
प्रियाने महाबळेश्वरमधील फोटो फेसबुकवर टाकून ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल सगळं ओकेमध्ये आहे.’ ही ओळ टाकल्यावर मानसीचा चेहरा उतरला.
झाडी, डोंगार अन् हाटेल सगळं ओकेमध्ये मिटेल...
प्रियाने महाबळेश्वरमधील फोटो फेसबुकवर टाकून ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल सगळं ओकेमध्ये आहे.’ ही ओळ टाकल्यावर मानसीचा चेहरा उतरला. त्यात प्रियाच्या पोस्टला दीडशे लाईक व पन्नास कमेंट मिळाल्यावर तर तिचं कामात मनही लागेना. संध्याकाळी नीलेश कामावरून घरी आल्यानंतर तिने अबोला धरला. वातावरण ‘गरम’ व चहा ‘थंड’ असल्याचे पाहून, तो परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला.
‘बरे वाटत नाही का?’ त्याने आपुलकीने विचारले.
‘मला काय धाड भरलीय.’ मानसीने तिरसटपणे उत्तर दिले.
‘आपल्या शेजारणींपैकी कोणी नवीन साडीची खरेदी वा दागिना केला आहे का?’ चाचरत त्याने विचारले.
‘तुमच्याएवढं माझं लक्ष शेजारणींवर नसतं.’ तिने टोमणा मारला.
‘बरं तुला डावलून आॅफिसमध्ये कोणाला प्रमोशन वा पगारवाढ दिलीय का?’ नीलेशने आणखी प्रश्न विचारला.
‘दुसऱ्यांची प्रगती पाहून, तुमच्यासारखं माझ्या पोटात दुखत नाही.’ मानसीने पलटवार केला.
‘बरं मग आईने गावाकडील तुझ्या जावेचं कौतुक केलंय का?’ नीलेशने आणखी एक प्रश्न विचारला. यावर काहीही न बोलता प्रतिक्रिया म्हणून मुलाच्या पाठीत धपाटे बसण्याचा आवाज आला. त्यावर ‘दोघांचे भांडण आणि तिसऱ्याला फटका’ असं पुटपुटत चिन्मय बेडरूमच्या दिशेने पळाला. दोन- तीन मिनिटांनंतर किचनमधून मुसमुसण्याचा आवाज आला.
‘अगं काय झालं ते तरी सांग. तुझ्या मनात काय चाललंय, ते मला कसं कळणार.?’
नीलेशने काकुळतीने म्हटले.
‘तुमचं माझ्यावर प्रेमच नाही राहिलं. लग्नाआधी चंद्र- तारे तोडून आणण्याचा गप्पा करत होतात आणि आता....’ मानसीने डोळे पुसले.
‘तुझ्यासारखी नक्षत्रासारखी बायको घरात असताना लग्नानंतर कशाला हवेत चंद्र - तारे?’
ही मात्रा हमखास लागू पडते, असा आतापर्यंतचा नीलेशचा अनुभव होता.
मात्र, आज तसे काही घडले नाही. माहेरच्यांचेही कौतुक केले. तिच्या आई- वडिलांसारखा चांगुलपणा कोणाकडेच नाही, तिच्या भावाच्या हुशारीचे नाईलाजास्तव का होईना गुणगान गायले पण उपयोग शून्य.
यावर काहीही न बोलता मानसीने नीलेशच्या हातात मोबाईल दिला.
‘अच्छा ! तुला नवीन मोबाईल हवाय तर. अगं मग सरळ सांगता येत नाही का? मी किती घाबरलो.’ नीलेशने म्हटले. त्यावर भांड्यांची पुन्हा आदळआपट झाली.
‘आता काय झालं? आपण उद्या नवीन मोबाईल घेऊ.’ नीलेशने आश्वासन दिले.
‘हल्ली तुमचं माझ्याकडं मुळीच लक्ष नसतं. लग्न झाल्यानंतर तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून
मला काय हवंय, नकोय ते ओळखायचा आणि माझी इच्छा लगेच पूर्ण करायचा.’ मानसीने रडत म्हटलं.
‘नवीन मोबाईल ना? घेऊ की.’ नीलेशने विचारले. त्यावर त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत तिने प्रियाची पोस्ट दाखवली.
‘अरे व्वा ! प्रियाची पोस्ट. या ड्रेसमध्ये ती किती छान दिसतेय.’ असं म्हणून नीलेशने जीभ चावली.
‘बघा, तुमचं लक्ष कुठंय...’ मानसीने त्याला झापलं.
‘तुझी तर आता हद्द झाली. तिच्या या पोस्टवरून तुला काय हवंय, हे मी कसं ओळखू?’ नीलेशने आवाज चढवत विचारले.
‘अहो, प्रिया तिच्या नवऱ्याबरोबर महाबळेश्वरला फिरायला गेली आहे. तेथील फोटो तिने टाकले आहेत. आता परत आल्यावर तिचं ‘महाबळेश्वर पुराण’ चालू होईल. सगळ्यांना हळदी-कुंकवाला बोलावून, ट्रीपचं सांगत बसेल. मी बरं तिचं ऐकून घेईल? मलाही ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं ओकेमध्ये आहे.’ अशी ओळ टाकता येईल, अशा ठिकाणी फिरायला न्या.’ मानसीने हट्ट धरला.
तिचं बोलणं ऐकून, नीलेशच्या डोळ्यासमोर त्याच्या गावाकडील चित्र उभं राहिलं.
‘अगं बॅगा भरायला सुरवात कर.’ उत्साहात नीलेश म्हणाला.
Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 28th June 2022 Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..