स्मार्ट कार्ड योजनेत नगरसेवकांची दादागिरी

Smart-Card
Smart-Card

पुणे - झोपडीधारकांचे जीवनमान उंचवावे, पुनर्वसन गतीने व्हावे आणि शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे, या हेतूने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) झोपडीधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची योजना हाती घेतली आहे. मात्र, या योजनेला नगरसेवकच हाणून पाडत असल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणासाठी झोपडपट्टीत येणाऱ्या स्वयंसेवकांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्यासारखे प्रकार नगरसेवकांकडून सुरू झाले आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने हाती घेतलेली ही योजना अडचणीत सापडली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात साडेपाचशेहून अधिक झोपडपट्ट्या आहेत. शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावीत, यासाठी राज्य सरकारने ‘एसआरए’ची स्थापना केली. परंतु, गेल्या चौदा वर्षांत पन्नासहून अधिक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सध्या बांधकाम व्यावसायिकांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यावर प्राधिकरणाकडून कार्यवाही केली जाते. प्राधिकरणाने पुनर्वसनाच्या योजना गतीने राबवाव्यात, यासाठी एक पाऊल पुढे टाकत दोन्ही शहरांतील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करणे, त्यातील पात्र-अपात्र झोपडीधारक निश्‍चित करणे, त्यांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मात्र हडपसर, सिंहगड रस्ता, भवानी पेठ, इंदिरानगरसह शहरातील अन्य भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये राजकीय पक्ष, नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच याला विरोध केला जात आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना मारहाण करणे, त्यांना शिवीगाळ करणे आदी प्रकार सुरू झाले आहेत. त्यामध्ये झोपडपट्टीतील काही दादामंडळींचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही योजना अडचणीत आली आहे. शहर ‘झोपडपट्टीमुक्त’ करू, असे आश्‍वासन सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. प्रत्यक्षात मात्र हे काम कसे होणार नाही, याकडेच पक्षाच्या नगरसेवकांचा कौल आहे.

पात्र-अपात्र झोपडीधारकांची संख्या निश्‍चित करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. भविष्यात शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविणे, त्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावे, हा त्यामागे हेतू आहे. पण, अडवणुकीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे झोपडीधारकांनी सहकार्य करावे.
- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com