Panchnama : हेल्मेटच्या सक्तीसाठी वापरली अनोखी युक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘असं काहीतरी करा, की शहरातील शंभर टक्के दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले पाहिजे. मला कोणत्याही सबबी सांगू नका. मला रिझल्ट द्या.’

Panchnama : हेल्मेटच्या सक्तीसाठी वापरली अनोखी युक्ती

‘असं काहीतरी करा, की शहरातील शंभर टक्के दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले पाहिजे. मला कोणत्याही सबबी सांगू नका. मला रिझल्ट द्या.’ पोलिस आयुक्तांनी वाहतूक विभागाच्या उपायुक्त गजेंद्र फडतरेसाहेबांना सूचना केली.

‘सर बघतो’ असे म्हणून फडतरेसाहेब कामाला लागले.

आतापर्यंत अनेकदा वाहनचालकांना हेल्मेटचे फायदे सांगितले. कितीतरी वेळा हेल्मेटसक्ती केली, लाखो रुपयांचा दंड वसूल केला पण अनेकांनी हेल्मेट वापरास नकार दिला. त्यातील काहींनी तर मोर्चे काढले तर काहींनी रांगा लावून दंड भरला. ‘एकवेळ आम्ही दंड भरू पण हेल्मेट घालणार नाही,’ अशी प्रतिज्ञाच काहींनी केली होती. त्यामुळे हेल्मेटसक्ती कागदावरच राहत होती. त्यामुळे आता नेमके काय करावे, असा प्रश्‍न फडतरेसाहेबांसमोर उभा राहिला होता. साहेबांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, असं त्यांनी ठरवलं. त्यानंतर त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सकाळी दहा वाजता एका चौकात हवालदारसाहेब वाहतूक नियमन करत होते.

‘गाडी बाजूला घ्या.’’ हवालदारसाहेबांनी दुचाकीचालकाला म्हटले.

‘आता मी घाईत आहे. परत कधीतरी गाडी बाजूला घेतली तर चालायचं नाही का?’ वाहनचालकाने विचारले.

‘तुम्ही मुकाट्याने गाडी बाजूला घ्या.’’ संयम ठेवत हवालदारसाहेबांनी म्हटले.

‘पण आमचा गुन्हा काय? तुम्ही आमच्या गडबडीच्यावेळी काहीही आदेश देताल, ही काय मोगलाई लागून गेली काय?’ वाहनचालकाने उत्तर दिले.

‘वाहतुकीचा खोळंबा होतोय. तुम्ही गाडी बाजूला घ्या.’’ हवालदारसाहेबांनी पुन्हा म्हटल्यावर चालकाने गाडी बाजूला घेतली.

त्यानंतर त्याने लायसन, गाडीची कागदपत्रे बाहेर काढली. हेल्मेटही हातात घेतले.

‘साहेब, मी हेल्मेट वापरतो. सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. मी कोणताही नियम मोडला नाही. तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही.’ वाहनचालकाने म्हटले. त्यावर हवालदारसाहेब हसले. त्यांनी शंभर रुपये व गुलाबाचे टपोरे फूल वाहनचालकाच्या हातावर ठेवले. गंगा उलटी वाहू लागल्याचे पाहून चालकाला धक्का बसला.

‘काय साहेब, वाहनचालकांकडून चिरीमिरी घ्यायची सोडून, त्यांनाच तुम्ही चिरमिरी द्यायला लागलाय. सूर्य काय पश्‍चिमेला उगवला काय?’

वाहनचालकाने असं म्हटल्यावर हवालदारसाहेब जोरात हसले.

‘ही चिरीमिरी नाही. तुम्ही हेल्मेट घातलंय म्हणून तुम्हाला बक्षिस दिलंय. आता इथूनपुढे हेल्मेट घालणाऱ्यांचा आम्ही असाच सत्कार करणार आहोत.’ हवालदारसाहेबांनी असं म्हटल्यावर वाहनचालकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.

‘साहेब, मी सध्या बेरोजगार आहे. मी हेल्मेट घालून रस्त्यावरून दिवसभर हिंडल्यास मला दिवसाला हजार- बाराशेची कमाई होईल का?’ वाहनचालकाने विचारले.

‘चल निघतो का आता. मघापासून तुझं खूप ऐकून घेतलं. वाहनचालकांशी सौजन्याने वागायचं, अशी वरून आॅर्डर असल्याने मी सभ्यपणानं तुझ्याशी वागतोय. तर तुझं बिल जास्तच होतंय. माझ्यातील पोलिसाला जागवू नकोस.’’ हवालदारसाहेबांनी आवाज चढवत म्हटल्यावर शंभर रुपये खिशात घालून चालक निघून गेला. त्यानंतर वाऱ्यासारखी ही बातमी शहरात पसरली. त्यामुळे अनेक चालक हेल्मेट घालून रस्त्यावरून फिरू लागले. त्यातील निवडक लोकांना शंभर रुपये व गुलाबाचे फूल मिळू लागले. त्यामुळे बहुतांश दुचाकीचालक हेल्मेट घालत असल्याचे दृश्‍य रस्त्यावर दिसू लागले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनीही फडतरेसाहेबांचं कौतुक केले.

‘लाखो रुपये दंड घेऊनही, हेल्मेटसक्ती शक्य झाली नाही. ती बाब तुम्ही अगदी सहजतेने केलीत, याबद्दल तुमचे अभिनंदन.’ असे आयुक्तांनी म्हटल्यावर फडतरेसाहेबांच्या अंगावर मूठभर मांस चढले. मात्र, काही दिवसांतच शहरातील अनेक ठिकाणी ‘हेल्मेट भाड्याने देणे आहे. एक तास - पन्नास रुपये अशा पाट्या झळकू लागल्याने फडतरेसाहेबांनी डोक्यावर हात मारून घेतला.

टॅग्स :punePanchnama