सिलिंडरबरोबरच लिंबांचीही चोरी

‘हात वर करा.’ रात्रीच्या वेळी चोरट्याने सामंत कुटुंबाला धमकी दिली.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘हात वर करा.’ रात्रीच्या वेळी चोरट्याने सामंत कुटुंबाला धमकी दिली.

‘हात वर करा.’ रात्रीच्या वेळी चोरट्याने सामंत कुटुंबाला धमकी दिली.

‘ही काय शाळा आहे का? आणि तुम्ही काय पीटीचे शिक्षक आहात का? हे आमचं घर आहे. आमच्याच घरात येऊन, आम्हाला आदेश देणारे तुम्ही कोण?’ याही अवस्थेत शुभांगीने जाब विचारला.

‘हे पहा. आम्ही चोर आहोत. आम्हाला आमचे नियम पाळू द्या. मुकाट्यानं तुम्ही हात वर करा.’ दुसऱ्या चोरानं आवाज वाढवला.

‘तुम्ही चोर आहात? लायसन बघू.’ गणपतरावांनी आपला सरकारी खाक्या दाखवला.

‘तुम्ही काय चेष्टा चालवली काय? आम्ही इतक्या रात्री तुमच्या घरी झिम्मा - फुगड्या खेळायला आलोय का?’ पहिल्या चोराने त्रस्तपणे विचारले.

‘तुम्ही आम्हा बायकांचे खेळ खेळता? कमालच आहे बाई ! काळ बदललाय पण इतका बदलेल असं वाटलं नव्हतं. बरेच दिवस मी झिम्मा- फुगडी खेळलेच नाही.’ शुभांगीने खंत व्यक्त केली.

‘अगं वेळ काय आणि तुला झिम्मा- फुगडी खेळायची आठवण होतेय.’ गणपतरावांनी झापलं.

‘चूप ! एकदम चूप! आम्ही चोर आहोत, याचं तरी भान ठेवा. वास्तविक तुम्ही आम्हाला घाबरलं पाहिजे. ते राहिलं बाजूला आणि फालतू बडबड काय करताय? हे पिस्तूल बघा.’ एका चोराने दोघांना म्हटलं.

‘बघितलं. केवढ्याला मिळतं हो? कोणत्या खेळण्याच्या दुकानातून घेतलंय. माझ्या नातूला हवंय. त्यापेक्षा मला पन्नास रुपयांना ते विकत देता का?’ गणपतरावांनी प्रस्ताव दिला. त्यानंतर मात्र एका चोराची सटकली. त्याने खिशातून चाकू काढून, गणपतरावांच्या गळ्याला लावला. चोरांचा रूद्रावतार बघून दोघेही घाबरले.

‘प्लीज, मला मारू नका. तुम्हाला काय हवंय?’ गणपतरावांनी गयावया करत म्हटले. मघाच्या चेष्टेचा सूर बदलून, आता त्याची जागा भीतीने घेतली होती.

‘तुम्ही गप्प बसा.’ एका चोरानं म्हटलं.

‘एवढंच ना. बसतो की. त्यासाठी आमच्या घरी येऊन, सांगण्याची काय गरज नव्हती. फोनवरून सांगितलं असतं तरी चाललं असतं.’ गणपतरावांनी म्हटलं.

‘आम्ही चोर आहोत.’ एका चोरानं म्हटलं.

‘कितीदा तेच तेच सांगाल. तुम्हाला कंटाळा येत नाही का, तेच तेच बोलायला. मी तर बाई फार बोअर होते. तेच तेच बोलून, नाही का ओ.’ शुभांगीने गणपतरावांची साक्ष काढली.

‘हाताची घडी, तोंडावर बोट.’ दुसऱ्या चोराने आवाज चढवत आदेश दिला.

‘तुम्ही काय पूर्वी शिक्षक होतात का?’ शुभांगीने विचारलं. मात्र, तिकडं दुर्लक्ष करीत चोर किचनमध्ये शिरले.

‘गॅस सिलिंडर बाहेर काढा. आम्ही तो चोरण्यासाठी आलो आहोत.’ पहिल्या चोरानं आदेश दिला. सिलिंडरचं नाव काढताच

शुभांगीच्या पायाखालची वाळू सरकली. ती रडतच चोरांना विनवणी करू लागली.

‘अहो, आज सकाळीच मी भरलेला सिलिंडर जोडला आहे. भरल्या घरातून भरलेला सिलिंडर नेऊ नका हो.’ मात्र, चोरांनी तिच्याकडं दुर्लक्ष केले. त्यांनी खसकन् सिलिंडर बाहेर ओढला. हे दृश्‍य पाहून शुभांगीच्या हृदयात कालवाकालव झाली.

‘माझ्या काळजाच्या तुकड्याला नेऊ नका. एवढं निष्ठुर होऊ नका.’ असं म्हणून ती सिलिंडरवर आडवी पडली. मात्र, चोरांनी तिला बाजूला केलं. तेवढ्यात एका चोरानं फ्रिज उघडला. त्यातील तीन लिंबं पाहून, चोरांचे डोळे विस्फारलं.

‘आपलं नशीब आज मोठं आहे बरं का !’ असं एकमेकांना म्हणत चोरांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. चोरांनी दागदागिने, रोकड यापैकी कशालाही हात न लावता, सिलिंडरबरोबरच लिंबं नेली. आपल्या घरातील ‘मौल्यवान’ वस्तूंची चोरी झालेली पाहून सामंत पती- पत्नीला घेरी आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com