पाच गावांची शेती होणार स्मार्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत निवड, इस्रायली तज्ज्ञांकडून सर्वेक्षण सुरू
पुणे - ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पांतर्गत पुणे जिह्यातील जुन्नर व शिरूर तालुक्‍यांतील पाच गावांची निवड करण्यात आली असून, त्यासंदर्भातील घोषणा डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अभिजित पवार यांनी केली आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा व अर्थसाह्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कुटुंबनिहाय सर्वेक्षणाच्या कामाला शुक्रवारी इस्रायली कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात झाली.

ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत निवड, इस्रायली तज्ज्ञांकडून सर्वेक्षण सुरू
पुणे - ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पांतर्गत पुणे जिह्यातील जुन्नर व शिरूर तालुक्‍यांतील पाच गावांची निवड करण्यात आली असून, त्यासंदर्भातील घोषणा डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अभिजित पवार यांनी केली आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा व अर्थसाह्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कुटुंबनिहाय सर्वेक्षणाच्या कामाला शुक्रवारी इस्रायली कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात झाली.

शेती किफायशीर करणे शक्‍य आहे, पण त्यासाठी विविधांगी काम करण्याची गरज आहे हे हेरून या प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला. गेल्या वर्षी या प्रकल्पामध्ये सहभागाचे आवाहन राज्यभरातील गावांना करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामसभेत ठराव करून तीनशेवर गावांनी आपले प्रस्ताव पाठवले होते. त्यातून पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करून २० गावांची निवड करण्यात आली. त्यानंतर निवडलेल्या १४ गावांना इस्रायली कृषी तज्ञांनी भेट देऊन विविध घटकांची पाहणी व अभ्यास केला होता. त्यातून अंतिमतः जुन्नर तालुक्‍यातील काळवाडी, वडगाव कांदळी, बोरी बुद्रुक व पारगाव तर्फे आळे आणि शिरूर तालुक्‍यातील टाकळी हाजी या पाच गावांची निवड करण्यात आली. पुढच्या टप्प्यात आणखी गावांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. 

निवडलेल्या गावांपैकी वडगाव कांदळीतील कुटुंबनिहाय सर्वेक्षणाचे काम शुक्रवारी इस्रायली तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या विद्यार्थ्यांमार्फत सुरू झाले. या सर्वेक्षणाचा प्रारंभ डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संचालक बॉबी निंबाळकर, सौमिल शहा, इस्राईलमधील व्हायटल कॅपिटल या गुंतवणूकदार कंपनीचे प्रतिनिधी अमित स्टीबे, जेथ्रो कंपनीचे कृषी तज्ज्ञ, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे मुख्य व्यवस्थापक अरविंद गुप्ता, सरपंच माधुरी निलख, उपसरपंच संजय खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी गावकऱ्यांना डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनतर्फे प्रेरणादायी मशाल प्रदान करून आर्थिक परिवर्तनाची द्वाही फिरवण्यात आली.

देशातला पहिला प्रकल्प
इस्राईलमधील कंपन्यांच्या सहकार्याने आणि थेट शेतकऱ्यांच्या सहभागाने राबविला जाणारा हा अशा स्वरूपाचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. असे प्रकल्प जगभरात उभारण्याचा अनुभव असलेली जेथ्रो ही कंपनी त्यासाठी थेट तांत्रिक सहकार्य करीत आहे. त्यासाठी भारत दौऱ्यावर आलेल्या इस्रायली पथकात मोशे प्रिव्हा (प्रकल्प व्यवस्थापक), जोनाथन स्पेन्सर (कृषी तज्ज्ञ), झिव मॅथलॉन (दुग्ध व पशुपालन तज्ज्ञ), ओरी एनहॉर्न (मत्स्य व्यवसाय तज्ज्ञ), याकोव्ह कोहेन (फळबाग तज्ज्ञ), ओर युल्झारी (कृषी अर्थतज्ज्ञ), रानी फ्रिडलॅंडर (विपणन तज्ज्ञ) यांचा समावेश आहे. 

असे होईल सर्वेक्षण
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पाचही गावांतील शेतकऱ्यांचे कुटुंबनिहाय सर्वेक्षण केले जात आहे. कुटुंबातील सदस्य संख्या, शेतीचे एकूण क्षेत्र, शेतीसाठी दिला जाणारा वेळ, पाण्याचे स्रोत, पाण्याचा वापर, उत्पादन खर्च, पीकपद्धती, त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान, उत्पादकता, विक्री व्यवस्था, नफ्याचे प्रमाण, पिकांचा आर्थिक ताळेबंद, दुधाळ जनावरे, जोडव्यवसाय आदी सर्व प्रकारची माहिती घेतली जात आहे. ती टॅबवर थेटपणे नोंदवली जात आहे. या माहितीचे सखोल विश्‍लेषण करून शेतीचा कुटुंबनिहाय आराखडा तयार केला जाणार आहे. सर्वेक्षणानंतर जे शेतकरी प्रकल्पात सहभागी होतील त्यांना इस्रायली तज्ज्ञंमार्फत सल्ला मार्गदर्शन दिले जाणार आहे. शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्थाही उभारली जाणार आहे. त्यामुळे या गावांतील शेती व्यवसाय शाश्‍वत व्हायला मदत होणार आहे. 

वडगाव कांदळीत जल्लोषी स्वागत
ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पात निवड झाल्याने वडगाव कांदळी गावात शुक्रवारी जल्लोषाचे वातावरण होते. सर्वेक्षणासाठी गावात दाखल झालेले इस्राईलचे कृषी तज्ज्ञ तसेच डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या पथकाचे सवाद्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. सरपंच माधुरी निलख, उपसरपंच संजय खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, विद्यार्थी, तसेच ग्रामस्थ या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.

काय आहे प्रकल्प?
बाजाराचा अभ्यास करून पीक पद्धती ठरवणे; खते, बियाणे, कीडनाशके आदी निविष्ठांवरील खर्चात कपात करून उत्पादन खर्च कमी करणे, आधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाची उत्पादकता व गुणवत्ता वाढवणे आणि मध्यस्थांची साखळी टाळून या शेतीमालाची थेट विक्री करणे आदी उपाययोजनांद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यासाठी जगभरात कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इस्रायली तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. निवडलेली सर्व गावे पुणे, मुंबई व नाशिक या मोठ्या शहरांपासून जवळ असल्याने भाजीपाला, फळे, दुग्ध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Web Title: smart agriculture to five village