
संशयाची ‘कल्पना’ अन् संशयाचे ‘प्रतीक’
‘अगं, इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडी बंद पडली आहे. मला काय हौस आली आहे का उशिरा येण्याची? तू म्हणत असशील तर बसने घरी येतो.’ प्रतीकने काकुळतीला येत म्हटलं.
‘तुझ्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम होणारच होता. जुन्या मैत्रिणी भेटल्या असतील ना. त्यामुळं काही ना काही बहाणा तू बनवणारच होता, याची मला ‘कल्पना’ होतीच. बाय द वे कल्पना तुला भेटली असेलच ना? त्यामुळे उशिरा येण्याची कारणं सांगण्यासाठी तुझ्या ‘कल्पने’ला पंख फुटल्याशिवाय कसे राहतील.’ प्रांजलीने कुत्सितपणे म्हटलं.
‘अगं खरंच आमच्यात तसं काही नाही. तू उगाच आमच्यावर संशय घेतेस. तुला आमच्या मैत्रीविषयी सांगितलं, हेच माझं चुकलं.’ प्रतीक वैतागून म्हणाला.
कॉलेजमधील २००८ च्या ‘बीए’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यासाठी प्रतीक गेला होता. घरी येण्यास उशीर होईल, असं सांगितल्याने प्रांजली चिडली होती. थोड्यावेळानं तिचा पुन्हा फोन आला.
‘प्रतीक, खरं खरं सांग, तुला कशामुळं उशीर होतोय? तुझी ही नेहमीची नाटकं आहेत. मी काय आज तुला ओळखते का?’ असं म्हणून तिनं त्याला झापलं. शेवटी त्याने व्हिडिओ कॉल करून, बंद पडलेली गाडी तिला दाखवली. त्यावेळी तिचा थोडा विश्वास बसला.
रात्री दहाच्या सुमारास मेळावा संपला. पुन्हा लवकरच भेटू, अशी एकमेकांना ग्वाही देत निरोप घेतला जाऊ लागला.
‘आता बंद पडलेल्या गाडीचं काय करायचं?’ असा प्रश्न प्रतीकला पडला. तेवढ्यात त्याचा वर्गमित्र विश्वास तिथे आला. विश्वासने गाडीचं बॉनेट उघडलं व दहा मिनिटांत गाडी दुरुस्तही केली. प्रतीकनं गाडी स्टार्ट केली. तेवढ्यात कल्पना प्रतीकजवळ आली.
‘अरे माझ्या नवऱ्याचीही गाडी बंद पडलीय. तो म्हणतोय टॅक्सीने घरी ये पण दुसऱ्या कोणाबरोबर जाण्यापेक्षा तू मला कात्रजला ड्रॉप कर ना.’ कल्पनाच्या विनंतीला प्रतीकने आनंदाने होकार दिला. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांची गप्पांची मैफल रंगली.
सहकारनगरला गाडी आल्यानंतर प्रांजलीचा व्हिडिओ कॉल आला.
‘प्रतीक, गाडी चालू झाली का? आता तू कोठे आहेस?’ तिने विचारलं.
‘अगं गाडीत किरकोळ प्रॉब्लेम होता. माझा मित्र विश्वासने तो दुरुस्त केला. मी लवकरच घरी पोचतोय.’ प्रतीकने म्हटलं.
‘तुझ्याबरोबर गाडीत कोण आहे.?’ प्रांजलीच्या या प्रश्नावर प्रतीकला घाम फुटला. तो ‘ततपप’ करू लागला. तेवढ्यात उत्सुकतेने कल्पनाने मोबाईल त्याच्या हातातून घेतला.
‘अहो वहिनी, मी कल्पना बोलतेय. आम्ही दोघं गाडीत आहोत. प्रतीक मला कात्रजला सोडेल, त्यानंतर पुन्हा तो महर्षीनगरला येईल. काही काळजी करू नका. बाकी तुम्ही कशा आहात?’ कल्पनानं असं म्हणताच प्रांजलीने दातओठ खाऊन फोन बंद केला. त्यानंतर प्रतीकने तिला कात्रजला सोडलं व परत तो घरी जायला निघाला. रस्त्यात त्याने प्रांजलीला फोन केला.
‘अगं कल्पनाच्या नवऱ्याची गाडी बंद पडल्याने तो आला नाही. त्यामुळं मला तिला सोडवावं लागलं...’ कसंबसं प्रतीक बोलला.
‘अशा कशा गाड्या बंद पडतात रे तुमच्या? ‘गाड्या बंद आणि तुम्ही चालू’ हे न ओळखायला मी काय वेडी आहे का? तिला सोडवायला दुसरं कोणच नव्हतं का? तुला बरं तिचा पुळका आला.’ असं म्हणून तिने फोन कट केला. त्यानंतर प्रतिकने दहा-बारा वेळा फोन केला. पण तिने तो एकदाही उचलला नाही. घरी आल्यानंतर बराचवेळा दरवाजा वाजवला पण तिने दार काही उघडलं नाही. त्यामुळे नाईलाजानं पार्किंगमध्ये गाडी लावून, तो गाडीत झोपला. प्रचंड उकाडा आणि मच्छरांचा हल्ला यामुळं ती रात्र त्याने अक्षरशः तळमळून काढली. दुसऱ्या दिवशी नऊ वाजले तरी घरी जाण्याचं धैर्य त्याच्या अंगी नव्हतं.
Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 3rd May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..