हातातले काम सोडून घराकडे धावलो!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - कामावर असताना आग लागल्याचे कळाले. हातातलं काम सोडून घराकडे धाव घेतली. घरातला गॅस सिलिंडर आणि जमेल तेवढे सामान बाहेर काढले. शेजारच्या पाच-सहा घरातले सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आगीचा भडका उडाला नाही. तेवढ्यात घराचा वरच्या मजल्याला आग लागली आणि डोळ्यांदेखत वरचा मजला खाक झाला... अमोल भोरड सांगत होता. 

पाटील इस्टेट परिसरात बुधवारी लागलेल्या आगीत अमोलच्या घराचा वरचा मजला खाक झाला. सुदैवानं खालच्या खोलीतील सामान वाचले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अमोल फायर ब्रिगेडच्या जवानांबरोबर झटत होता. त्याच्या वडिलांना अर्धांगवायू झाला असून, ते घरीच असतात. काही दिवसांपूर्वीच त्याने त्यांना बहिणीच्या घरी सोडले होते. ते घरी असते तर अवघड परिस्थिती झाली असती. त्यांना चालायलाही येत नाही. आम्ही कोणीच घरी नव्हतो, असे अमोल सांगत होता. 

अमोलची आई वनिता म्हणाल्या, ‘‘सामान बाहेर नेण्याच्या धावपळीत काही सामान पडले, तर काही सामान कोणाच्या हातात दिले आठवत नाही. त्यामध्ये दागिनेही होते. कष्टानं जमा केलेलं सोनं आता राहिलं नाही. ज्या शिवण मशिनवर उदरनिर्वाह होतो, त्या मशिनचीही राख झाली आहे.’’ 

घर जळाल्यानं कालची रात्र स्टेशनवरच काढावी लागली. शेजारच्या वस्तीतील लोकांनी जेवण आणि झोपण्यासाठी अंथरून आणून दिले. मला दोन मुले आहेत. आम्ही तिघे मिळून सफाईचे काम करतो. सगळं जळालं आहे. पुन्हा शून्यातून सुरवात करावी लागणार. 
-संगीता चव्हाण 

राजकीय पक्षांचे कार्यकर्ते चादर आणि साहित्याचे वाटप करत आहेत. ते तेवढंच देऊन निघून जातील; मात्र तेवढ्याने काय होणार? आमची घरं पूर्ण नाहीशी झाली आहेत. ज्यांना आम्हाला मदत करायची असेल त्यांनी भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.  
-विशाल देवकुळे 

Web Title: Slum Fire Loss People