
‘टाईमपास’ चित्रपटने केला ‘टाईम वेस्ट’!
‘भाऊ, तुमचं बरोबर आहे. चूक त्यांचीच आहे. आम्ही पाहिलं ना! तुम्ही माघार घेऊ नका. काय व्हायचंय ते होऊ द्या. आम्ही तुमच्याबरोबरच आहोत.’ धनाजी एकाला हवा भरून, भांडण करायला उद्युक्त करत होता. आज सकाळी दोन दुचाकीस्वारांची किरकोळ घासाघीस झाली होती. बराचवेळ दोघेही हमरातुमरीवर आले होते. पण पुढं काहीच घडत नसल्यानं जमलेली गर्दी पांगू लागली होती. मात्र, अशाही परिस्थितीत धनाजीने धीर सोडला नाही. विस्तवावर फुंकर घातल्यावर तो चांगला पेटून उठतो, याची त्याला कल्पना होती. त्यामुळेच दोघांपैकी एकाला तो पेटवत होता.
‘आपण जर बरोबर असू तर कोणालाही घाबरायचं कारण नाही. कोणी कितीही मोठा असू द्या.’ धनाजीने आणखी चावी फिरवल्यावर समोरची व्यक्ती भांडू लागली. थोड्याच वेळात खडाखडी होऊन एकमेकांचा अंदाज घेतला जाऊ लागला आणि त्यानंतर भांडणानं चांगलाच वेग घेतला. मघाशी पांगलेली गर्दी पुन्हा जमा होऊ लागली. तासभर का होईना आपलं मनोरंजन झालं, याचं धनाजीला समाधान वाटलं. भांडणं लावून देणं, हा धनाजीचा अत्यंत आवडता छंद आहे. चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिका यामध्ये त्याला काडीचंही स्वारस्य नाही. आपलं खरं मनोरंजन हे लाईव्ह भांडणातूनच होतं, यावर त्याचा विश्वास आहे आणि यासाठी तो भरपूर प्रयत्नही करायला तयार असतो. काही दिवसांपूर्वी मंडईत दोघांची किरकोळ कारणावरून जोरात भांडणे झाली. धनाजी त्याची मजा घेत होता पण तेवढ्यात एकजण घाई करत म्हणाला, ‘गॅसवर कुकर ठेवून आलोय. तीन शिट्ट्या होण्याच्या आत घरी यायचं, असा बायकोनं इशारा दिल्यानं घरी जातोय पण उद्या सकाळी अकराला मंडईत भेट. मग तुला चांगला हिसका दाखवतो का नाही ते बघ.’ त्या व्यक्तीने दम दिल्याचे पाहून धनाजी पुढे सरसावला.
‘साहेब, तुम्ही उद्या सकाळी अकराला भांडणं करायला येणार आहात ना? मला भांडणं बघायला फार मजा येते. मीदेखील त्याचवेळी येतो. समजा मला उशीर झाला तर माझी थोडा वेळ वाट पहा किंवा मला या फोन नंबरवर फोन करा.’ असं म्हणून त्याने मोबाईल नंबर सांगितला.
‘तू काय येडा आहे का रे?’ असे म्हणत भांडणाऱ्या व्यक्तीने काढता पाय घेतला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो अकराला मंडईत गेला. पण तिथे सगळीकडे सामसूम होती. ‘थोड्या वेळापूर्वी कोणाची इथं भांडणं झाली काय?’ अशी चौकशी त्याने शेजारच्या दुकानदारांकडं केली. मात्र, सगळ्यांनी नकारार्थी माना हलवल्या. तेवढ्यात कोणाचातरी त्याला जोराचा धक्का लागल्याने तो कोलमडून पडला.
‘ए डोळे फुटले काय? नीट बघून चालता येत नाही का?’ धडकणाऱ्या व्यक्तीने धनाजीला दमात घेतले. ‘‘मी रस्त्याच्या एका बाजूला उभा आहे. तुम्हीच येऊन मला धडकलाय आणि मलाच दम का देताय?’ धनाजीने आपली बाजू मांडली. तेवढ्यात एकजण हळूच धनाजीच्या कानाला लागला.
‘भाऊ, तुमचं बरोबर आहे. चूक त्यांचीच आहे. तुम्ही माघार घेऊ नका. काय व्हायचंय ते होऊ द्या. आम्ही आहोत बरोबर.’’ तेवढ्यात दोघे-तिघे मोबाईलवरून भांडणाचे चित्रिकरण करण्यास सज्ज झाले. ‘भाऊ, मागे हटू नका.’ गर्दीतून एकाचा आवाज आल्याने धनाजी चक्रावलाच. त्याने धक्का देणाऱ्या व्यक्तीची हात जोडून माफी मागितली. ‘साहेब, तुमचंच बरोबर आहे. रस्त्यात उभं राहणं, ही माझी चूक आहे. मला माफ करा.’ धनाजीनं असं म्हटल्यावर चुकचुकतच गर्दी पांगू लागली.
‘मस्त टाईमपास होईल, असं वाटलं होतं. पण त्या येड्यानं माफी मागून सगळी मजा घालवली.’ हे गर्दीतील एकाचं वाक्य ऐकून धनाजी ताळ्यावर आला.
Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 4th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..