‘स्मार्ट सिटी’ला आता द्या गती

‘स्मार्ट सिटी’ला आता द्या गती

पुणे - सुलभ पीएमपी प्रवासासाठी मी (एमआय) कार्ड... बीआरटी मार्गावरील बसला बसविलेले जीपीएस आणि त्यासाठीचा नियंत्रण कक्ष...शहरातील पथदिवे नियंत्रित करण्यासाठीचा नियंत्रण कक्ष... युवकांना मार्गदर्शनासाठी लाइट हाउस.... हे आहेत स्मार्ट सिटीचे काही प्रत्यक्ष कार्यान्वित झालेले प्रकल्प. तर शहर वाय-फाय करणे, बॅटरी ऑपरेटेड बस, आपात्कालीन संपर्क व्यवस्था, स्टार्ट अपला चालना देणे, शहरात माहितीपर फलक लावणे आदी प्रकल्प येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार आहेत. मात्र, राजकीय कारणांमुळे रखडलेले स्मार्ट सिटीचे प्रकल्प महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आल्यामुळे निश्‍चित वेळेत पूर्ण होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शहरातील स्मार्ट सिटीअंतर्गत १४ प्रकल्पांचे २५ जून २०१६ रोजी उद्‌घाटन झाले. त्यातील ५ प्रकल्प थेट कार्यान्वित झाले आहेत, तर आठ प्रकल्पांसाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. हे प्रकल्प सहा ते नऊ महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. स्मार्ट सिटीमध्ये शहराची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाल्यावर येत्या पाच वर्षांत ५१ प्रकल्प पूर्ण करण्याचा मनोदय महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीमुळे आणि तत्पूर्वी राजकीय कारणांमुळे स्मार्ट सिटीचे प्रकल्प रखडले होते. मात्र, आता महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. प्रशासनाच्या तत्परतेवर स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची अंमलबजावणी अवलंबून असेल.

कार्यान्वित झालेले प्रकल्प 
मी कार्ड - पीएमपी प्रवासासाठी एटीएम कार्डच्या धर्तीवर पीएमपीने एमआय कार्ड तयार केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या सुमारे २८ हजार कर्मचाऱ्यांना कार्ड वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर पासधारक प्रवाशांना कार्डचे वाटप होणार असून, जून महिन्यापासून दैनंदिन प्रवाशांना ते उपलब्ध होणार आहे. 

पीएमपीच्या सुमारे १६५० बसला जीपीएस लावण्याची यंत्रणा पूर्ण झाली आहे. त्यातील सुमारे ४०० बस बीआरटी मार्गांवर धावतात. स्वारगेटजवळील स्वतंत्र नियंत्रण कक्षातून त्यांचे सध्या नियंत्रण सुरू आहे. 

शहरातील पथदिव्यांवर स्वतंत्रपणे देखरेख करण्यासाठी महापालिकेने सिंहगड रस्त्यावर विद्युत भवन उभारले आहे. तेथून संपूर्ण शहराचे पथदिवे एकत्रित सुरू - बंद होऊ शकतात. काही ठिकाणी पथदिवे बंद असल्यास क्षेत्रीय कार्यालयाद्वारे देखभाल- दुरुस्ती होऊ शकेल. 

लाइट हाउस - वस्ती विभागातील युवकांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि त्यांना कौशल्य मिळावे, यासाठी महापालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. औंध, येरवड्यात त्याची सुरवात झाली असून, वर्षअखेरीस शहरात आणखी १८ ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

सहा महिन्यांत होणारे प्रकल्प 
शहरात २०० ठिकाणी वाय-फाय झोन. महापालिकेची उद्याने, रुग्णालये आदींचाही समावेश. ठिकाणांची यादी निश्‍चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू. 

शहरातील चार खुल्या जागांचा सर्वांगीण विकास. त्यासाठी सल्लागार नियुक्त केला असून, या मॉडेलची अंमलबजावणी शहराच्या सर्व भागांत होणार. 

स्टार्ट अपला चालना देण्यासाठी महापालिकेने ‘पुणे आयडिया फॅक्‍टरी फाउंडेशन’ ही कंपनी स्थापन केली आहे. उद्योगांच्या मदतीने शहरातील कौशल्य विकास आणि स्टार्ट अपच्या उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे. या कंपनीची बैठक अल्पावधीत होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष योजनांना प्रारंभ होईल. 

शहरात फलक उभारणे - नागरिकांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरेल अशी माहिती (उदा - पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती) शहरात २०० फलक उभारून त्याद्वारे नियमितपणे दिली जाणार आहे. 

आपत्कालीन संपर्क यंत्रणा - शहराच्या विशिष्ट भागात आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी तेथील बटण दाबल्यास संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क होऊन नागरिकांना मदत मिळू शकेल. पोलिस यंत्रणेबरोबरच शासकीय रुग्णालये, अग्निशामक दल आदी यंत्रणांनाही त्यात सामावून घेण्याबाबत विचार सुरू आहे. 

प्रक्रिया सुरू असलेले प्रकल्प 
२४ तास पाणीपुरवठ्यासाठी कर्जरोखे उभारणे 
शहरातील पथदिव्यांचे सिंक्रोनायझेशन करणे 
सौरऊर्जेला चालना देणे - महापालिकेच्या २४ इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याच्या प्रक्रियेस सुरवात. खासगी इमारतींसाठी जागरूकता मोहिमेसाठी आराखडा तयार करण्यास सुरवात 

रखडलेले प्रकल्प 
औंध-बाणेर-बालेवाडी झोपडपट्टीमुक्त करणे - औंधमध्ये वस्ती भागातील ३०० लाभार्थ्यांची नावे निश्‍चित झाली आहेत. त्यांच्याशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
बॅटरी ऑपरेटेड बस - सार्वजनिक वाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण शहरासाठी बॅटरी ऑपरेटेड बस खरेदी प्रक्रिया. 

औंध, बाणेर, बालेवाडीतील रस्त्यांवर पादचाऱ्यांना सुविधा देणे ः औंधमध्ये त्याचा पथदर्शी प्रकल्प दहा दिवस राबविण्यात आला. परंतु, त्याला काही जणांचा विरोध झाल्यामुळे सहमती निर्माण करून त्या धर्तीवर अन्य रस्त्यांवर असा प्रकल्प राबविणार आहे. 

यशस्वी संकल्पना

मोबाईलद्वारे वाहतुकीची माहिती - मोबाईलचा वापर करून शहरातील कोणत्या रस्त्यांवर नागरिकांची किती वर्दळ आहे, याची माहिती घेणे. त्यामुळे कोणत्या भागात आणि कोणत्या वेळी नागरिकांची गर्दी असते, याची माहिती मिळू शकते. त्यानुसार वाहतूक प्रकल्पांची अंमलबजावणी शक्‍य होऊ शकते. 
प्लॅस्टिकचा फेरवापर - शहरात गोळा होणारे प्लॅस्टिक विशिष्ट भागात साठवले जाऊ शकेल. त्यातून त्याचा फेरवापर करणे शक्‍य होऊ शकते. यासाठीचा पथदर्शी प्रकल्प औंधमध्ये उभारण्यात आला होता. 
वाहनांची तपासणी करणे - वाहनांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रकल्प पीएमपीतील २० बसवर यशस्वी झाला आहे. 

(या यशस्वी संकल्पना आगामी काळात शहरात राबविणे शक्‍य आहे. स्मार्ट सिटीच्या कंपनीची मंजुरी घेतल्यावर त्यासाठीचे धोरण निश्‍चित होऊ शकेल.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com