दाढ दुखली बायकोची; उपचार नवऱ्याच्या दातांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
दाढ दुखली बायकोची; उपचार नवऱ्याच्या दातांवर

दाढ दुखली बायकोची; उपचार नवऱ्याच्या दातांवर

‘अहो, सकाळपासून माझी दाढ खूप दुखतेय.’ मानसीने गालाला हात लावत म्हटले.

‘तरी मी तुला नेहमी सांगत असतो, कमी बोलत जा आणि कोणाला लागंल असं बोलत जाऊ नकोस. भोग आपल्या कर्माची फळं.’ विकासने म्हटलं.

‘अहो वाट्टेल ते काय बोलताय? दाढ दुखण्याचा आणि कोणाला बोलण्याचा काय संबंध येतो.?’ मानसीने विचारले.

‘आपण बोलण्यासाठी जिभेचा वापर करतो. जीभ व दाढ हे एकमेकांचे शेजारी असतात. जिभेवर कामाचा जास्त ताण पडल्यावर त्याचा परिणाम दात व दाढांवर होतो. त्यामुळं जास्त बोलल्यावर दात वा दाढ दुखू शकते. शिवाय बोलून बोलून जीभ दमल्यावर आपण नकळतपणे ती दात व दाढेवर फिरवत असतो. त्यावेळी दात व दाढेची पॉवर ऑफ इनर्जी जिभेत परावर्तीत होत असते. त्यामुळे दात व दाढ कमकुवत होते.’’ गंभीर चेहरा करून विकासने माहिती पुरवली.

‘आता मी काय करू?’ मानसीने विचारले.

‘कमी बोलणं, हा त्यावर एक उपाय आहे. त्यातही दांडपट्टा फिरवल्यासारखी जीभ चालवायची नाही.’ विकासने सल्ला दिला.

‘दुखणाऱ्या दाढंखाली एक लवंग तासभर ठेवायची पण त्यानंतर अजिबात बोलायचं नाही, एवढं लक्षात ठेव.’ विकासने सांगितल्यानुसार मानसी दाढेखाली लवंग ठेवत गेली. दोन तास ती अजिबात बोलली नसल्याने घरात शांतता नांदत असल्याचा अनुभव विकासने घेतला. धुसफूस नाही की भांडणतंटा नाही, हे पाहून तो कमालीचा सुखावला. मानसीने घरात लवंग कमी असल्याचे सांगितल्यानंतर त्याने ताबडतोब किराणामालाच्या दुकानातून एकदम एक किलो लवंग घेऊन आला.

‘एवढं कोणी लवंग आणतं का?’ मानसीनं विचारलं.

‘मला घरात शांतता लाभणार असेल तर हा खर्च किरकोळ आहे’ असं विकास पुटपुटला. लवंगामुळे दोन दिवस शांततेत गेले पण तिसऱ्या दिवशी तिने दातांच्या डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला. विकास नाईलाजानं तयार झाला. ‘डॉ. अजित देशमुख’ अशी दारावरील पाटी वाचून, मानसीला काहीतरी आठवलं. ‘आपल्या दहावीच्या वर्गातील तर हा अजित नाही ना’ अशी शंका तिला आली. विकास रिसेप्शन काऊंटरशेजारी थांबला व ती एकटीच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. ‘अभिनव शाळेच्या १९९८ च्या बॅचला तुम्ही दहावीला होता का?’ असा प्रश्‍न तिने विचारला. ‘होऽऽ होऽऽऽ मी त्याच शाळेचा विद्यार्थी आहे.’ डॉ. अजितने उत्तर दिले.

‘माझं नाव मानसी गणपुले. मीदेखील त्याचवेळी होते.’ मानसीनं उत्तर दिलं.

‘मॅडम, त्यावेळी तुम्ही आम्हाला कोणता विषय शिकवत होतात.?’ अजितने विचारलं.

‘इतकं नको टोचून बोलायला. एवढं काय माझं वय दिसत नाही. त्यावेळी आपण दोघं एका वर्गात शिकत होतो.’ मानसीनं त्याला आठवण करून दिली पण अजितला काही केल्या आठवेना.

त्यानंतर अजितने मानसीची दाढ पाहिली व काही औषधे लिहून दिली. त्यानंतर पाचशे रुपये तपासणी शुल्क घेतले.

‘डॉक्टर, दाढ दुखण्याचा आणि जास्त बोलण्याचा काही संबंध आहे का? आपण एखाद्याला लागंल असं बोललो तर दाढ पटकन किडते का?’ मानसीनं शंका विचारली.

त्यावर अजित मोठ्यानं हसला व म्हणाला, ‘‘व्हॉटसअप युनिव्हर्सिटीतलं हे अगाध ज्ञान आहे. दोन्ही गोष्टींचा काडीचाही संबंध नाही.’ डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून मानसी घरी आली व तिने विकासची चांगलीच खरडपट्टी काढली. मानसी मुष्टियोद्धा होती की काय? अशी शंका भांडणानंतर त्याला आली. सध्या विकास पुढचे तीन नवीन दात बसवण्यासाठी डॉ. अजित यांच्याकडे उपचार घेत आहे.

Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 12th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama
go to top