प्रश्‍नाला असे उत्तर बॉसही झाले निरुत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘तुम्ही आपल्या कामांत तरबेज असायलाच पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या अंगी अजूनही काही गुण असायला पाहिजेत. तरच तुम्ही प्रगती करू शकता.

Panchnama : प्रश्‍नाला असे उत्तर बॉसही झाले निरुत्तर

‘तुम्ही आपल्या कामांत तरबेज असायलाच पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या अंगी अजूनही काही गुण असायला पाहिजेत. तरच तुम्ही प्रगती करू शकता. सांगा बरं आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय काय गुण अंगी असायला हवेत.’’ बॉसने सर्व कनिष्ठ सहकाऱ्यांना विचारले.

‘सर, प्रामाणिकपणा’ एकाने उत्तर दिले. ‘सर कष्टाळूपणा आणि नैतिकता.’ दुसऱ्याने उत्तर दिले. ‘सर, ध्येयनिष्ठा हवी.’ तिसऱ्याने उत्तर दिले. त्यानंतर अनेकजण उत्तर देऊ लागले पण बॉसला एकही उत्तर पटेना. ‘तुमच्यामध्ये सर्वात हुशार कोण आहे, हे आपण काही उदाहरणांसह पाहू,’ बॉसने असे म्हटल्यावर सगळेजण सावरून बसले. बॉसने जवळ पडलेला लोखंडाचा तुकडा उचलला.

‘माझ्या हातात काय आहे?’ बॉसने विचारले. बहुतेक सगळ्यांनी ‘लोखंडाचा तुकडा’ असे उत्तर दिले. तेवढ्यात निखिल म्हणाला, ‘सर, तुमच्या हातात मला सोनं दिसतंय.’ ‘कसं काय?’ बॉसने विचारले.

‘सर, तुमचा हात म्हणजे परीस आहे. परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोन्यात रूपांतर होणार नाही का? म्हणून तुमच्या हातात असणारा तुकडा हा लोखंडाचा नसून, सोन्याचा आहे.’ निखिलच्या या उत्तरावर बॉसही गालातल्या गालात हसले. ‘हा लोखंडी तुकडा मी हवेत भिरकावला तर काय होईल?’ बॉसने पुन्हा एक प्रश्‍न विचारला.

‘सर, गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार तो परत जमिनीवर पडेल.’ अनेक सहकाऱ्यांनी हे उत्तर दिले. ‘‘सर, तो लोखंडाचा तुकडा परत तुमच्या पायाशी लोळण घेईल. कारण तुम्हाला सोडून कोणीही ‘हवेत’ गेला तर त्याचा शेवट ठरलेला आहे. तो तुमच्याच पायाजवळ धप्पकन पडणार, हे निश्‍चित.’ निखिलने उत्तर दिले. ‘

‘समजा लोखंडाचा तुकडा भट्टीत टाकला तर काय होईल?’ बॉसने विचारले.

‘लोखंडी तुकडा लालबुंद व तप्त होईल. त्याला हात लावला तर चटका बसेल.’ असे उत्तर अनेकांनी दिले.

‘सर, तुम्ही जर लोखंडाचा तुकडा भट्टीत टाकला तर त्याचे भविष्य उजळून निघेल आणि त्याची समाजात किंमतही वाढेल. समजा हा लोखंडी तुकडा भट्टीत टाकल्यानंतर तो एखाद्या मशिनचा किंवा गाडीचा भाग बनू शकेल. सुरवातीला त्या तुकड्याला भट्टीत टाकल्यानंतर त्रास होईल. मात्र, त्यातून तावून- सुलाखून निघाल्यानंतर त्याची किंमत आपोआप वाढेल. एखाद्या कर्मचाऱ्याच्या बाबतीतही तसेच आहे फक्त तुम्ही त्याला एका जागी ठेवून, गंजवून टाकणार आहात की भट्टीत टाकून, त्याचे भविष्य घडवणार आहात, याबाबतचा निर्णय तुमच्या हाती असेल.’ निखिलने उत्तर दिले.

‘समजा, मी रागाच्या भरात लोखंडी तुकड्याला एका कोपऱ्यात भिरकावून दिलं तर काय होईल?’ बॉसने विचारले.‘‘सर, त्या तुकड्याला ओरखडे पडतील किंवा तो चिंबेल.’ अनेकांनी उत्तर दिले.

निखिल म्हणाला, ‘सर, तुम्ही जर लोखंडी तुकड्याला रागाने कोपऱ्यात भिरकावून दिलं तर त्याला कुत्रंही विचारणार नाही. आयुष्यभर एका जागी गपगुमान पडून राहण्याशिवाय त्याच्या हातात दुसरा पर्याय नसेल. काही दिवसांनी त्याला आपोआप गंज चढेल व आपण कोणाशी पंगा घेतला होता, हे आठवून आयुष्यभर रडत बसेल.’

त्यानंतर बॉसने तो लोखंडी तुकडा पाण्यात टाकला.

‘हा तुकडा पाण्यात का बुडाला?’ बॉसने कर्मचाऱ्यांना विचारले.

‘सर, लोखंडाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. या नियमानुसार लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतो.’ अनेक कर्मचाऱ्यांनी विज्ञानावर आधारित उत्तर दिले.

निखिल म्हणाला, ‘सर, ज्याने तुमचा हात सोडला, तो बुडणार हे नक्की. जोपर्यंत लोखंडाचा तुकडा तुमच्या हातात आहे, तोपर्यंत त्याचे सोनेही होऊ शकते. मात्र, एकदा का त्याने तुमची साथ सोडायची ठरवली, तर त्याला बुडण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.’ निखिलचे उत्तर ऐकून बॉस एकदम खूष झाले. पुढच्याच आठवड्यात निखिलचे प्रमोशन होऊन, त्याचा पगारही दुप्पट झाला होता.

टॅग्स :punePanchnama