भीषण आगीत 90 झोपड्या खाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - संगमवाडी परिसरातील पाटील इस्टेटजवळ बुधवारी (ता. 28) दुपारी लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक झोपड्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी सुमारे 90 झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र सहा जण किरकोळ जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेकांचे संसार त्यांच्या डोळ्यांदेखतच उद्‌ध्वस्त झाले. आग लागण्याचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नव्हते. मात्र, सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक दलाने सुमारे 35 टॅंकरच्या माध्यमातून तीन तासांत आग आटोक्‍यात आणली.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालतच्या पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात सुमारे बाराशे झोपड्या आहेत. येथील गल्ली क्रमांक तीनमध्ये दुपारी सव्वाच्या सुमारास एका झोपडीतून अचानक धूर येऊ लागला. काही मिनिटांतच आजूबाजूच्या झोपड्यांनीही पेट घेतला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आणि पळापळ झाली. आगीमुळे सहा ते सात झोपड्यांमध्ये सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे आगीचा भडका उडाला. तोपर्यंत अग्निशामक दलाचे 20 बंब आणि टॅंकर घटनास्थळी पोचले. सायंकाळी चारच्या सुमारास आग आटोक्‍यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती धुमसत होती. याच परिसरात दोन दिवसांपूर्वीही आग लागली होती. त्या घटनेचा आणि बुधवारी लागलेल्या आगीचा काही संबंध आहे का, याचा पोलिस, अग्निशामक दलाकडून तपास सुरू आहे.

पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट दिली. महापालिकेने तत्काळ मदत कार्य सुरू केले. सुमारे 100-150 रहिवाशांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मदत कार्यासाठी पथके कार्यान्वित केली. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणाले, 'आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, त्याबाबत तपास सुरू आहे. या घटनेत 90 झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.''

वाहतूक कोंडीमुळे टॅंकर, बंब पोचण्यास उशीर
आगीच्या घटनेमुळे जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या रस्त्यावरील पुलाखालील वाहतूक काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पिंपरी -चिंचवड, खडकी आणि पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मागविलेले टॅंकर कोंडीत अडकले होते. त्यामुळे आग आटोक्‍यात आणण्यास विलंब झाला. बघ्यांच्या गर्दीनेही मदत कार्यात अडथळा येत होता. सायंकाळी आग आटोक्‍यात आल्यावर रहिवाशांनी आपल्या घरांकडे धाव घेतली अन्‌ चीज वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. आगीत नेमक्‍या किती झोपड्यांचे नुकसान झाले हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

एकीकडे आग अन्‌ दुसरीकडे अश्रू
कुणी रिक्षाचालक, कुणी सुरक्षारक्षक, तर काही जणांनी मिळेल ते काम करीत, पै-पै जमवून आपलं छोटंसं घर उभारलं. पण, याच संसाराची डोळ्यांदेखतच राख होते, तेव्हा संसार उभारणाऱ्यांची अवस्था काय होऊ शकते, याचा विदारक अनुभव बुधवारी पाटील इस्टेटजवळील झोपडपट्टीत आला. एकीकडे किचनमधील भांडी, कपडे, सोन्या-चांदीचे दागिने जळत होते अन्‌ दुसरीकडे रहिवाशांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. काही तासांनी आग शांत झाली, पण तिने घरांमधील सर्वस्व आपल्यासोबत नेले. भीषण आग आटोक्‍यात येताच शेकडो पावले घराच्या दिशेने वळाली आणि आपला संसार शोधू लागली. घरातील काही तरी हाती लागेल? अशा नजरेत अश्रुधारांशिवाय काहीही पाहायला मिळाले नाही...

घटनाक्रम
- दुपारी साडेबाराच्या सुमारास एका झोपडीस आग.
- काही झोपड्यांतील गॅस सिलिंडरचा स्फोट.
- पंधरा मिनिटांत आसपासच्या झोपड्यांमध्ये आग पसरली.
- रहिवाशांनी घराबाहेर पडताना घरातील वस्तू बाहेर काढल्या.
- सायंकाळी 4.30 वाजता आगीवर नियंत्रण.

आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांना महापालिकेने मदत सुरू केली आहे. ज्यांची घरे जळाली त्यांना पत्रे आणि वासे देण्यात येणार आहेत. या रहिवाशांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली असून, काही दिवस त्यांना मदत केली जाईल.
- मुक्ता टिळक, महापौर

Web Title: Slum Fire Patil Estate