स्मार्ट सिटी - सोयीची की अडचणीची?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

स्मार्ट सिटीच्या नावाने औंध प्रभागात केला जात असलेला विकास नागरिकांच्या पचनी पडताना दिसत नाही. कारण ज्या सोयी नागरिकांना प्राधान्यक्रमाने गरजेच्या आहेत त्या न देता जगातील इतर देशांतील विकासाचे केले गेलेले अंधानुकरण आपल्याला लाभदायी ठरत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

पुणे - स्मार्ट सिटीच्या नावाने औंध प्रभागात केला जात असलेला विकास नागरिकांच्या पचनी पडताना दिसत नाही. कारण ज्या सोयी नागरिकांना प्राधान्यक्रमाने गरजेच्या आहेत त्या न देता जगातील इतर देशांतील विकासाचे केले गेलेले अंधानुकरण आपल्याला लाभदायी ठरत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. 

औंधमधील वाहतुकीची वाढती समस्या ही पदपथ मोठे केले आणि रस्ते लहान झाले, यामुळे झाली आहे. याबद्दल रहिवाशांनी तीव्र नापसंती दर्शवली आहे. आपल्याकडील शहरीकरण वाढत असताना हव्या असलेल्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे प्रशासनाचे काम आहे. परंतु ते न करता केवळ रस्ते बनविण्यावरच भर दिल्याचे दिसून आलेले आहे. औंधमधील व्यावसायिकदृष्ट्या  महत्त्वाच्या असलेल्या संघवीनगर भागातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या यामुळे येथील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने व्यापाऱ्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या भागातील रस्ते बनवताना आधी पार्किंग सुविधा करून नंतरच रस्त्याची कामे सुरू करणे गरजेचे होते. कारण रस्ते लहान झाल्याने वाहतुकीची कोंडी तर होतेच आहे, परंतु पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने वाहनधारक जागा  दिसेल तिथे कशाही पद्धतीने वाहने लावत आहेत. यामुळे कोंडी होतेच शिवाय कधी कधी वादही होतात. यामुळे हीच का स्मार्ट सिटी, असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. सुरवातीला दाखवण्यात आलेली प्रात्यक्षिके मात्र रस्ता आणि पदपथ सोडला तर प्रत्यक्षात आजही दिसत नाहीत, याकडेही स्मार्ट सिटी प्रशासनाने लक्ष द्यायला हवे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. 

यासह या भागात नवीन उद्यान उभारणे, जलपुनर्भरणाची सोय करणे, भाजी मंडईची सुविधा यासारखी कामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तीन वर्षांनंतरही याबाबत स्मार्ट सिटीकडून कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. उद्यानासाठी ॲलोमा काउंटी सोसायटी समोर जागा आरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु तेथेही कुठलेच काम केलेले नाही. यामुळे नागरिक नाराज आहेत.

Web Title: Smart City Pune