झालं झिंग..झिंग..झिंगाट 

Panchnama
Panchnama

गेले दोन-तीन दिवस फार बोअर झालंय, काहीतरी झिंग आणणारा कार्यक्रम झाला पाहिजे, स्वप्नीलच्या या प्रस्तावावर सगळ्याच मित्रांनी माना डोलावल्या.
बीआरटीमधून धिंगाणा घालत जायचे ते रस्त्यावर खोटी भांडणे करून, पब्लिकला वेडं बनवायचे आदी विषयांवर तासभर तावातावाने चर्चा झाली. शेवटी रात्री अकरा ते पहाटे सहार्यंत या संचारबंदीच्या काळात शहरातून ‘आया है राजा’ हे गाणं लावून बुलेटची रॅली काढायची. रॅलीमध्ये सहभागी होताना प्रत्येकाने बुलेटची पुंगळी काढायची म्हणजे आणखी धमाल येईल. बुलेटच्या आवाजाने लोकांच्या झोपा उडविल्याशिवाय, आपल्याला शांत झोप लागणार नाही, यावर सगळ्यांचेच एकमत झाले.

‘अरे पण संचारबंदीच्या काळात रस्त्यावर पोलिस असतील ना’’? सुरेंद्रने शंका काढली. त्यावर सगळे हसले. 
‘संचारबंदी असली तरी सगळं काही पूर्वीसारखंच आहे. पोलिसही रस्त्यावर नसतात आणि असले तर आपल्याला काय फरक पडतो? उलट 
ते असतील तर आपल्याला आणखी झिंग चढेल. एखाद्या पोलिसाने फारच नियमावर बोट ठेवले तर देऊ हजार- पाचशे ! ’’ मनोजच्या या वाक्यावर सगळ्यांनीच त्याला टाळ्या दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ठरल्यानुसार रात्री अकराला कात्रजला आठ बुलेटवर सोळाजण आले. 
‘‘मित्रांनो, आज रात्रभर आपण पुण्यात मनोसक्त हिंडायचे. बीआरटी मार्गातून जायचे. कोणी आडवे आले तर बिनधास्त भांडायचे आणि महत्त्वाचे म्हणजे एकानेही मास्क घालायचा नाही. संचारबंदी मोडल्याची झिंग रात्रभर उतरू द्यायची नाही.’’ स्वप्नीलने पुढचा प्लॅन सांगितला. त्यानुसार ही बुलेटची वरात बीआरटी मार्गातून मार्गक्रमण करीत पुढे सरकू लागली. जोडीला ‘आया है राजा’चे गाणे आणि मोठमोठ्याने होणारा आरडा-ओरड यामुळे अनेकांची झोपमोड होऊ लागली. रात्री एक-दोनलाही अनेक ठिकाणी पोलिस नव्हते. त्यामुळे पूर्वीसारखीच अनेक ठिकाणी वाहतुकीची वर्दळ होती. 

रात्री अडीचला शिवाजीनगरला बुलेटचा ताफा पोचला. तिथे पोलिसांनी अडवले.
‘संचारबंदी आहे माहित नाही का? मास्क कोठाय’’? एका पोलिसाने दमात घेत म्हटले. त्यावर सगळेच जण हसले. 

‘साहेब, हे घ्या पाचशे आणि मिटवून टाका.’’ असे म्हणून मनोजने पैसे भिरकावले. त्यावर दुसऱ्या पोलिसाने वायरलेसवरून जादा कुमक मागवली. दहा मिनिटांतच आणखी तीन पोलिस तेथे आले. मग काय पोलिसांनी सगळ्यांना एका रांगेत उभे केले. आधी सगळ्यांना पन्नास बैठका काढायला सांगितल्या. त्यानंतर प्रत्येकावर काठीने फटके टाकले. ‘‘अहो लाकडी दंडुक्याने मारा, या काठीने फारच लागतंय. असली कसली काठी आहे?’’ स्वप्नीलने विव्हळत म्हटले. प्रत्येकावर वीस- पंचवीस फटके पडल्यानंतर ते लंगडू लागले. 

‘मास्क न घातल्याचा आठ हजार रुपये दंड भरा.’’ एका पोलिसाने दरडावल्याने दुसऱ्या मिनिटात पैसे जमा झाले. त्यानंतर संचारबंदी मोडल्याचा १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता तुमच्या गाड्या आम्ही जप्त करत आहोत.’ एका पोलिसाने असे म्हटल्यावर मनोजला तर चक्कर आली. त्यानंतर ही सगळी मंडळी शिवाजीनगरपासून कंबरेवर हात ठेवत लंगडत लंगडत आपापल्या घरी निघाली. ‘‘ही ‘झिंग’ आता आठवडाभर काय उतरत नाही.’’ स्वप्नीलच्या या वाक्यावर एकदम सन्नाटा पसरला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com