esakal | टोप्या बदलण्याचा छंद लागला जीवा

बोलून बातमी शोधा

Panchnama

टोप्या बदलण्याचा छंद लागला जीवा

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘मी काय म्हणतो? संचारबंदीच्या काळात रस्त्यावर आलं नाही, भाजीपाला, किराणा माल खरेदी केला नाही तर काय उपाशी मरणार आहात का? बसा ना आरामात घरात. कशाला डोकेदुखी वाढवताय.’ अप्पाने म्हटले. त्यातही शेवटचे वाक्य त्याने मोठ्याने म्हटल्याने ‘आम्हीच डोकेदुखी वाढवत आहे’, असे समजून शेजारील तीन-चार महिलांनी आमच्याकडे वळून पाहिले. त्यामुळे आम्ही खजिल झालो.

बाहेर गर्दी आहे की नाही, हे पाहण्यासाठी आम्ही आज बाहेर पडलो होतो. सोसायटीबाहेरील मैत्री कट्ट्यावर निवांत बसलो होतो. तेवढ्यात अप्पाने आम्हाला गाठले होते.

‘कोरोनाने केवढं थैमान घातलंय. परंतु सरकारला आहे का अक्कल. लोकांनी काय उपाशी मरायचं? त्यामुळं लोकं येतात रस्त्यावर. का नाही यायचं त्यांनी बाहेर? मी तर म्हणतो, ‘संचारबंदी वगैरे अजिबात पाळू नका.’ अप्पाने आवाज चढवत म्हटले. ‘अहो आधी तुम्ही घराबाहेर पडू नका म्हणताय आणि दोनच मिनिटांत घुमजाव करताय.’ आम्ही हळू आवाजात म्हटलं. ‘‘कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य समजून ते पार पाडले पाहिजे.’ अप्पाने गाडी पुढे दामटली. आम्ही विषय बदलावा म्हणून ‘मुलांचं बरं चाललंय ना? वहिनींची तब्येत बरी आहे ना?’ असे विचारले. ‘‘मुलांचं बरं चाललंय. मी व्यक्तिस्वातंत्र्य मानणारा आहे. त्यामुळे जात-पात न बघता खुशाल कोणाशीही लग्न करा, एवढं स्वातंत्र्य मी त्यांना दिलंय. संकुचित विचार मला पटत नाहीत.’ अप्पाने आपली विचारशैली ऐकवली. ‘बायकोने कालच लस घेतली. अरे लस घेतली म्हणजे काय कोरोना जातो का? माझा तर अजिबात विश्वास नाही लसीवर. त्यामुळे मी अजून घेतली नाही आणि घेणार पण नाही.’ ‘अहो, आता दोन मिनिटांपूर्वी लसीकरणाच्या बाजूने तुम्ही होता ना,’ हे वाक्य आमच्या जिभेवर आले होते पण आम्ही शांत बसलो.

तेवढ्यात आमच्या सोसायटीतील नाना आमच्या गप्पांत सामील झाले. त्यांच्या मुलाने आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना खिजवण्यासाठी अप्पा म्हणाले, ‘मुलांना फालतू स्वातंत्र्य दिल्याने ते कसेही वागतात. मी तर मुलांना दम दिलाय. तुमच्यासाठी मीच बायको पसंत करणार. तुम्ही तुमचे लग्न जमवले तर या घराचे दरवाजे तुम्हाला कायमचे बंद होतील. मी शब्दांचा एकदम पक्का आहे. त्यामुळे मुलेही घाबरतात.’ अप्पाने परत घुमजाव केले. तेवढ्यात दोन पोलिस तिथे आले व अप्पाला मास्क का घातला नाही म्हणून हटकले. ‘अहो मास्क घातला म्हणून कोरोना होत नाही, असं थोडंच आहे. उलट मास्कमुळे कोरोना जास्त पसरतो, असं माझे निरीक्षण आहे. जागतिक आरोग्य संघटनेचाही मास्क घालण्यास विरोध असल्याचे मी कालच वाचलंय. त्यामुळे मी मास्क घालत नाही.’ अप्पाने ठामपणे सांगितले. ‘तुम्हाला पाचशे रुपये दंड भरावा लागेल,’ पोलिसाने म्हटले. त्यावर सुरवातीला अप्पा थोडे गुरगुरले. नंतर विनंती-विनवण्या करू लागले. पण पोलिस ठाम राहिल्याने त्यांनी दंड भरला. पोलिस गेल्यानंतर अप्पा म्हणाले, ‘कोरोनाला लांब ठेवायचे असेल तर मास्कशिवाय पर्याय नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही हेच मत नोंदवले आहे. आपण मास्क हा सतत घातलाच पाहिजे. ते आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे.’’ त्यावर आम्ही हात जोडत एवढंच म्हणालो, ‘‘अप्पा, एक काही तरी ठरवा. तुमच्याएवढ्या भूमिका राजकीय मंडळीही बदलत नाहीत.’