झोपडपट्ट्यांचीही फेडरेशन

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सोसायटी स्थापनेनंतर मिळणारे फायदे

  • नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन झाल्यास सर्वेक्षण, पात्रतानिश्‍चितीची प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत
  • सोसायटीतून पुनर्विकासाकरिता विकसक निवडण्याची सभासदांना संधी
  • झोपडीधारकांना स्वत:च पुनर्विकासेचा प्रस्ताव दाखल करता येणार
  • व्यक्तिगत तक्रारीचे सोसायटीच्या स्तरावरच निराकरण शक्‍य

पुणे - झोपडीधारकांचे पुनर्वसनासह विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व झोपडपट्ट्यांचे मिळून एक फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी या दोन्ही शहरांतील सुमारे साडेपाचशेहून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये रहिवाशांची गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्याचे काम सुरू केले आहे. या सर्व सोसायटीच्या सभासदांमधून फेडरेशनची बॉडी नेमण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात येत आहे.

शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावीत, यासाठी राज्य सरकारकडून ‘एसआरए’ची स्थापना करण्यात आली. मात्र, ‘एसएआर’बाबतच्या सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे चौदा वर्षांत पन्नासहून अधिक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले नाही. या धोरणामुळे विकसकही पुढे येत नाहीत. त्यामुळे शहर झोपटपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न हे कागदावरच राहिले आहे.

विकसक पुढे आल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सुरू होते. या पद्धतीत बदल करून झोपडीधारकांनीच एक पाऊल पुढे टाकून स्वत:च स्वत:च्या पुनर्वसनाचा विषय हाती घ्यावा, यासाठी झोपडीधारकांनी एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करावी. या सोसायटीच्या माध्यमातून पुनर्वसनासह अनेक विषय मार्गी लावणे त्यांना शक्‍य व्हावे, यासाठी प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले आहेत. सोसायटी स्थापन करण्यासाठी प्राधिकरणानेही पुढाकर घेतला आहे. प्रत्येक झोपडपट्टीत सोसायटी स्थापन झाल्यानंतर त्यांची एक शिखर संस्था म्हणून फेडरेशन स्थापण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे. त्यामुळे झोपडीधारकांचे पुनर्वसनापासून ते सर्व प्रकारचे प्रश्‍न फेडरेशन आणि प्राधिकरण यांच्या समन्वयाने सोडविण्याचे नियोजन आहे. 

प्रस्ताव कोण दाखल करू शकतो
  सोसासटी स्थापन करण्यासाठी किमान ११ मेंबरची गरज
  झोपडपट्टीतील किमान ५१ टक्के सभासद सोसायटीचे सदस्य हवेत
  अथवा योजना सुरू असल्यास संबंधित योजनेचे विकसक
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
  रहिवासी पुरावा (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, लाइट बिल, रेशन कार्ड इत्यादी स्वसाक्षांकित प्रत)
  शंभर रुपयांच्या नॉन ज्युडिशिअल स्टॅम्पपेपरवर मुख्य प्रवर्तक यांचे ‘नमुना वाय’मधील प्रतिज्ञापत्र
  सभासदत्वासाठी प्रति सभासद पाचशे रुपये भागभांडवल आणि १०० रुपये प्रवेश शुल्क आकारणी
  संस्थेची नोंदणी करण्यासाठी २ हजार ५०० रुपये शुल्क
  कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर ५० ते ६० दिवसांत सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी होणार
  अधिक माहिती www.srapune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध 

झोपडीधारकांना पुनर्वसनाबाबत योग्य माहिती व मार्गदर्शन मिळून त्यांना सुयोग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे. पुनर्वसन जलद गतीने व्हावे, या हेतूने झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. ती स्थापन करण्यासाठी सोसायट्यांना सर्व पातळीवर मदत केली जाणार आहे.
- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slum Rehabilitation Federation