स्मार्ट सिटीचे कार्यालय ऑटो क्‍लस्टरमध्ये?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

सुमारे दहा महिने जागेचा शोध घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरजवळील २० गुंठे जागा जवळपास निश्‍चित झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून, तीत या जागेला मंजुरी देण्यात येणार असल्याचे समजते.

पिंपरी - सुमारे दहा महिने जागेचा शोध घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरजवळील २० गुंठे जागा जवळपास निश्‍चित झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून, तीत या जागेला मंजुरी देण्यात येणार असल्याचे समजते.

संचालक मंडळाने आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच ते सहा इमारतींची पाहणी केली. मात्र, या जागा पसंतीस न उतरल्याने कार्यालय होऊ शकले नाही. फुगेवाडी येथील महामेट्रोच्या कार्यालयाच्या धर्तीवर स्मार्ट सिटीचे कार्यालय पर्यावरणपूरक असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या जागेला मान्यता मिळाल्यानंतर इमारतीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतीस नेमका किती खर्च येईल, हे आताच सांगता येणार नसल्याचे स्मार्ट सिटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

स्मार्ट सिटीचे कार्यालय तयार काँक्रीटच्या सांगाड्यांची जोडणी करून उभारण्यात येईल. त्यामुळे अवघ्या तीन ते चार महिन्यांमध्ये हे कार्यालय उभे राहील. कॉन्फरन्स हॉल, मीटिंग रूम, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी केबिन, संचालक मंडळासाठी स्वतंत्र दालन आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था, असे या कार्यालयाचे सर्वसाधारण स्वरूप असणार आहे.

स्मार्ट सिटीचे कामकाज सध्या महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या छोट्याशा कार्यालयातून सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या अनेक कामांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. काही कामे सुरू झाली आहेत.

त्यामुळे सध्याचे कार्यालय अपुरे पडू लागले आहे. कार्यालयासाठी मानद सचिव, लेखापरीक्षक, संगणकतज्ज्ञ, खासगी एजन्सीचे प्रतिनिधी आदींच्या नेमणुका झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातील स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाला. त्याची घोषणा डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली. त्यानंतर १३ जुलै २०१८ रोजी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली.

Web Title: Smart City Office in Auto Cluster