#MonsoonSession "स्मार्ट सिटी'ला गरज दे धक्‍याची ! 

गुरुवार, 28 जून 2018

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्‌घाटन पुण्यात झाले; पण येथील प्रकल्पांना वेग येण्यासाठी महापालिकेच्या "दे धक्‍क्‍याची'ची गरज आहे. केंद्र सरकारने "स्मार्ट पुणे' करण्यासाठी 386 कोटी रुपये दिले; तरीही दोन वर्षांत फक्त 76 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पुढील वर्षात तब्बल 2,300 कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्‌घाटन पुण्यात झाले; पण येथील प्रकल्पांना वेग येण्यासाठी महापालिकेच्या "दे धक्‍क्‍याची'ची गरज आहे. केंद्र सरकारने "स्मार्ट पुणे' करण्यासाठी 386 कोटी रुपये दिले; तरीही दोन वर्षांत फक्त 76 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पुढील वर्षात तब्बल 2,300 कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 जून 2016 रोजी "स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी लाइट हाउस, स्ट्रीट रिडिझाइन, मी कार्ड, स्मार्ट एलिमेंट, प्लेस मेकिंग, सोलर, झोपडपट्टी, स्मार्ट मोबिलिटी, पुनर्विकास असे विविध 14 प्रकल्प सुरू झाले. पण त्यातील मोजक्‍याच प्रकल्पांना गती मिळाली. "स्मार्ट सिटी'च्या यादीत असलेल्या 24 तास पाणीपुरवठा, एलईडीचे पथदिवे, पीएमपीच्या बसला "जीपीएस' बसविणे असे प्रकल्प राबविण्यात आले. रस्ते विकसन, प्लेस मेकिंग आणि वाहतुकीशी संबंधित 600 कोटी रुपयांचे प्रकल्प निविदांच्या प्रक्रियेत आहेत. 

अडथळा कुठे? 
"स्मार्ट सिटी'ची कंपनी शहरात स्थापन झाल्यानंतर दैनंदिन कामकाज करण्यासाठी जागा मिळविण्यापासून त्यांना महापालिकेच्या सहकार्याची गरज भासत आहे. त्यातील विसंवाद "स्मार्ट सिटी'च्या वेगावर प्रतिकूल परिणाम करत आहे. 

स्मार्ट सिटीचे महापालिकेकडील प्रलंबित विषय 
- औंध, बाणेर, बालेवाडीची हद्दवाढ 
- बालेवाडीमध्ये ट्रान्झिट हब उभारण्यासाठी हवी "ना हरकत' 
- शहरात उभारलेल्या व्हीएमडी फलकांना मंजुरी 
- महापालिकेच्या वास्तूंवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणे 
- स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा 
- 100 ई-बसची खरेदी 

"स्मार्ट सिटी'चे सुरू असलेले प्रकल्प 
लाइट हाउस, बायसिकल शेअरिंग, 100 ठिकाणी वायफाय, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्ट्रीट, व्हीएमडी बोर्ड, मी कार्ड, आयटीएमएस, 6 स्मार्ट स्कूल, स्टार्टअपला उत्तेजन देण्यासाठी आयडीया फॅक्‍टरी 

नजीकच्या काळात सुरू होणारे प्रकल्प ः कम्युनिटी क्‍लिनिक, ऍडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम, 34 किलोमीटरचे रस्ते- पदपथ विकसित करणे, नवे रस्ते- सायकल ट्रॅक, पदपथ विकसित करणे 

मिळालेला निधी : 384 कोटी रुपये 
आतापर्यंतचा खर्च : 76 कोटी 
दिलेल्या निधीतील 70 टक्के खर्च झाल्यावर मिळणारा निधी : 384 कोटी रुपये 

"स्मार्ट सिटी' कंपनी स्थापन झाल्यावर ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आव्हान होते. आता कंपनीचे कामकाज व्यवस्थित सुरू झाले आहे. सध्या सुमारे 600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. पुढील वर्षी औंध, बणेर, बालेवाडीसह संपूर्ण शहरात "स्मार्ट सिटी'चे अनेक प्रकल्प दिसतील. 
- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी 

Web Title: smart city project pune news