली बसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com