Panchnama
Panchnama

मोगॅम्बो खुश हुआ, याड लागलं बुआ!

आयुष्यात वेगळं काही तरी संशोधन करून, मानवजातीच्या कल्याणासाठी आपला देह झिजवायचा, हे सौरभचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. आईनस्टाईन, न्यूटन, स्टीफन हॉकिन्स हे त्याचे आदर्श होते. त्यांचे फोटो तो नेहमी खिशात ठेवायचा. नंतर त्यांचे लॉकेट बनवून तो गळ्यातही अडकवू लागला. पण बरीच वर्षे संशोधन कशावर करायचं, याचं संशोधन करण्यातच गेल्याने अनेक जण त्याला रिकामटेकडा म्हणत हिणवू लागले होते. मात्र, मोठं व्हायचं असेल, तर टाकीचे घाव सोसावेच लागतात. याबाबत व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या अनेक तज्ज्ञांचे लेख त्याने वाचले असल्याने त्याच्या मनावरचा ताण हलका झाला. अमेरिकेतील बर्कले लॅब आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी माणूस गायब करणारा शर्ट शोधल्याची बातमी त्याने वाचली आणि बसल्या जागी त्याने टुणकन उडी मारली. आपणही असा ‘सुखी माणसाचा सदरा’ बनवायचा, हेच त्याचे ध्येय ठरले होते.

आपणही माणूस गायब करणारे यंत्र शोधायचे, असा ध्यास त्याने घेतला. प्राथमिक तयारीसाठी त्याने जुना ‘मि. इंडिया’ पाहायला सुरुवात केली. त्यात घड्याळ चालू केल्यानंतर अनिल कपूर गायब व्हायचा. हे दृश्‍य त्याला खूपच आवडले; पण त्याहीपेक्षा अमरिश पुरीचा ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग त्याला खूपच आवडला. एखादी सुंदर मुलगी दिसो, नाहीतर जेवण आवडलं असो ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग तो सतत मारू लागला. त्यामुळे मित्रांसह घरातील मंडळीही त्याला वैतागली होती. त्यातच कसल्यातरी मिश्रणांची त्याने अंगठी बनवली व ती घातल्यानंतर आपण गायब होतो, असे सौरभने सांगितले. त्यानंतर त्याने मित्रांसोबत चाचणी घेतली. सौरभने बोटात अंगठी घातल्यानंतर त्याने ती लोखंडावर घासली. त्याचक्षणी मित्रांनी ‘सौरभऽऽ सौरभऽऽ तू कोठे आहेस? आम्हाला दिसत नाहीस’ असे म्हणत गलका केला. 
पाच-सहा मिनिटांनी सौरभने अंगठी काढून घेतली. ‘‘अरे आता दिसतोय का?’’ असे त्याने म्हणताच मित्रांनी जल्लोष केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सौरभ, ग्रेट ग्रेट’ असे म्हणत त्यांनी त्याला उचलून घेतले. इतक्या दिवसांच्या मेहनतीला फळ मिळाल्याने सौरभ भारावून गेला. त्याने लॉकेटमधील त्याच्या गुरूंना पुन्हा वंदन केले. ‘आता आपण असेच एखाद्या मोठ्या स्वीट होममध्ये जाऊ. तिथे सौरभ गायब होऊन, बरीच मिठाई वगैरे घेईल. त्यानंतर आपण मौजमजा करू.’ स्वप्नीलच्या या प्रस्तावावर सगळ्यांनी होकार दिला. त्यानंतर ही सगळी मंडळी ‘आलिशान स्वीट होम’मध्ये आली. सौरभने तिथे अंगठी घासली व रुबाबात आतमध्ये शिरला. आपल्याला कोणीच पाहत नाही, या खुशीत त्याने शीळ घातली व कंदी पेढ्यांच्या ढिगाऱ्यात हात घालून, एकाच वेळी दहा-बारा पेढे तोंडात घातले. त्यानंतर वेगवेगळ्या मिठायांच्या ढिगाऱ्यात हात घालून, त्यावर तो ताव मारू लागला. त्यानंतर लगेचच एका मोठ्या पिशवीत तो मिठाई भरू लागला. तेवढ्यात दुकानातील दोन-तीन कर्मचाऱ्यांनी सौरभची बकोटी धरली. ‘‘काय घरचा माल आहे का? काय लाजबीज वाटते का? ’’ असे म्हणून त्याला फटके टाकले. ‘अहो मी 

गायब आहे’ असे सौरभ म्हणू लागला; पण तोपर्यंत त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव सुरू झाला. ‘अहो, मी गायब आहे, माझ्या मित्रांना विचारा’ असे सौरभ ओरडू लागला; पण त्याच्या मित्रांनी तर कधीच धूम ठोकली होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com