
‘मला आॅफिसच्या कामामध्ये मदत कर. असं मी तुला केव्हा म्हटलंय का? मग तू माझ्याकडून घरकामाच्या मदतीची अपेक्षा कशी करू शकतेस?’
Panchnama : अंगलट आला शेजारधर्म घरकामातील कळले मर्म
‘अहो, मला घरकामात मदत करा ना.’ प्राचीने संदेशला विनंती केली.
‘मला आॅफिसच्या कामामध्ये मदत कर. असं मी तुला केव्हा म्हटलंय का? मग तू माझ्याकडून घरकामाच्या मदतीची अपेक्षा कशी करू शकतेस?’ संदेशने पलटवार केला आणि बेडरूममध्ये आडवं पडत तो मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला. त्यानंतर प्राची संदेशच्या नावाने खडे फोडत काम करू लागली. तेवढ्यात तिला कामठेवहिनींचा फोन आला.
‘काय तुमच्याही घरात दोन- तीन मोठी झुरळं फिरतायत? बाप रे ! यांना पाठवलं असतं. मात्र, नेमके ते चिंटूच्या शाळेत पालकसभेला गेलेत.’ प्राचीने म्हटले. कामठेवहिनींचा फोन आहे, म्हटल्यावर संदेशने कान टवकारले.
‘नाही. नाही झुरळं पकडण्यात आणि माशा मारण्यात ते एक्सपर्ट आहेत. पण आता घरी नसल्यामुळे तुमच्या मदतीला येऊ शकणार नाहीत.’ प्राचीने म्हटले. तेवढ्यात संदेश मोठ्याने म्हणाला,
‘अगं मी पालकसभेवरून आलोय गं. जरा पाणी देतेस का? चिंटूच्या किती तक्रारी शिक्षकांनी केल्या. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.’ संदेशचं बोलणं ऐकून प्राचीने दातओठ खाल्ले. ‘भावोजी, आले वाटते. त्यांना पाठवता का?’ असं कामठेवहिनींनी म्हटल्यावर आलो.. आलो... वहिनी.’ असं संदेश म्हणाला. त्यानंतर मात्र प्राचीने रुद्रावतार धारण केला. ‘मला घरकामात मदत करा,’ असं मी म्हटल्यावर शंभर कारणं तुम्ही देता आणि शेजारणीने झुरळं मारायला बोलावलं की चालले धावत- पळत.’ प्राचीने रागाने म्हटले.
‘अगं तसं नाही. महिलांना झुरळं आणि पालींची भीती वाटते. त्यामुळे त्यांच्या मदतीला धावून गेल्यावर पुण्य मिळतं.’ संदेशने खुलासा केला व शेजारणीच्या मदतीसाठी गेला. थोड्यावेळाने तो परत आला.
‘एवढ्या मोठ्या नवऱ्याला तुम्ही बायका मुठीत ठेवता आणि एवढुशा झुरळाला चिमटीत पकडून बाहेर फेकून देता येत नाही. कमाल झाली.’ फुशारकी मारत संदेशने म्हटले.
‘बायकांनी झुरळं पकडायची कामे केली तर तुम्हाला पुरुषार्थ दाखवण्याची संधी कशी मिळणार?’ प्राचीने टोमणा मारला. मात्र, तिच्याकडे दुर्लक्ष करीत तो पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालून, आडवा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राचीने किचनमध्ये जोरात आरोळी ठोकली. त्यामुळे धावतच तो तिकडे गेला.
‘अहो बघा ना. केवढं मोठं झुरळ आहे. मला फार भीती वाटते. तुम्ही झुरळं पकडा आणि सगळं किचन साफ करा. किचनट्रॉलीच्या मागेही झुरळं लपली आहेत. ती बाहेर काढून, तो परिसर स्वच्छ करा. तोपर्यंत मी किचनमध्ये येणार नाही.’ असं म्हणून प्राची थरथर कापू लागली.
‘अगं त्यात भ्यायचं काय? मी झुरळांना बरोबर हिसका दाखवतो. तू काळजी करू नकोस. तू बेडरूममध्ये जा.’ असे म्हणून संदेश कामाला लागला. त्याने किचनमधील दोन- तीन झुरळे पकडली. त्याचबरोबर किचनट्रॉली आणि किचनओटाही आरशासारखा लख्ख केला. हातासरशी पंखाही साफ केला. त्यानंतर दोन तासांनी त्याने प्राचीला बोलावले.
‘आता अजिबात काळजी करायचं काम नाही. सगळी झुरळं मी पकडली आहेत. त्याचबरोबर त्यांची अंडीही साफ केली आहेत. त्याचबरोबर किचनही साफ केलंय. आता बिनधास्त स्वयंपाक कर.’’ संदेशने म्हटले. किचनचं बदललेलं रूप पाहून प्राची सुखावली.
‘खरंच तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही असताना झुरळालाच काय पण मी वाघालाही घाबरणार नाही.’’ प्राचीने असं म्हटल्यावर संदेशची कॉलर ताठ झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बेडरूममध्ये प्राची गुपचूपपणे दोन- तीन झुरळं ठेवत असल्याचे संदेशने पाहिले आणि त्याने जोरात आरोळी ठोकली....