Panchnama : रोगापेक्षा औषध भारी!

‘वजनाचा काटा एकशेदहावर थांबल्यावर डॉक्टरांनी नितीनला घाईघाईने त्याच्यावरून खाली उतरायला सांगितले.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘वजनाचा काटा एकशेदहावर थांबल्यावर डॉक्टरांनी नितीनला घाईघाईने त्याच्यावरून खाली उतरायला सांगितले.

‘वजनाचा काटा एकशेदहावर थांबल्यावर डॉक्टरांनी नितीनला घाईघाईने त्याच्यावरून खाली उतरायला सांगितले.

‘अहो, आमच्या काट्याला एवढं वजन पेलवण्याची सवय नाही. बिचारा तुटून जायचा.’ डॉक्टरांनी मिस्कीलपणे म्हटले.

‘तुम्ही दारू, बिअर काही पिता का?’’ डॉक्टरांनी विचारले. हे बोलणे ऐकून नितीनच्या डोळ्यांत त्यांच्याविषयीचा आदर दाटून आला.

‘डॉक्टरसाहेब, तुम्ही देवमाणूस आहात. हल्ली पेशंटची एवढी कोण काळजी घेतो पण आधी आपण सगळं चेकअप करून घेऊ. नंतर दारू-बियरसाठी बसू. आपल्याला स्वतंत्र खोली नसली तरी चालेल. मी ॲडजस्ट करीन. तुम्हालाही कंपनी लागते ना? मलाही कंपनीशिवाय एक घोट जात नाही.’’ एका दमात नितीनने म्हटले. त्यावर डॉक्टरांच्या रागाचा पारा चढला.

‘तुम्ही दारू, बिअर असलं काही पिता का?, हा माझा प्रश्‍न आहे. आमंत्रण नव्हे. वजनाने शंभरचा आकडा ओलांडलाय, याचं तरी भान ठेवा.’ डॉक्टरांनी रागाने म्हटले.

‘बरं तुम्ही नॉनव्हेज, पिझ्झा-बर्गंर याचबरोबर बेकरीचे पदार्थ खाता का? हा माझा प्रश्‍न आहे. लगेच मी तुम्हाला नॉनव्हेज वगैरे काही आॅर्डर करणार नाही. आधीच सांगून ठेवतो.’ डॉक्टरांनी म्हटले.

‘डॉक्टरसाहेब, रोज सकाळी मिसळ- पाव, वडासांबार- पाव किंवा बर्गर यांचा नाश्‍ता केल्याशिवाय माझे पोट भरत नाही. दुपारी आणि रात्री मटणाची भाजी आणि बिर्याणी हवीच. एवढं कष्ट करून कमवायचं आणि खायचं- प्यायचं नाही तर आयुष्याला काय अर्थ आहे का?’ नितीनने आपली बाजू मांडली.

‘कसलं कष्टाचं काम करता?’ डॉक्टरांनी विचारले.

‘सासऱ्यांचा मी एकुलता एक जावई आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती कशी वाढेल, याचं चिंतन आणि मनन मी दिवसभर बेडवर लोळून करत असतो. कधी कधी माझं हे काम चौदा- पंधरा तास चालतं.’ नितीनने म्हटले.

‘जिममध्ये व्यायाम वगैरे करता की नाही.’ डॉक्टरांनी विचारले.

‘स्वतःचे पैसे खर्च करून, दुसऱ्यांचे लोखंड उचलायला सांगितलंय कोणी? एकाच जागी उगाचंच पळायचं, याला काय अर्थ आहे का? शरीराला त्रास द्यायला मला अजिबात आवडत नाही.’ नितीनने खुलासा केला.

‘हे बघा, बकासुरासारखं खाताय आणि काडीचाही व्यायाम करत नाही. त्यामुळेच तुमचं वजन वाढलंय. मी तुम्हाला डायट प्लॅन देतो. त्यानुसार वागायचं.’ डॉक्टरांनी इशारा दिला.

‘चालेल.’ खालच्या आवाजात नितीनने म्हटले.

‘सर्वात प्रथम मद्यपान बंद करायचं. नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. तेलकट पदार्थांना हातही लावायचा नाही. मोड आलेली कडधान्ये आणि गाजर, बीट, काकडी यासारख्या सॅलडवर भर द्यायचा.’ डॉक्टरांनी निक्षून सांगितलं.

‘पण डॉक्टरसाहेब, एखाद्याने फारच आग्रह केला तर दारू व नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का?’ नितीनने शंका विचारली.

‘कोणी फारच आग्रह केला तर दारू व नॉनव्हेज खाल्लं तरी चालेल.’ डॉक्टरांनी थोडी माघार घेतली.

‘आता तुम्ही मला महिन्याने भेटायला या. तुमचे वजन सात किलोने कमी झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा.’ डॉक्टरांनी म्हटले. त्यानंतर नितीन क्लिनिकबाहेर पडला. बरोबर एक महिन्याने तो एका व्यक्तीला सोबत घेऊन डॉक्टरांना भेटायला गेला.

‘डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या सूचना मी पाळत आहे. दारू आणि नॉनव्हेज तर सोडूनच दिलंय. फक्त कोणी फारच आग्रह केला तरच या दोन गोष्टी घेतो. अन्यथा नाही.’ नितीनने अभिमानाने सांगितलंय.

‘फारच छान. इथूनपुढेही असंच वागायचं.’ डॉक्टरांनी आनंदाने म्हटले.

‘बरं तुमच्यासोबत हे कोण गृहस्थ आहेत.’ डॉक्टरांनी सहज विचारले.

‘डॉक्टरसाहेब, गेल्या महिन्यापासून मी यांना नोकरीवर ठेवलंय. यांना बाकी काही काम नाही. फक्त रोज दारू आणि मटण खाण्यासाठी मला आग्रह करत राहायचं. बस्स!’ नितीनने असं म्हटल्यावर ‘गेटआऊट’ असे डॉक्टर जोरात ओरडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com