गुलाबाच्या फुलाने नवरदेवच ‘फूल’

दर महिन्याला पाचशे रुपयांचा मोबाईल रिचार्ज मारून व एकावेळी दोनशे- अडीचशे रुपयांच्या कॅडबऱ्या देऊनही पल्लवी प्रेमाला होकार देत नसल्याचे पाहून प्रदीप खचला होता.
Propose
ProposeSakal

दर महिन्याला पाचशे रुपयांचा मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) मारून व एकावेळी दोनशे- अडीचशे रुपयांच्या कॅडबऱ्या देऊनही पल्लवी प्रेमाला (Love) होकार देत नसल्याचे पाहून प्रदीप खचला होता. ‘माझे वडील खूप शिस्तप्रिय आणि जमदग्नीचे अवतार आहेत. ते म्हणतील, त्याच मुलाशी मी लग्न करणार’ या तिच्या वाक्याने तो नाराज झाला. पण जोपर्यंत पल्लवी एखाद्याच्या गळ्यात ‘हार’ घालत नाही, तोपर्यंत आपण ‘हार’ मानायची नाही, असा निर्धार त्याने केला. (SL Khutwad Writes about Red Rose Propose)

पल्लवीची बरेच दिवस गाठभेट झाली नाही म्हणून प्रदीपने तिच्या घरी जायचे ठरवले. चित्रपटाप्रमाणे गुडघ्यावर बसत, तिला गुलाबाचे फूल देत प्रपोज करायचे, असा त्याने ठरवले. त्यानुसार तो घरी पोचला. बेल वाजवल्यानंतर दारातच तिला फूल द्यायचे, असे त्याने ठरवले. मात्र, दारात तिच्या वडिलांना पाहून त्याची बोबडीच वळली.

‘गुलाबाचे फूल पाच रुपयांना आहे. घेता का’’? त्याने प्रसंगावधान राखत म्हटले.

‘फेरीवाल्यांना मनाई आहे ! ही पाटी काय आम्ही शोभेसाठी लावलीय का? चल निघ येथून.’’ पल्लवीचे वडील त्याच्यावर खेकसले व लगेचच त्याच्या तोंडावर दरवाजा आपटला. भावी सासऱ्यांबरोबर आपला संवाद असा होईल, याची त्याला कल्पना नव्हती. ‘या अपमानाचा बदला या घरचा जावई होऊनच घेईन,’ असा पण प्रदीपने त्याच ठिकाणी केला. त्यानंतर प्रयत्‍नांची बरीच पराकाष्ठा केल्यानंतर अखेर पल्लवीने त्याच्या प्रेमाला होकार दिला. शेवटी त्यांचं लग्नाचंही ठरलं. पळून गेल्याशिवाय आपलं लग्न होणार नाही, याची पल्लवीला खात्री होती. मात्र ‘आपण एकदा बाबांशी बोलू, त्यांनी नाही म्हटलं तर पळून जाऊ’, असा पर्याय त्याने दिला. त्यानुसार प्रदीप पल्लवीच्या घरी गेला.

Propose
जगावं की मरावं ? सनईच्या सूरांची कळी कोमेजली

‘पाच रूपयांत गुलाबाचे फूल विकणाऱ्या व्यक्तीची माझ्या मुलीशी लग्न करायची लायकी आहे का? तुझी डेअरिंग कशी झाली? चल निघ इथून,’’ असे म्हणून पल्लवीच्या बाबांनी त्याला हाकलून दिले. या अपमानाने प्रदीप इरेला पेटला. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन आखला. रात्री अकराच्या सुमारास प्रदीप मोटार घेऊन, पल्लवीची वाट पाहत थांबला. पल्लवी सगळ्यांची नजर चुकवत खाली आली. त्यानंतर त्यांनी लगेचच आळंदी गाठली. त्यावेळी पल्लवीच्या बॅगेत बाबांची चिठ्ठी सापडली.

‘प्रिय पल्लवी, बॅग भरताना तुझी महत्त्वाची कागदपत्रे विसरून गेली होतीस. पळून जाऊन लग्न करताना ही कागदपत्रे आवश्‍यक असतात. बॅगच्या डाव्या बाजूला ती ठेवली आहेत. कोरोनाच्या काळात लग्न करणं खूप त्रासाचं व खर्चाचं काम आहे. पोलिसांची परवानगी घ्या, अनेकांचे रूसवे- फुगवे सांभाळा, लग्नाचा खर्च कमी म्हणून दागदागिने जास्त द्या, त्यातच हॉलचं भाडं व जेवणाचा खर्च काही चुकत नाही. एवढं करूनही पोलिसांचा ससेमिरा मागं लागू शकतो. हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही पळून जाऊन लग्न करावं, यासाठी माझा अट्टहास होता. सुदैवाने माझी योजना यशस्वी झाली. दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

ता. क. - प्रदीपराव, दोन वर्षांनी तुम्ही माझ्या घरी धोंडेजेवणासाठी याल, तेव्हा गुलाबाचं एकच फूल काय पण गुलाबांच्या पुष्पगुच्छाने मी तुमचे स्वागत करतो की नाही बघा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com