झोपडीधारकच बांधणार इमारत

झोपडीधारकच बांधणार इमारत

पुणे - एकीकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी विकसक पुढे येण्यास तयार नसताना भाऊ पाटील रस्ता येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत स्वत:चे पुनर्वसन स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील झोपडीधारकांसाठी हे एक आदर्श उदाहरण ठरणार आहे. 

शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावीत, यासाठी राज्य सरकारकडून ‘एसआरए’ची स्थापना करण्यात आली. मात्र ‘एसएआर’बाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे दहा ते पंधरा वर्षांत पन्नासहून अधिक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. सरकारच्या या धोरणामुळे विकसकही पुढे येण्यास तयार नाही, असे चित्र असताना भाऊ पाटील रस्त्यावरील कांबळे वस्ती लगत असलेल्या झोपडीधारकांनी पुढे येत हा नवा पायंडा पाडला आहे. 

भाऊ पाटील रस्त्यावरील कांबळे वस्तीलगत असलेल्या सर्व्हे नंबर ३९/१/ब/१ या बारा गुंठे जागेवरील सुमारे चाळीस झोपडीधारकांनी एकत्र येत हा प्रयोग केला आहे. त्यासाठी झोपडपट्टीतील सर्व झोपडीधारकांनी एकत्र येत नालंदा सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने सहकारी सोसायटीची नोंदणी ‘एसआरए’कडे केली आहे. नुकतेच ‘एसआरए’कडून त्यांना याचे नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. आता जागेची मोजणी आणि त्यानंतर लवकरच पुनर्वसनाचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दाखल करण्यात येईल. 

आमचे पुनर्वसन करण्यासाठी दुसरे कोणी पुढे यावे, यापेक्षाच आम्हीच आमचे पुनर्वसन का करू नये, हा विचार आमच्या मनात आला. वस्तीतील सर्वांनी बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला. आता सहकारी संस्था स्थापन केली आहे.
- सुभाष संभाजी जोगदंडे, अध्यक्ष, नालंदा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

जागा मालक अथवा झोपडपट्टीधारकांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करून पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल केला तर त्याला मंजुरी देण्याची तरतूद आहे. 
- पांडुरंग पोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com