झोपडीधारकांना स्मार्टकार्ड

झोपडीधारकांना स्मार्टकार्ड

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांतील पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची संख्या निश्‍चित करण्याची मोहीम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांना प्राधिकरणाकडून स्मार्टकार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे पुनर्वसन योजना राबविताना विकसकाकडून पात्र-अपात्रच्या यादीत होणारा गोंधळ, त्यातून योजनांना होणारा विलंब यासारख्या गोष्टींना आळा बसणार आहे. याचबरोबर झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन गतीने मार्गी लागण्यास मदत होईल.

पुणे व पिंपरी-चिचवड शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘एसआरए’ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, पुनर्वसन योजनांसाठी नियमावलीदेखील तयार करण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे एका जागेवरील झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रकल्प राबविताना तेथील पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची यादी विकसकाकडून तयार केली जाते. अनेकदा या यादींमध्ये गोंधळ केला जातो. या गैरप्रकारांमुळे पुनर्वसन प्रस्ताव रखडतात. त्यामुळे प्राधिकरणानेच आता पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची यादी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा मागवून एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे. 

या दोन्ही शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण करून आणि त्यांच्याकडील पुरावे तपासून पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची संख्या निश्‍चित करण्यात येणार आहे. पात्र आणि अपात्र अशा दोन्ही झोपडीधारकांनी त्यानंतरस्मार्टकार्ड देण्यात येतील. त्यामुळे एका ठिकाणी पुनर्वसन प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित विकसकाऐवजी तेथील पात्र झोपडपट्टीधारकांची यादी प्राधिकरणाकडूनच उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे यादी निश्‍चित करण्यासाठी जाणारा एक ते दोन वर्षांचा कालवधी वाचेल. तसेच, अपात्र असलेल्या झोपडीधारकांना सशुल्क सदनिकादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावरून निश्‍चित झोपडीधारक, पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची नेमकी संख्या किती आहे, ही माहिती समोर येण्यास मदत होईल.


पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकूण चार योजना आहेत. त्यामध्ये एक झोपडीपट्टी पुनर्वसन योजनादेखील आहे. प्राधिकरणाकडून पात्र- अपात्रची यादी निश्‍चित झाली, तर त्यामध्ये जे अपात्र ठरतील त्यांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अन्य तीन योजनांचा लाभ घेता येईल. 
- पांडुरंग पोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com