
‘आमच्या येथे जुन्या व वापरलेल्या मास्कचे इलॅस्टिक घट्ट करून वा बदलून मिळेल’ ही दारावरील पाटी वाचून आम्ही तीनवेळा बेल वाजवली. थोड्यावेळाने आजोबांनी दार उघडले.
Panchnama : मास्कशिवाय झाले आमचे तोंड बंद...
‘आमच्या येथे जुन्या व वापरलेल्या मास्कचे इलॅस्टिक घट्ट करून वा बदलून मिळेल’ ही दारावरील पाटी वाचून आम्ही तीनवेळा बेल वाजवली. थोड्यावेळाने आजोबांनी दार उघडले.
‘‘काऽऽऽयेऽऽ’’ आजोबा खेकसले. त्यांचं रौद्ररूप पाहून आम्हाला घाम फुटला व घशाला कोरड पडली.
‘‘पाणी देता का?’’ आम्ही कसेबसे म्हटले.
‘‘लोकांची झोपमोड करून, तुम्ही फक्त पाणी प्यायला आलाय का? पुण्यातील समस्त हॉटेलांना काय टाळं लागलंय काय?’’ आजोबांनी रागाने विचारले. ‘‘माझं काम होतं.’’ आम्ही म्हटले.
‘‘ही काय वेळ आहे का बेल वाजवायची?’’ आजोबा पुन्हा खेकसले.
‘‘मग तुम्ही दरवाजावर बेल वाजवायचे टाइमटेबल का लावत नाही?’’ आम्हीही जशास तसे उत्तर दिले.
‘दुपारी एक ते चार या वेळेत बेल वाजवू नका. तरीही बेल ‘वाजवल्यास’, कोणी तुमच्या कानाखाली ‘वाजवल्यास’ राग मानू नका.’ ही पाटी आम्ही काय दाराची शोभा वाढवायला लावली आहे का?’’ आजोबांनी रागाने म्हटले.
‘‘शहरात कोरोना पुन्हा वाढतोय. त्यामुळे....’’ आम्ही कसंबसं म्हटलं.
‘‘कोरोना वाढतोय, तर मी काय करू? मी पसरवतोय का? आणि एवढं सांगण्यासाठी तुम्ही माझ्या घरी आला आहात का? आमच्याही घरी टीव्ही आणि वर्तमानपत्रं येतं. त्यामुळं जगात काय घडतंय, याची आम्हाला खबरबात असते. तुम्ही उगाच कशातही नाक खुपसू नका.’’ आजोबांनी धारेवर धरले.
‘‘माझं ऐकून घ्या ना.’’ आम्ही विनवणी केली.
‘‘म्हणजे? माझ्या घरी तुम्ही येणार आणि तुमचंच मी ऐकून घ्यायचं होय? हा कोठला न्याय? आमच्या घरी आला आहात, तर आमचंच ऐकायचं. त्यात तुम्ही दुपारचं कशाला कडमडलात? सुया-कंगवे, इना-पिना, बिब्बं असलं काही विकायला आला असाल तर चालते व्हा.’’ आजोबांनी बाहेरचा रस्ता दाखवत म्हटले. ‘‘आजोबा, माझ्याकडं बघून मी तुम्हाला सुया-कंगवं-बिब्बं विकणारा वाटलो का? असली बायकांची कामं करत नसतो.’’ आम्ही म्हटले.
‘‘मग कसली पुरुषार्थाची कामं करता, ते तरी कळू द्या.’’ आजोबांनी विचारले.
‘‘आता कोरोना वाढतोय...’’ आम्ही असं म्हटलं आणि आमचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आजोबा रागाने फुटले.
‘‘तुम्ही तेच तेच मला काय सांगताय? तुम्हाला काय स्मृतिभ्रंश झाला आहे का?’’ आजोबा रागाने पेटले होते. दुपारची झोपमोड झाल्याचा सगळा राग ते आमच्यावर काढत होते.
‘‘आता कोरोना वाढत असल्याने मास्कची फार गरज आहे.’’ आम्ही म्हटले.
‘‘म्हणजे तुम्ही मास्क विकायला आला आहात का? आम्ही दारावरील विक्रेत्यांकडून मास्क घेत नाही.’’ आजोबांनी ठणकावून सांगितले.
‘तुमच्या येथे मास्कचे इलॅस्टिक घट्ट करून वा बदलून मिळेल’ अशी पाटी लावली आहे. त्यामुळे मी आलो होतो.’’ आम्ही खुलासा केला.
‘‘मग हे आधी सांगता येत नाही का? उगाचंच फापटपसारा लावून, आमचा वेळ घेतला.’’ आजोबांनी रागाने म्हटले.
‘‘मास्कचे इलॅस्टिक घट्ट करून देण्याचे पाच रुपये व बदलून देण्याचे दहा रुपये होतील. कामाचे सुटे पैसे द्यायचे, उगाचंच पाचशेची नोट दाखवून, श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं नाही. आम्ही चिल्लर ठेवत नाही. आमच्याकडे पाच-दहा रुपये राहिले तर तेवढ्या पैशांचा बाम आम्ही कपाळाला लावून देऊ किंवा डोक्याला खोबरेल तेल लावायला देऊ. न फुटलेल्या फटाक्यांनाही आम्ही वाती लावून देतो. पण त्या फक्त दिवाळीतच. आधीमधी याल तर अपमान सहन करावा लागेल.’’ आजोबांनी नियमावली सांगितली.
‘‘ठीक आहे. पाच मास्कचे इलॅस्टिक घट्ट करून द्या.’’ आम्ही म्हटले.
‘‘दुपारी एक ते चार आम्ही कोणतीही ऑर्डर घेत नाही. तुम्ही चारनंतर या.’’ असे म्हणून आजोबांनी आमच्या तोंडावर दार आपटले.