स्मार्ट सिटीच्या जागृतीसाठी ‘सिटिझन एंगेजमेंट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांबद्दल जनजागृती अभियानाचा भाग म्हणून विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘पुणे स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत ‘सिटिझन एंगेजमेंट’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. क्‍लॅरियन पार्क, कुमार पद्मालय, युथिका अपार्टमेंट्‌स, देवी ऑर्किड येथे नुकत्याच आयोजित केलेल्या संवाद बैठकांना या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांसोबत विविध विकास संकल्पनांवर थेट चर्चा घडवून आणणे, हा यामागील उद्देश आहे. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागांत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यात आता या अभिनव उपक्रमाची भर पडली आहे.
याबाबत रहिवासी प्रभाकर रेखडे म्हणाले, ‘‘या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.’’ स्मार्ट सिटीच्या माहीत नसलेल्या अनेक प्रकल्प व उपक्रमांबद्दल यातून माहिती मिळाली असल्याचे कुमार पद्मालय सोसायटीच्या सुदेशना भट्टाचार्य यांनी सांगितले.

नागरिकांच्या सूचनांचा विचार 
नवीन संकल्पना राबवण्यासाठी नागरिकांच्या विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. त्यानुसार योजना आखल्या जात आहेत.  नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. 

 ‘सिटिझन एंगेजमेंट’च्या कार्यक्रमाद्वारे नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत थेट पोचतो. यामुळे सर्व स्तरांतील घटकांना विकासप्रक्रियेत सहभागी करून स्मार्ट सिटीचा पाया भक्कम होत आहे. हा अभिनव उपक्रम स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पूरक 
ठरत आहे.
- राजेंद्र जगताप, सीईओ, पुणे स्मार्ट सिटी.

Web Title: Smart City Publicity Citizen Engagement