पिंपरीत लघुउद्योगांना मंदीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

पिंपरी - सध्याच्या काळात नवनवीन वाहने बाजारात येताना दिसत असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. वाहनउद्योगात मंदी सुरू असून, त्याचा फटका स्वाभाविकच लघुउद्योजकांना बसत आहे. गेल्या पाच महिन्यांत या मंदीमुळे उद्योगनगरीतील या व्यवसायाला तब्बल दीडशे ते दोनशे कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 

पिंपरी - सध्याच्या काळात नवनवीन वाहने बाजारात येताना दिसत असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. वाहनउद्योगात मंदी सुरू असून, त्याचा फटका स्वाभाविकच लघुउद्योजकांना बसत आहे. गेल्या पाच महिन्यांत या मंदीमुळे उद्योगनगरीतील या व्यवसायाला तब्बल दीडशे ते दोनशे कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 

शहरातील एमआयडीसी आणि अन्य परिसरात कार्यरत असणाऱ्या लघुउद्योजकांची संख्या बारा हजारांपर्यंत आहे. त्यापैकी ऑटोमोबाइल कंपन्यांशी संबंधित असणाऱ्या लघुउद्योजकांची संख्या सात हजार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ऑटोमोबाइल उद्योगात मंदीचे वातावरण आले आहे. त्यामुळे या कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या उद्योजकांच्या कामावर परिणाम झाला. 

वस्तुस्थिती काय? 
लघुउद्योजकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कमी झालेल्या कामामुळे अनेकांनी सेकंड शिफ्ट, ओव्हरटाइमचे काम बंद केले आहे. मात्र, उद्योजकांवर कामगार कपात करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. मोठ्या कंपन्याकडून येणाऱ्या मागणीचे प्रमाण कमी झाल्याने लघुउद्योगांना उत्पादनाचे प्रमाण कमी करावे लागले आहे. अनेक लघुउद्योजकांनी दीड ते दोन वर्षांपूर्वी उत्पादन प्रकल्पाची क्षमता वाढविली आहे. त्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन नवीन अत्याधुनिक मशिन्सची खरेदी केलेली आहे. आता वाहन उद्योगात आलेल्या मंदीमुळे खर्च भागवणे कठीण जात आहे. त्यात काही दिवसांपूर्वी वाढलेल्या वीजदरांमुळे वाढलेला आर्थिक भार लघुउद्योजकांना त्रासदायक ठरत आहे. वाहन उद्योगातील मंदीमुळे लघुउद्योजक क्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती दिवाळीपूर्वी सुधारण्याची शक्‍यता आहे. 

वाहन उद्योगात आलेल्या मंदीमुळे खास ऑटोमोबाइल कंपन्यांसाठी काम करणाऱ्या लघुउद्योजकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. उद्योग चालविण्यासाठी आवश्‍यक असणारे खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यातच उद्योजकांचे घटलेले नफ्याचे प्रमाण याचा ताळमेळ घालणे त्यांना कठीण होत चालले आहे.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

सद्यःस्थिती
लघुउद्योजक युनिट्‌सची संख्या   - १२ हजार 
ऑटोमोबाइलशी संबंधित लघुउद्योजक   - ७ हजार 
कर्मचाऱ्यांची  एकूण संख्या   - साडेचार लाख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Small businesses in Pimpri hit recession