प्रिया आज आली मैफिलीत माझ्या...

Panchnama
Panchnama

हल्ली आम्ही रोज भल्या पहाटे साडेनऊच्या सुमारास मोटारसायकलवरून तळजाई टेकडीवर फिरायला जातो. ‘आज येताना आम्ही केस कापून येणार आहोत. त्यामुळे थोडा उशीर होईल’, असा घरी निरोप देऊन, ट्रॅकसूट व बूट घालून बाहेर पडलो. तळजाईवरून साडेदहाच्या सुमारास घरी येताना पेट्रोल संपल्याने नेमकी गाडी बंद पडली. त्यामुळे बालाजीनगरच्या पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेऊ लागलो. धनकवडीत आल्यानंतर केस कापण्यासाठी दुकान शोधू लागलो. मात्र, नेमकी आज २५ तारीख असल्याने सगळीच दुकाने बंद होती. त्यामुळे गाडी ढकलत पुन्हा बालाजीनगरच्या दिशेने जाऊ लागलो. अकरा वाजल्याने उन्हाचा चटका बसू लागला. त्यातच गाडी ढकलून- ढकलून अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. केस वाढले असल्याने व अजून अंघोळ झाली नसल्याने आमचा अवतारही प्रेक्षणीय झाला होता.

खुशबू हॉटेलजवळ आल्यानंतर कॉलेजमधील मैत्रीण प्रिया भेटली. मला झरकन जुने दिवस आठवले. प्रियाच्या प्रेमात आम्ही आकंठ बुडालो होतो व तिच्याशी लग्न करायचीही आमची इच्छा होती. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला होता. नाही म्हटले तरी तिला पाहिल्यानंतर ही दुःखाची खपली निघाली. मात्र, चेहऱ्यावर तसे दाखवले नाही. 

‘प्रिया, चल चहा- कॉफी काही तरी घेऊ’’ असे आम्ही म्हटले व गाडी रस्त्यावर पार्क केली. आमचा अवतार बघून, ती नाराज असल्याचे दिसले. पण काही न बोलल्याने आम्ही खुलासा करण्याच्या फंदात पडलो नाही. आम्ही स्पेशल मसाला डोसा व कॉफी मागवली. सहज गप्पा मारता- मारता आम्ही आमची माहिती दिली. पंधरा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज, कात्रजच्या ग्रीन सोसायटीत थ्री बीएचके फ्लॅट, क्रेटा ही आलिशान गाडी अशी माहिती आम्ही दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कॉलेजमध्ये असताना तू मला होकार द्यायला पाहिजे होतास. तुला राणीसारखी ठेवले असते.’’ आम्ही म्हटले. त्यावर तिच्याही मनात चलबिचल झाली. आपला निर्णय चुकला, अशी भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली आणि आम्हालाही मानसिक समाधान वाटले. तेवढ्यात वेटर दोनशे वीस रुपयांचे बिल घेऊन आला. पाकीट काढण्यासाठी आम्ही खिशात हात घातला तर ट्रॅकसूट असल्याने त्यात पाकीटच नव्हते. आम्हाला पुन्हा घाम फुटला. कसनुसे हसत आम्ही म्हटले, ‘‘अगं प्रिया, पाकीट मी घरीच विसरलोय, तेवढं बिल....’’ नाराजीने का होईना प्रियाने वेटरला अडीचशे रुपये दिले. बाहेर कसला तरी गलका झाल्याने आम्ही बाहेर आलो तर ट्रॅफिक हवालदार माझी गाडी नो पार्किंगमध्ये उभी केली म्हणून तीन-चार जणांच्या मदतीने टेंपोमध्ये ठेवत होते. आम्ही पळत- पळत गेलो. ‘‘माझी गाडी आहे,’’ असे आम्ही म्हटले. 
‘आधी दोनशे रुपये दंड भर.’’ आमच्या अवताराकडे बघून हवालदाराचा आवाज आपसूक चढला.  

‘अहो, गाडीत पेट्रोल भरायला पैसे नाहीत. हॉटेलचे बिलही त्या तरुणीने दिले आहे. वाटल्यास तिला विचारा. दोनशे रुपये कोठून आणू?’’ आम्ही गयावया करत म्हटले. त्यावर हवालदारसाहेब आमच्यावर आणखी डाफरले. 
त्यावर प्रिया जवळ आली. ‘‘कॉलेजमध्ये असताना खोटं बोलून, दुसऱ्यावर इंप्रेशन मारायची तुझी सवय अजून गेलेली दिसत नाही. बरं झालं मी तुला त्याचवेळी नकार दिला.’’ असे म्हणून प्रिया ताड् ताड् पाय वाजवत निघून गेली आणि इकडे आम्ही पैशाचं पाकिट विसरलो म्हणून स्वतःच्याच कानाखाली ताड् ताड् वाजवल्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com