मौनव्रत सासूचे पत्र आले सुनेचे!

सध्या तुमचं माझ्याबरोबर मौनव्रत सुरू असल्याने नाइलाजास्तव तुम्हाला पत्र लिहावं लागत आहे. परवाच्या तुमच्या वाढदिवसाला मी ‘मौनव्रताचे फायदे’ हे पुस्तक तुम्हाला प्रेझेंट दिले म्हणून तुम्ही रागावला आहात, असं ‘यांनी’ सांगितलं.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

सध्या तुमचं माझ्याबरोबर मौनव्रत सुरू असल्याने नाइलाजास्तव तुम्हाला पत्र लिहावं लागत आहे. परवाच्या तुमच्या वाढदिवसाला मी ‘मौनव्रताचे फायदे’ हे पुस्तक तुम्हाला प्रेझेंट दिले म्हणून तुम्ही रागावला आहात, असं ‘यांनी’ सांगितलं.

सध्या तुमचं माझ्याबरोबर मौनव्रत सुरू असल्याने नाइलाजास्तव तुम्हाला पत्र लिहावं लागत आहे. परवाच्या तुमच्या वाढदिवसाला मी ‘मौनव्रताचे फायदे’ हे पुस्तक तुम्हाला प्रेझेंट दिले म्हणून तुम्ही रागावला आहात, असं ‘यांनी’ सांगितलं. पुस्तकांचं तुम्ही एवढं मनावर घेत असाल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं नाहीतर मी ‘मोह टाळा (दागिन्यांचा)’ किंवा ‘सूनबाईंला प्रेमानं कसं जिंकावं’ ही पुस्तकं तुम्हाला भेट दिली असती. असो. पुढच्यावेळीस ‘सूनबाईला अशी करा घरकामात मदत’ हे पुस्तक भेट म्हणून देण्याचा माझा विचार आहे.

तुमच्यासारखी सासू मिळणं, हे माझं मोठं भाग्य आहे. तुमच्यातील किती गुणांचं मी वर्णन करू. तुमच्यातील संयम हा गुण तर मला फारच आवडतो. तुम्हाला शुगर आहे पण रक्तातील साखर तुम्ही कधी चुकूनही ओठांवर आणली नाही. हल्ली एवढा संयम कोण बाळगतो? तुमच्या शुगरइतकीच मला तुमच्या गुडघेदुखीची खूप काळजी वाटते. ‘घरकामात थोडी मदत करता का?’ असं मी म्हटलं की लगेच तुमची गुडघेदुखी उफाळून येते. मग मला काळजी वाटते. हल्ली तर तुम्ही मला गुडघ्यावर लेपही लावून देत नाही. गेल्यावर्षी एकीकडे मटणासाठी मसाला वाटत असताना दुसरीकडे मी आयुर्वेदिक लेपही वाटत होते. नजरचुकीने मटणासाठीचे वाटण मी तुमच्या गुडघ्यावर लावले तर तुम्ही घर डोक्यावर घेतलं होतं. मी एवढ्या प्रेमानं करते, त्याची किंमतच नाही. लेकीकडे जाताना मात्र तुमची गुडघेदुखी कोठे पळून जाते कोणास ठाऊक?

त्यांच्या बिल्डिंगचे पाच मजले एकादमात तुम्ही चढता. शिवाय त्यांच्या घरची सगळं कामंही करता. खरंच लेकीकडे गेल्यानंतर तुमची गुडघेदुखी थांबत असेल तर त्यांना तिकडेच ठेवा, असं मी म्हटलं तर ‘त्यांनी’ माझ्यावर डोळे वटारले. तुमच्या गुडघेदुखीवरील उपायांसाठीच मी एवढं बोलले होते. सासूबाई, स्वच्छतेची तुम्हाला खूप आवड आहे, याची मला कल्पना आहे. म्हणूनच तर ‘ताट एवढं लख्ख घास की त्यात जेवताना आपला चेहरा दिसला पाहिजे’, अशी तुमची आग्रही मागणी असते. खरं तर जेवताना तोंड बघायची एवढी हौस असेल तर आरशावरच जेवत चला, असं माझ्या ओठांवर येतं पण ‘तुझी सासू कितीही खाष्ट असली तरी तिला कधी उलटं बोलायचं नाही की टोमणे मारायचे नाहीत...तर स्वयंपाक बिघडून आपण आपला राग व्यक्त करायचा’, असा सल्ला माझ्या आईने लग्नाच्यावेळी मला दिला होता. मी तो अजूनही विसरले नाही.

सासूबाई, सोसायटीतील बायका माझ्याकडे बघून ‘अगदी सासूच्या वळणावर गेलीय’ असं म्हणतात. मला त्यांचा फार राग येतो. खरंच का हो सासूबाई मी एवढी भांडकुदळ आणि नको तिथं नाक खुपसणारी आहे. सासूबाई, खरं तर माझंही तुम्हाला फार कौतुक आहे, याची मला कल्पना आहे. एकदा अंघोळ करताना मी केस मोकळे सोडून ते गॅलरीत वाळवत बसले होते. त्यावेळी ‘फार छान दिसतेस, फोटो काढते’ असं म्हणून तुम्ही मोबाईलवर माझा फोटो काढला व लगेच तो लेकीला पाठवला.

‘तुझ्या मुलांना घाबरवण्यासाठी अधूनमधून हा फोटो दाखवत जा’ असं तुम्ही म्हणाल्याचं मला कळलंय. तुमच्या या कौतुकानं मी भारावून गेलेय. सासूबाई, तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत तर मला फार सुनंसुनं वाटतं. लेकीला उद्देशून तुम्ही मला मारलेले टोमणेही मी साखरेच्या पाकात घोळून घेते. जिथं सासू-सुना हसत-खिदळत आहेत, एकमेकींची चेष्टा मस्करी करतात. त्याच घरात सुख, शांती आणि समाधान मुक्कामी असते. तेच घर गोकुळासारखे नांदत असते. त्यामुळे तुम्ही निःसंकोचपणे मला बोलत जा. चुकल्यास माझे कानही धरा. पण तुम्ही हे मौन सोडा, ही कळकळीची विनंती. वाटल्यास ‘सासू-सुनेने ऋणानुबंध कसे वाढवावेत’ हे पुस्तक मी भेट देते. कळावे,

तुमचीच, आज्ञाधारक सून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com