भटक्या कुत्र्यांचं प्रशिक्षण

‘क्काय ! भटक्या कुत्र्यांच्या छळाला कंटाळून नोकरी सोडत आहेस? तुला काय पिसाळलेलं कुत्रं तर चावलं नाही ना’? दिलीपने मनोजची खरडपट्टी काढत विचारले.
Dogs
DogsSakal

‘क्काय ! भटक्या कुत्र्यांच्या छळाला कंटाळून नोकरी सोडत आहेस? तुला काय पिसाळलेलं कुत्रं तर चावलं नाही ना’? दिलीपने मनोजची खरडपट्टी काढत विचारले.

‘रोज रात्रपाळीवरून येताना कुत्र्यांचा काय त्रास होतो, हे तुला कसं कळणार? स्वारगेटच्या चौकात दोन- तीन कुत्रे तरी माझ्या दुचाकीचा पाठलाग करून, हल्ले करतात. त्यानंतरही पुढच्या दोन- तीन चौकात हा प्रकार घडतो. हा हल्ला चुकवण्याच्या प्रयत्नात मी दोन- तीन वेळा गाडीवरून पडलोय. बरं रस्ता बदलून पाहिला तरी कुत्र्यांचा ससेमिरा काही कमी होत नाही. त्यामुळे ही नोकरीच सोडून द्यावी, असा विचार मी करतोय.’ मनोजने रडवेला चेहरा करीत म्हटले.

‘पगारवाढ मिळेना, बॉसचा त्रास, कामाचं प्रेशर, दुसरीकडे संधी यामुळे अनेकजण नोकरी सोडून देतात पण कंपनीबाहेरील कुत्र्यांमुळे नोकरी सोडावी लागणारा जगातील तू पहिलाच असशील.’ असे म्हणून दिलीप हसला.

‘हे बघ, काही काळजी करू नकोस. कुत्र्यांना प्रशिक्षण देणं हा माझा व्यवसाय आहे. अनेक दांडग्या आणि आक्रमक कुत्र्यांना मी सुतासारखे सरळ केलंय. त्यामुळे माझ्यापुढं ही भटकी कुत्री म्हणजे किस झाड की पत्ती. मी त्यांना असं काही ट्रेनिंग देईल की तूच काय पण कोणाचाही पाठलाग ती करणार नाहीत.’’ दिलीपने म्हटले. त्यानंतर मनोजने निःश्‍वास सोडला. ‘भटकी कुत्री अंगावर धावून आली की आपण जाग्यावर थांबायचं. त्यांच्याशी लाडंलाडं बोलायचं.अले शोन्या ! काय कलतो. तुला भूक लागली का? थांब हं मी तुला खाऊ देतो, असे म्हणून बिस्किटे खाऊ घालायची. दूध- चपाती कुस्करून देणार असशील तर उत्तम. त्यामुळं ती आपलीशी होतात. भुंकायचे सोडून आपल्यापढे गोंडा घोळतात. तरीही काही कुत्री द्वाड असतात. त्यांना वेगळ्या पद्धतीने जाग्यावर आणावे लागते. मी तुला दोन- तीन दिवस प्रात्यक्षिक दाखवतो.’ दिलीपच्या बोलण्याने मनोजला धीर आला. नोकरी सोडायचा विचार त्याने रद्द केला. दुसऱ्या दिवशी रात्री एकच्या सुमारास दिलीप स्वारगेटच्या चौकात मोटारसायकल घेऊन थांबला. थोड्याच वेळात मनोजही आला.

‘मी आधी जातो. मग हे कुत्री माझा पाठलाग करतील. त्यानंतर मी त्यांच्याशी कसा वागतोय, हे नीट पहा. त्यानंतर तुला त्यांच्याशी वागायचंय.’ असं म्हणून दिलीपने गाडी स्टार्ट केली. चौकाच्या अलीकडेच पाच- सहा कुत्री रस्त्यावर बसली होती. दुचाकीचा आवाज ऐकून, ती सावध झाली व दिलीपचा पाठलाग करू लागली.

‘अले..अले थांबा.. असा भुंकू नका. पळू नका. मी तुमचा ट्रेनर आहे, हे पहा माझे आयडेंटी कार्ड,’ असे म्हणून त्याने ओळखपत्र दाखवले. एका कुत्र्याने जबड्यात त्याचा हात पकडला. ‘अले बिस्किट खा...’ असं दिलीप म्हणू लागला. मात्र, कोणीही त्याचे ऐकण्याच्या फंदात पडले नाही. एक कुत्रा त्याची पॅंट ओढू लागला तर दुसरा शर्ट ओढू लागला. बाकीच्या कुत्र्यांनीही जमेल तसा हल्ला करून, भुंकू लागली. थोड्याच वेळात पॅंट व शर्टच्या अक्षरक्षः चिंध्या झाल्या. कसेबसे त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत, दिलीपने तेथून पोबारा केला. पुढे मनोज दिसल्यावर दिलीप म्हणाला, ‘अरे, आजची ट्रिक वाया गेली म्हणून काळजी करू नकोस. मी उद्या दुसरी ट्रिक वापरतो.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com