बेचिराख घरांत फुटले अश्रूंचे बांध

Fire
Fire

रात्रंदिवस कष्ट करून उभे केलेले संसार बुधवारी दुपारी आगीने कवेत घेतले. संसाराची राख झालेल्या रहिवाशांची रात्र भरलेल्या डोळ्यांनी आपल्या लेकराबाळांसह पाळलेले मांजर, कुत्रे अशा मुक्‍या जनावरांना शोधण्यात गेली. रात्र सरली, आगीची धग मात्र कायम राहिली. भल्या पहाटे सगळ्यांची पावलं आपलं घर शोधण्यासाठी वळली. बेचिराख घरात काळेठिक्क होऊन पडलेले कपडे, संसारोपयोगी वस्तू, धान्य, पोटाला चिमटा घेऊन पै-पै करून जमविलेले पैसे, सोन्या-चांदीचे दागिने शोधताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.  

पुणे - पाटील इस्टेट झोपडपट्टीत आग लागून ८० ते १०० झोपड्या खाक झाल्या. कोणी कचरावेचक, कोणी रिक्षाचालक, कोणी घरकाम करून-रस्त्यावर फणी-कंगवा विक्री करून पोट भरणारे, तर कोणी हातगाडीवर भाजीपाला विकून संसाराचा गाडा चालविणारे. हे कष्टकरी ४०-५० वर्षांपासून राहत आहेत.   

...आता खायचे काय, जगायचे कसे?
पन्नास ५० वर्षे वस्तीत राहणाऱ्या ६०-७० वर्षांच्या सुमन ऐखे महापालिकेजवळ फणी-कंगवा विकून गुजराण करतात. त्यांचं एकटीचच कुटुंब. आधाराला कोणी नाही. अशातच आगीने त्यांचा संसार जाळून टाकला. ‘‘मी एकटीच राहते. चिकुनगुनियाने आजारी आहे. आगीमध्ये घरातले सगळे जळून गेले. धान्य, पीठही जळाले. आता जगायचं कसे?’’ असे सांगताना त्यांचे डोळे भरले. 

नवा संसार आगीने गिळला 
कचरा वेचून पोट भरणाऱ्या प्रकाश दुबळेचे एक-दीड वर्षापूर्वी लग्न झाले. नवा संसार घरात आला; पण आगीने तो सगळा संपवून टाकला. ‘‘काबाडकष्ट करून घर उभे केले; पण सारे काही संपले.’’ असं प्रकाश सांगत होता.

दोन-चार तासांतच सारे काही संपले
हनिफा शेख म्हणाल्या, ‘‘मुले कागद-काचपत्रा वेचतात. त्यावरच प्रत्येकाने संसार उभे केले. घरात सारे काही होते, पण दोन-चार तासांतच संसार जाळून टाकला.’’ 

देवाची मूर्ती तेवढी वाचली
आग लागली तेव्हा मी कामावर गेले होते. घरी येईपर्यंत सासऱ्यांनी तीन लहान मुलांना बाहेर काढले होते; पण सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. मुलांचे गणवेश, दप्तर, महत्त्वाची कागदपत्रे, भिशीसाठी ठेवलेले रोख चाळीस हजार रुपयेही जळाले. पै न्‌ पै जमवून साठवलेले डोळ्यांसमोर जळत होत. देवाची मूर्ती सोडून आगीत सर्व जळून गेले, हे सांगताना वर्षा वाघमारे यांना अश्रू अनावर झाले. 

घराला काय झालं गं आई...
‘आपल्या घराला काय झालं गं आई’, असा प्रश्‍न कल्पना शिंदे यांच्या अठरा वर्षांच्या मतिमंद मुलानं विचारला आणि हृदय पिळवटून निघालं आणि त्यांना रडू कोसळलं. आगीतून जीव वाचविण्यासाठी आठ महिन्यांच्या नातवाला घेऊन बाहेर आले; पण माझा मतिमंद मुलगाही घरात होता. आगीच्या ज्वाला अगदी घराच्या जवळ पोचल्याने जीव मुठीत घेऊन मी त्या दोघानांही आगीतून कसेबसे बाहेर काढले. 

जिवाच्या आकांताने जनावरे सैरभैर
या आगीत केवळ माणसांची वाताहत झाली नाही, तर मुक्‍या जनावरांनाही झळ बसली. आगीच्या ज्वालांपासून जीव वाचविण्यासाठी ही जनावरे सैरभैर धावत होती, हा अनुभव सांगत होत्या या भागात राहून बकऱ्या पाळणाऱ्या तोलन कांबळे या आजी! त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या तेरा बकऱ्या आहेत. या आगीत तीन बकऱ्या भाजल्या. आगीचा एकदम भडका उडाला तेव्हा बकऱ्या बांधलेल्याच होत्या. त्यांना वाचवण्यासाठी काही तरुण पोरांनी अथक परिश्रम घेतले.’’

दफ्तर अन्‌ गणवेशही जळाला
आग लागल्यानंतर आजोबांनी आम्हाला घेऊन रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. काही वेळांतच आगीच्या ज्वालामध्ये आमचे घर सापडले. आग आटोक्‍यात आल्यानंतर परत गेल्यावर पाहिले, की आमचे घर पूर्णपणे खाक झाले होते. आम्हा भावंडांचे शाळेचे दप्तर, गणवेश सर्व काही जळून गेल्याचे साहिल वाघमारे सांगत होता.

डोळ्यांसमोर सारं काही संपलं
घरामध्ये स्वयंपाक करत असताना लोकांचा आरडा-ओरडा झाल्याने बाहेर येऊन पाहिले, तर वस्तीत आग लागल्याचे समजले. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी घरातून बाहेर पळ काढला. मुलाने गॅस सिलिंडर बाहेर काढला; पण आगीमुळे इतर साहित्य बाहेर काढणे शक्‍य झाले नाही. पै-पै कमवून उभा केलेला संसार डोळ्यांसमोर जळून गेल्याचा विजया कांबळे सांगत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com