प्रेयशीच्या लग्नाचं जेवण प्रेमाला पुन्हा लागलं ग्रहण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘गणेश, माझं लग्न ठरलंय. तू लग्नाला आलंच पाहिजेस. नक्की येशील ना? नाही आलास तर माझ्यावर तुझं खरं प्रेमच नव्हतं, असं मी समजेन. बाकी सगळी खरेदी झाली आहे.

Panchnama : प्रेयशीच्या लग्नाचं जेवण प्रेमाला पुन्हा लागलं ग्रहण!

‘गणेश, माझं लग्न ठरलंय. तू लग्नाला आलंच पाहिजेस. नक्की येशील ना? नाही आलास तर माझ्यावर तुझं खरं प्रेमच नव्हतं, असं मी समजेन. बाकी सगळी खरेदी झाली आहे. आता फक्त जवळच्या लोकांना आमंत्रण देत आहे.’ प्रज्ञाचे बोलणं ऐकून राहुलला धक्का बसला.

‘अगं माझं नाव राहुल आहे. आता तू मलाच काय पण माझं नावही विसरलीस का?’ राहुलने रागाने प्रज्ञाला विचारले.

‘सॉरी राहुल, अरे लग्न ठरल्यामुळे मी माझ्या मोबाईलमधील सगळा डाटा उडवला आहे. त्यामुळे माझ्याकडे कोणाचेच नंबर सेव्ह नाहीत. डायरीममध्ये एके ठिकाणी ‘भंगारवाला’ म्हणून एक नंबर लिहून ठेवला होता. मला वाटलं तो नंबर गणेशचा असेल पण तुझा निघाला. गणेशचा नंबर बहुतेक ‘रिचार्जवाला’ म्हणून डायरीत लिहून ठेवला असेल. ते जाऊ दे. माझ्या लग्नाचं निमंत्रण मी तुला देत आहे. आता मी गणेशला फोन करण्याच्या फंदात पडत नाही. तो दुसऱ्याच कोणाला लागायचा. त्यामुळे माझं लग्न ठरल्याचा निरोप तू गणेशला पण दे. देशील ना?’

‘लग्न कसं काय ठरलं?’ राहुलने रागाने विचारले.

‘पंधरा तोळे सोने व लग्नाचा सगळा खर्च आम्ही करायचा.’ प्रज्ञाने सांगितले.

‘अगं लग्न कसं ठरलं, असं मी विचारत नाही. मला न सांगता कसं काय ठरवलं. आपलं ठरलं होतं ना पळून जाऊन लग्न करायचं.’ राहुलने जाब विचारला.

‘आपण पळून जाणार म्हणून बाबांनी सगळी तयारी पण करून ठेवली होती. दोनवेळा आपल्यासाठी त्यांनी कॅब बुक केली होती. पण तू दोन्ही वेळेला बेत पुढे ढकलला. त्यामुळे असला कचखाऊ जावई मला नको, असा निर्णय बाबांनी घेतला. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे लग्न ठरवले आहे.’ प्रज्ञाने माहिती पुरवली.

‘अगं पण तू तरी विरोध करायचा होतास ना.’ राहुलने चिडून म्हटले.

‘मी खूप विरोध केला पण बाबांनी नवरदेवाचे बंगले, फार्महाऊस व त्याच्या कंपन्यांची माहिती दिली. मग मीही विचार केला की तुला माझ्यापेक्षा श्रीमंत स्थळ मिळेल. करोडपतीच्या एकुलत्या एका मुलीशी तुझे लग्न होऊन, तूदेखील श्रीमंत होशील. फक्त तुझ्या भल्यासाठीच मी या स्थळाला होकार दिला आहे. दुसऱ्याचं हित पाहणं, यालाच खरं प्रेम म्हणतात, असं तू नेहमी म्हणायचास ना. मी फक्त तुझंच हित पाहतेय रे. बाकी काही नाही. पण तू माझ्या लग्नाला नक्की ये.’’ प्रज्ञाने म्हटलं.

‘अगं पण माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम होतं. मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. मी तुला दिलेली इतकी प्रेझेंट वाया गेली का’ राहुलने म्हटले.

‘मलाही तुझ्याबरोबरोबर लग्न करायचं होतं. मात्र, लग्नाच्या गाठी ब्रह्मदेव बांधतो ना. देवाला आपलं लग्न मंजूर नसावं. आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चालेना.’ प्रज्ञाने असं म्हटल्यावर राहुलने फोन बंद केला.

काही दिवसांनी राहुल प्रज्ञाच्या लग्नाला गेला. तेथील श्रीमंती माहौल पाहून, तो थोडा कावरा-बावरा झाला. मात्र, थोड्याच वेळात त्याने स्वतःला सावरले व तो जेवणाच्या हॉलमध्ये गेला. तेथील उंची जेवण पाहून तो कमालीचा सुखावला. मग काय प्रत्येक डिशचा आनंद घेणे, हे आपले कर्तव्य आहे, असे समजून तो जेवणावर तुटून पडला. जेवण अतिउत्तम असल्यामुळे आपण प्रियशीच्या लग्नाला आलो आहोत, हेही तो विसरून गेला. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना प्रेमात घेतलेल्या आणाबाकांचंही त्याला विस्मरण झालं. भरपेट जेवणानंतर तृप्तीचा ढेकर त्याने दिला व ‘प्रियशीच्या लग्नात जेवण’ या कॉलमखाली त्याने दहाव्या नावावर फुली मारली. अजून किती जणींच्या लग्नात जेवायला जायचंय, याचीही तो उजळणी करू लागला.