आम्ही ‘लटिके’ ना बोलू

‘ए, तुला कळत नाही का? का काठीने बदडून काढू? आता जर गप्प बसला नाहीस ना तर बेडरूममध्ये कोंडून, उपाशी ठेवीन. आपण नेहमी संयमानं वागलं पाहिजे, हे तुला कितीवेळा सांगायचं.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘ए, तुला कळत नाही का? का काठीने बदडून काढू? आता जर गप्प बसला नाहीस ना तर बेडरूममध्ये कोंडून, उपाशी ठेवीन. आपण नेहमी संयमानं वागलं पाहिजे, हे तुला कितीवेळा सांगायचं.

‘ए, तुला कळत नाही का? का काठीने बदडून काढू? आता जर गप्प बसला नाहीस ना तर बेडरूममध्ये कोंडून, उपाशी ठेवीन. आपण नेहमी संयमानं वागलं पाहिजे, हे तुला कितीवेळा सांगायचं. रागावर नियंत्रण मिळवल्यास, अनेक अनर्थ गोष्टी टळू शकतात, हे तुला हजारवेळा सांगितलं असेल पण ‘पालथ्या घड्यावर पाणी’ अशी तुझी अवस्था झाली आहे. शांतपणे आपलं म्हणणे दुसऱ्यांना पटवून देता आलं पाहिजेल, हे तुला समजत नाही का? मी दरवेळी तुझ्यापुढे डोकेफोडी करायला मोकळा नाही. परत जर संयमाने वागला नाहीस तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नाही.’’ चौथीतील आशुतोषला नीलेश संयम व रागावर नियंत्रणाचे महत्त्व डाफरून पटवून देत होता. आवाज चढवून व शिरा ताणून बोलत असल्यामुळे त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्याने घर डोक्यावर घेतल्याने त्याचा आवाज सोसायटीच्या गेटपर्यंत जात होता.

‘पण बाबा, ती मुलं भांडकुदळ आहेत. विनाकारण दादागिरी करतात.’ आशुतोषनं स्पष्टीकरण दिलं.

‘दुसऱ्यांनी कसं वागावं, हे आपल्या हातात असतं का? नाही ना? पण आपण कसं वागायचं, हे आपण ठरवू शकतो, हे तुला कधी कळणार आहे? का आयुष्यभर मुर्खांच्या नंदनवनात राहणार आहेस. आपण सभ्यपणानंच बोललं पाहिजे, हे तुला कधी समजणार आहे? उंटासारखा नुसता ताडमाड वाढलाय, तुला अक्कल कधी येणार आहे की नाही. परत जर त्या मुलांमध्ये खेळायला गेलास तर तुझी पाठ चांगली शेकून काढील.’ नीलेशने मुलाला ‘प्रेमळ’ सल्ला दिला.

‘तुझ्याएवढा मी होतो, त्यावेळी आमच्यावर किती चांगले संस्कार होते. आम्ही कधी कोणाला उलटून बोलायचो नाही. कधी बोललोच तर आई- वडील चांगले बदडून काढायचे. कधी कोणाला शिवीगाळ केली वा मारामारी केली तर उपाशी राहावं लागायचं. आठवड्यातून दोन- तीन वेळा तरी आमच्यावर असे प्रसंग यायचेच. बारावी पास होईपर्यंत मी कितीवेळा उपाशी राहिलो असेल, याची गणतीच नाही.’ नीलेशने लहानपणीच्या आठवणी जागवल्या.

‘तुम्ही बारावीपर्यंत सारखी भांडणं करायचा, असा याचा अर्थ होतो.’ स्वातीनं म्हटलं.

‘म्हणजे काय? लहानपणी भांडणं आणि मारामाऱ्या करायच्या नाहीत तर कधी करायच्या? अगं ते वयच तसं असतं. ‘लहानपणा देगा देवा’ असं म्हटलं जातं, ते काय उगाच. त्यामुळं भांडणं, मारामारी होणारच. त्यात तर खरी मजा असते.’ नीलेशने म्हटलं.

‘बाबा ! मी काय वेगळं करतोय. मीसुद्धा लहानच आहे ना?’ आशुतोषनं म्हटलं.

‘खबरदार ! मला उलटं बोललास तर ! मी आई- वडिलांना उलटं बोललो तर माझ्या कानाखाली आवाज निघायचा. एका आठवड्यात तीन- चार वेळा असे प्रसंग यायचे पण मी कधी डगमगलो नाही व मार खायचे कधी सोडले नाही. संस्कार दुसरं काय ! ’

नीलेशने फुशारकीने म्हटले.

‘अहो तो लहान आहे.’ स्वातीनं म्हटलं.

‘लहान आहे म्हणूनच त्याच्यावर संस्कार केले पाहिजेत. दरवर्षी त्याने जिद्दीच्या जोरावर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले पाहिजेत. मी दहावी व बारावीत असताना तीनवेळा नापास झालो होतो. कॉपी करता न आल्यामुळंच तसं झालं होतं. मात्र, तरीही न डगमगता मी केंद्र बदललं. कॉपी व जिद्दीच्या जोरावर पास झालो. नेहमी खरं वागलं व बोललं पाहिजे.’ नीलेशने म्हटले.

‘‘बाबा, खरंच मी शहाण्या मुलासारखा वागेल. कधीही खोटं बोलणार नाही.’ आशुतोषनं म्हटलं.

तेवढ्यात साहेबांचा फोन आल्याने चेहरा पाडून नीलेश म्हणाला,

‘सर ! मी दवाखान्यात ॲडमिट आहे. माझी तब्येत फार बिघडली आहे. मी तीन- चार दिवस कामावर येऊ शकणार नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com