दगडात मी शोधला माणसांत मी पाहिला

‘बाबा, ताईच्या लग्नाचा सगळा खर्च मी करणार आहे. मुलगा म्हणून बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्याही मी पार पाडणार आहे. तुम्ही फक्त कन्यादान करायचं.’ शुभमने फोन करून माधवरावांना सांगितले.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘बाबा, ताईच्या लग्नाचा सगळा खर्च मी करणार आहे. मुलगा म्हणून बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्याही मी पार पाडणार आहे. तुम्ही फक्त कन्यादान करायचं.’ शुभमने फोन करून माधवरावांना सांगितले.

‘बाबा, ताईच्या लग्नाचा सगळा खर्च मी करणार आहे. मुलगा म्हणून बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्याही मी पार पाडणार आहे. तुम्ही फक्त कन्यादान करायचं.’ शुभमने फोन करून माधवरावांना सांगितले.

‘अरे शुभम, तू आहेस कोठे?’ माधवरावांनी विचारले.

‘जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून माझी आता नाशिकला पोस्टिंग आहे. पण मी रजा घेऊन, सगळं कार्य व्यवस्थित पार पाडेन. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या.’ शुभमने त्यांना धीर दिला.

‘अरे पण एवढा खर्च...’ माधवरावांनी चाचरत विचारले.

‘बाबा, तुम्ही केलेल्या मदतीचं नुसतं व्याज जरी मी दिलं तरीही लग्नसोहळा व्यवस्थित पार पडेल.’ असं म्हणून फोनवरच शुभमला हुंदका अनावर झाला. तो ऐकून माधवरावांनाही गलबलून आलं. पंधरा वर्षापूर्वीचा भूतकाळ नजरेसमोर आला. पानशेतवरून ते पुण्याला निघाले असताना वाटेत करवंदं विकणारा मुलगा पाहून त्यांनी गाडी थांबवली. दहा रुपयांना एक वाटा तो विकत होता. त्याचा चुणचुणीतपणा पाहून माधवराव प्रभावित झाले. त्यांनी सहज विचारपूस केली. शुभमने दहावीची परीक्षा दिली होती व पुण्यात त्याला विज्ञानशाखेला प्रवेश घ्यायचा होता. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तो करवंदे विकत होता. ‘सगळी केवढ्याला देणार?’ माधवरावांच्या प्रश्‍नावर त्याचा चेहरा उजळला.

‘साहेब, पाचशे रुपये द्या.’ शुभमने असं म्हटल्यावर त्यांनी एक हजार रुपये दिले व त्यातील करवंदाचा एक वाटा उचलला.

‘तू कष्ट करून शिकत आहेस, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुला मदत म्हणून मी हजार रुपये देतोय. पुण्यात कधी आलास तर भेटायला ये.’ असं म्हणून त्याला पत्ता दिला. तीन- चार महिन्यांनी शुभम त्यांच्या घरी आला.

‘एसपी कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालंय. खर्च भागावा म्हणून मी घरोघरी दूध टाकतो. तुमच्या घरी टाकू का?’ असं त्याने विचारलं. माधवरावांनी होकार देताच त्याने दूध टाकायला सुरवात केली. बारावीत गेल्यानंतर अभ्यासाकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून माधवरावांनी त्याला दूध टाकण्यास विरोध केला व त्याला वर्षभर घरी ठेवून, शिक्षणाचा सगळा खर्च उचलला. शुभमनेही रात्रं- दिवस अभ्यास करून, बारावीत ९२ टक्के मिळवले. त्यानंतर मात्र शुभम सुसाट सुटला. छोटी - मोठी कामं करून, कॉलेजचं शिक्षण त्यानं पूर्ण केलं. माधवरावांनी त्याला अनेकदा निरपेक्ष हेतूनं आर्थिक मदत केली. त्यानंतर तो नोकरीसाठी मुंबईला गेला. नोकरी करतच तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला.

माधवरावांची एकुलती एका मुलगी स्मिताने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिचं लग्न ठरलं. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधी माधवरावांना ह्दयविकाराचा झटका आला आणि उपचारावर सगळी शिल्लक रक्कम खर्च झाली. माधवरावांची प्रकृती व खर्चाच्या प्रश्‍नामुळे लग्न काही दिवस लांबणीवर टाकावं लागलं. माधवराव या तणावातच असतानाच शुभमचा फोन आला. त्यानंतर बोलल्याप्रमाणे शुभमने रजा टाकली व बायको मानसी व दोन लहान मुलांसह तो पुण्यात मुक्कामी आला. त्याने लग्नाची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. मानसीही आपल्या नणंदेचं लग्न आहे, असं समजून वागू लागली. आई-बाबांची प्रेमाने काळजी घेऊ लागली. शुभमची लहान मुलेही आजी- आजोबांच्या कुशीत सुखावली होती.

लग्नाच्या दिवशी शंभर पोलिसांचा फौजफाटा आपल्या घरचं कार्य आहे, असं समजून साध्या वेशात वावरत होता. लग्नात काहीही कमी पडायला नको म्हणून शुभम बारकाईने लक्ष ठेवून होता. लग्न थाटामाटात पार पडल्याचे पाहून, व्हीलचेअरवर बसलेल्या माधवरावांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

‘कोणालाही मदत करण्यामागे आपला हेतू प्रामाणिक आणि निरपेक्ष असेल तर अडचणीच्या काळात परमेश्‍वर निश्‍चितपणे आपल्यामागे उभा राहतो,’ याचा अनुभव माधवराव घेत होते. शुभमच्या रूपात ते परमेश्‍वरालाच पाहत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com