#PuneFlood घर बुडाले, काम बुडवून कसे जमेल! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कामगार पुतळा येथील झोपडपट्टीत रहाणाऱ्या महिलांची. तीन दिवस झाले शाळेत मुक्काम असल्याने पुन्हा घरी परतण्यासाठी नदीचे पाणी कधी ओसरेल याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. 

पुणे - ‘‘पुरात घर बुडाले, नुकसानही मोठे झाले; पण आता काम बुडवून इथं शाळेतच बसलो तर कसं जमलं. रोज सकाळी उठून कामाला जावंच लागतंय, तरच हातात दोन पैसे राहतील.’’ ही अवस्था आहे, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीत रहाणाऱ्या महिलांची. तीन दिवस झाले शाळेत मुक्काम असल्याने पुन्हा घरी परतण्यासाठी नदीचे पाणी कधी ओसरेल याकडे त्यांचे डोळे लागले आहेत. 

कामगार पुतळा येथील झोपड्यांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यातील सुमारे ३०० कुटुंबांनी शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतीतील पालिकेच्या वीर नेताजी पालकर शाळेत (क्रमांक २) आसरा घेतला आहे.

कचरा वेचक शामला केंजळे म्हणाल्या, ‘‘महापालिकेत कंत्राटी कामगार आहे. सध्या शाळेत मुक्काम असला तरी पहाटे उठून कामाला जावे लागते. घर बुडाले आहे.  आता काम बुडवून अजून नुकसान कसे जमेल.’’ 

‘‘कामासाठी बाहेर गेले तेव्हा पूर आल्याने आम्हाला घरातून कपडे, पांघरूणही घेता आले नाही. धुणे भांडे करायला जाते तेथील मालकिणीने साडी दिली. आम्हाला कोणीही ब्लॅंकेट आणून दिलेले नाही,’’ असे लक्ष्मी भालके यांनी सांगितले. 

दुर्गा गोरखे म्हणाल्या, ‘‘आज थोडेसे पाणी कमी झाल्याचे कळाले आहे; पण अजून घरात पाणी असून सगळे साहित्यही तेथेच आहे. आता किती वस्तू चांगल्या आहेत, हे माहिती नाही. असं शाळेत किती दिवस 

रहायचे? थंडीमुळे लेकरांचे हाल होत आहेत.’’ पालिकेच्या १४ क्रमांकाच्या शाळेत शिकणारी वैभवी म्हणाली, ‘‘आमचे घर भिंतीला लागून असल्याने नदीचे पाणी जोरात घरात आले. सोबत काहीच घेता आले नाही. माझ्या वह्या, पुस्तके भिजली आहेत. माझी आई धुणे भांड्याला जाते तेथील लोकांनी पांघरूण दिले आहे.’’

ब्लॅंकेट आलेच नाहीत
पूरग्रस्तांच्या खाण्यापिण्याची सोय करण्याची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्थानिक नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते, संस्थांवर सोपवली आहे. त्यानुसार नाष्टा व जेवण मिळत आहे. थंडीने काकडणाऱ्या नागरिकांना ब्लॅंकेट वाटण्यास संस्थांना सांगितले आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले होते; पण या शाळेतील अनेक नागरिकांना पांघरायला काहीच मिळालेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slum aera women raction